Type to search

Featured Karmayogini

कर्मयोगिनी ( स्वाती अनिल नर्‍हे) – ‘मॉडेल व्हिलेज’चे स्वप्न सत्यात आणले

Share
  • स्वाती अनिल नर्‍हे

आदर्श सरपंच वडनेर बुद्रुक
ता. पारनेर.
शिक्षण – एम. ए. 

स्त्रीने एखादे स्वप्न पाहिले तर ते पूर्ण करण्यासाठी ती काय आणि कशी धडपडत असते याचे उत्तम उदाहरण म्हणजे सौ. स्वाती अनिल नर्‍हे. त्यांच्या या सुजलाम् सुफलाम् गावाचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांच्या कुटुंबाने आणि गावकर्‍यांनीही तेवढीच साथ दिली. महिला सरपंच झाल्यानंतर ती नाममात्र असते आणि सगळा कारभार त्या महिला सरपंचाचे पती बघतात बहुतांश ठिकाणी असलेले हे चित्र त्यांनी खोटे ठरवले. एक महिला घरच्यांचा आणि गावाचा सक्रिय पाठींबा मिळाला की किती सक्षमपणे कारभार करू शकते हे त्यांनी दाखवून दिले आहे.

स्वातीताई वडनेर येथे लग्न होऊन आल्या तेव्हा गावाची अवस्था पाहून त्यांना खूप वाईट वाटले. गावाचा संपूर्ण विकास व्हावा असे त्यांना सतत वाटत होते. गरीब व साधारण कुटुंबामध्ये असल्याने मिस्टरांचेही शासकीय नोकरीत काम न झाल्याने खचून न जाता दोघांनीही गाव विकासाचा मंत्र स्वीकारला. महिलांनी महिलांचे अधिकार कसे वापरायचे हे सांगितले त्यांचे मिस्टर श्री. अनिल लक्ष्मण नर्‍हे यांनी. महिला सरपंच पदावर आल्यावर सर्व कारभार सरपंचपतीच पहातात हा मुद्दाच त्या दोघांनी खोडून काढला. संपूर्ण अधिकार महिलांनीच वापरावे हे धोरण लक्षात घेऊन पडद्यामागची संपूर्ण जबाबदारी सांभाळी. वक्तृत्त्व कसे असावे याचे धडे त्यांनीच स्वातीताईंना दिलेे.

यशस्वी स्त्री मागे पुरुष असतो हे त्यांच्यामुळे शक्य झाले. हळुहळु ओळखी होत गेल्या. त्यातून समाजसेवेचे व्रत स्वीकारले. पण गावाच्या विकासासाठी सामाजिक क्षेत्राबरोबरच राजकीय क्षेत्राची मदत मिळाल्यास नक्की विकास करू असे ठरवले आणि खरचं निवडणूक लढण्याची संधी मिळाली व जनतेनेही विश्‍वास दाखवून सर्वाधिक मतांनी कौल देऊन विजयाची माळ ताईंच्या गळ्यात टाकली. सामान्य जनता व महिलांचा विकास यावर भर देऊन सरपंच पदावर आल्यानंतर संपूर्णवेळ गावाच्या विकासासाठी देण्याची जिद्द मनाशी ठेऊन ताईंनी कामाला सुरूवात केली. कमीत कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त कामकाजाचे नियोजन केले. त्यातूनच संपूर्ण गावातील ग्रामस्थ व महिलांना एकत्र केले आणि गावाचा विकास कसा साधायचा हे गावकर्‍यांशी चर्चेतून ठरविले.

सर्वात प्रथम शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असल्याने ऑफीशियल कामाचा अनुभव असल्याने प्रथम ग्रामपंचायत कार्यालय आय.एस.ओ. करण्याचे सर्वानुमते ठरविले व तालुक्यात प्रथम आय.एस. ओ. चा मान मिळाला. त्यातूनच गावामध्ये जर आपण एकीने काम केले, स्पर्धा राबविल्या तर विकासाला चालना मिळेल या हेतूने स्मार्ट ग्राम स्पर्धा राबविली . त्यामध्येही गावाला तालुक्यात प्रथम क्रमांक आणि 5 लाखांचा पुरस्कार मिळाला. त्याबरोबर संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान स्पर्धा सन 17-18 राबविली व त्यामध्येही गावाला तालुक्यात प्रथम क्रमांक आणि 1 लाखाचा पुरस्कार, जिल्ह्यातून दुसरा क्रमांक 3 लाख तर विभागावर तिसरा क्रमांक आणि 6 लाखांचा पुरस्कार मिळाला.

