Type to search

Karmayogini

कर्मयोगिनी (सुनंदा ठुबे – वाखारे ) : संघर्षातून शिक्षणाधिकारी पदाला गवसणी

Share

सुनंदा ठुबे – वाखारे ; शिक्षणाधिकारी (निरंतर),
जिल्हा परिषद, नगर.

लहान वयापासून घरकाम करूनही शाळेत कायम वरचा क्रमांक, मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करण्याचे संस्कार आणि मेहनत केल्याशिवाय पर्याय नाही याची असलेली जाणीव, या जोरावर माहेरी आणि सासरी आल्यानंतरही शिक्षण सुरूच ठेवले. विशेष म्हणजे आई-वडिलांप्रमाणे सासू-सासरे देखील अशिक्षित असूनही पतीसह या सर्वांचे शिक्षणासाठीचे प्रोत्साहन कामी आले. शिक्षणाधिकारी पदापर्यंत मजल मारण्याचे कर्तृत्व सुनंदा ठुबे-वाखारे यांनी सिध्द केले.

सौ. शारदा आणि श्री. भागाजी ठुबे (मु. कान्हूर पठार, ता. पारनेर जि. नगर) या अशिक्षीत आई वडिलांच्या पोटी जन्माला येऊन आज शिक्षणाधिकारी -वर्ग 1 पदावर कार्यरत असलेल्या सुनंदा ठुबे-वाखारे यांचा लहानपणापासूनचा प्रवास अनेकांना मार्गदर्शक ठरेल असाच आहे. सभोवतालच्या परिस्थितीला सामोरे जाण्याचं बळ देणार्‍या माझ्या ग्रामीण मातीच्या संस्कारांमुळे हे शक्य झाल्याचे त्या सांगतात. मी महिला आहे, असा न्यूनगंड मनात धरून शांत न बसता येणार्‍या अडचणींवर विचारपूर्वक सकारात्मक मार्ग कसा काढता येईल यासाठी जाणीवपूर्वक परिश्रम घेतल्यानेच यश मिळाल्याचे त्या आवर्जून सांगतात.

पहिली ते सहावीपर्यंतचे शिक्षण मुंबई महापालिकेच्या शाळेत झाले. सहावी ते बारावीपर्यंतचे शिक्षण कान्हूर पठार (ता. पारनेर) येथे झाले. त्यानंतर पदवीचे (बी.एस्सी.) शिक्षण पारनेर कॉलेजला केले. दरम्यान पदवी पूर्ण होण्यापूर्वीच लग्न होऊन सासरी आले. पुढे बी.एस्सी., बी.एड. व एम.एड हे शिक्षण वैवाहिक जबाबदार्‍या पार पाडत पूर्ण केले. माध्यमिक शिक्षिका म्हणून हिवरेबाजार येथे कार्यरत असताना विस्तार अधिकारी (शिक्षण) जिल्हा परिषद अहमदनगर या पदाची जाहिरात आली.

तेव्हापासूनच स्पर्धा परीक्षेच्या आभ्यासाची तयारी सुरू केली. विस्तार आधिकारी (शिक्षण) पदावर 2006 साली रुजू झाल्या. तेथे पदाला आणि कामाला न्याय देण्याचा सातत्याने प्रयत्न केला. प्राथमिक शिक्षण विभागात काम करण्याचे आव्हान यशस्वीपणे पार पाडले. या ठिकाणी काम करत असताना खर्‍या अर्थाने पंचायत राज व्यवस्थेचा अनुभव आला. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि गाव हे एकमेकांशी कशाप्रकारे निगडित आहे, याचा प्रत्यय आला. गावच्या विकासात प्राथमिक शिक्षणाचा वाटा किती महत्वाचा हे जाणून पुढे याच क्षेत्रात पुढे जाण्याचा निर्णय घेतला.

तद्नंतर 2011 मध्ये गटशिक्षणाधिकारी (नेवासा) या पदावर कामकाज केले. ग्रामीण भागातून सामान्य कुटुंबातून आल्यानंतर सासरी नांदत असताना विस्तार अधिकारी पदावर काम करत असताना पुढे गट शिक्षणाधिकारी पदापर्यंत मजल मारताना अनेक अडचणी आल्या. पण केवळ महिला आहे, म्हणून मागे राहायचे नाही, हा विश्‍वास मनाशी बाळगून पुढील वाटचाल सुरू ठेवली. दरम्यान वर्ग-1 पदासाठी अभ्यास सुरू होता.

2013 साली पुन्हा एकदा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शिक्षणाधिकारी पदावर निवड झाली. आपल्याच जिल्ह्यात आपण शिक्षणाधिकारी या शिक्षण विभागातील पदावर काम करत असल्याचा मोठा आनंद त्यांना झाला. मात्र, या आनंदासोबत जबाबदारीचीही जाणीव होती. या सर्व बाबींचा विचार करूनच पुढील वाटचाल सुरू केली.
वडिलांना हृदय विकाराचा त्रास, आजारपण, शिक्षण नाही, अल्पशी कोरडवाहू जमीन असे असताना अशिक्षीत आई-वडिलांनी शाळेत घातले, हीच गोष्ट भाग्याची असल्याचे त्या मानतात.

शाळेत असताना अन्य मुलांनी दोन-तीन वर्षे वापरल्यानंतरची पुस्तके 40 टक्के किंमतीने विकत घ्यायची आणि ती वापरायची. माणसाची परिस्थिती बिकट असली तरी त्यातून मार्ग काढत यशाकडे वाटचाल करायची असते, हेच यातून अधोरेखीत होते. पुस्तक जुनी असली तरी चालेल पण शिक्षण पूर्ण करण्याचा निश्‍चिय दरवेळी नवा असला पाहिजे, असे त्या मानणार्‍यांपैकी एक आहेत.

मुलगी हुशार आहे, तिला पुढे शिकवा असा आग्रह शिक्षकांचा होता. घरच्यांनीही शिक्षणासाठी कधी आडकाठी निर्माण केली नाही. माहेर व सासर अशिक्षित असतानाही शिक्षणाला पाठिंबा दिला. पती तुकाराम वाखारे यांची साथ मिळाल्याने संसार, चूल-मूल सांभाळून शिक्षण सुरू राहिले. जीवनात साथ देणारे असले की खडतर मार्गावर देखील यश हमखास मिळते. यामुळे सर्वांनी आयुष्यात शिक्षणाची कास सोडू नये. ग्रामीण भागतील मुलींनी प्रतिकूल परिस्थितीतच आपले व्यक्तिमत्त्त्व घडवायला हवे.

अशिक्षीत कुटुंब मार्गातील आडचण नसते तर ती एक संधी मानावी. आपणाकडे संघर्ष करण्याची तयारी, संकट आली तरी धीराने सामोरे जाण्याचे धैर्य असावे. यशाकडे जाणारा रस्ता संघर्षाच्याच पायवाटेने पुढे जातो. असंख्य मुली, महिला यांच्यासमोर अनेक कौटुंबीक, आर्थिक आणि अन्य अडचणी असतात. त्यांनी त्यासमोर डगमगायला नको. आयुष्याच्या स्पर्धेत टिकायचेच नव्हे, तर पुढे जायचे आणि त्याला शिक्षणाशिवाय पर्याय नाही, हे प्रत्येकाने लक्षात ठेवावे, असा सल्ला त्या ग्रामीण मुली, महिलांना देतात.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!