100 % हागणदारीमुक्त गावाचे प्रमाणपत्र, शासनाच्या सर्व योजनांचा फायदा करून घेत गावात सर्व योजना 100 % राबवल्या. पाणी व्यवस्थापनासाठी मिटर बसविले. वीज व्यवस्थापनासाठी सौरऊर्जा प्रकल्प प्रस्तावित केले. आरोग्याचे महत्त्व कळावे यासाठी योगासने, नेत्र तपासणी शिबिर, रक्त तपासणी शिबिर, संसर्गजन्य आजारांचे शिबिर घेतले . महिलांचा ग्रामसभेत सहभाग वाढविण्यासाठी बांधावर ग्रामसभा, बचत गट, उद्योग व्यवसाय व्यवस्थापन आदी प्रशिक्षण घेतले. सेंद्रीय शेतीचे तंत्र शेतकर्‍यांना मिळवून दिले.

वृक्षारोपण करून प्रत्येक वृक्षाच्या संगोपनासाठी प्रयत्न. राममळा पॅटर्न, विवाहाच्या वेळी वृक्ष लागवड , स्मृती वृक्ष लागवड, गावाच्या हितासाठी सी.सी.टी.व्ही कॅमेरे बसवून घेतले. गावामध्ये ग्रामसुरक्षा रक्षक दल, गुटखा बंदी, प्लॅस्टीक बंदी, दारूबंदी असे अनेक ठराव घेतले. सण उत्सव एकत्र साजरे करणे. अंधश्रद्धानिर्मूलनसाठी प्रयत्न. रस्ते -विकासासाठी पाठपुरावा करून देखरेख करून स्वतः लक्ष देऊन रस्ते बनवले. मतदानाच्या जनजागृतीसाठी प्रयत्न केले. आत्तापर्यंत गावच्या विकासात हातभार लावणार्‍या माजी सरपंच व उपसरपंच, सदस्य यांचा सन्मान केला. कचरा व्यवस्थापनात गांडूळ खतनिर्मिती व कंपोस्ट खतनिर्मिती करण्यास प्रोत्साहन दिले . शालेय विद्यार्थ्यांना खेळाचे साहित्य वाटप आणि त्यांच्याशी प्रोत्साहनपर चर्चा केली.

अपंगांसाठी अपंग प्रमाणपत्र काढून देण्यास मदत केली व अपंगांना शासकीय लाभ मिळवून दिला. स्वातीताईंनी आदर्श गावाची संकल्पना राबवून राज्यात गावाचे नाव झळकवले . शेतीला पीकविमा संरक्षण, नैसर्गिक आपत्ती निवारण, वन्य प्राण्यांपासून झालेले नुकसानाची भरपाई वेळोवेळी मिळवून दिली. महिलांचे संघटन करून बचत गट स्थापन केले. त्याद्वारे विविध उत्पादने उत्पादित केली. या बचत गटाला विखे फाउंडेशनचा 2017 चा पुरस्कार प्राप्त झाला आहे. स्वच्छ व सुंदर वडनेर बुद्रुकचा ध्यास घेल्याने 2018 मध्ये आदर्श सरपंच पुरस्कार त्यांना मिळाला. ताईंनी केलेल्या कामाची पावती म्हणून सर्व वडनेरच्या ग्रामस्थांकडून सन्मानपत्र मिळाले.

सरपंच परिषदांमुळे अनेक दिग्गज व्यक्तींचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले. ज्येष्ठ समाजसुधारक अण्णा हजारे, आदर्श सरपंच पोपटराव पवार यांच्या विचारांची संकल्पना समोर ठेऊन गावच्या विकासाचे स्वप्न राबविले. अखिल भारतीय सरपंच परिषद पारनेर तालुक्याच्या महिला आघाडीच्या अध्यक्षपदाचा मान त्यांना मिळाला. भविष्यामध्ये गावाच्या कल्याणासाठी अजून काही संकल्पना राबविण्याचा मानस आहे. स्वातीताईंच्या मते, मचांगल्यातून चांगले निर्माण होते. वाईटातून वाईट हा सुविचार डोक्यात ठेवून कार्य करत राहा. देव सगळ्यांचे चांगलेच करतो. संकटाच्यावेळी डगमगू नका, हरू नका. संकटानंतर संधी नक्की येते कारण संकट कधी एकटे येत नाही संधी सोबत घेऊनच येते.फ

 

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!