सरपंचपदाच्या निवडणुकीदरम्यान राडा

0
पोलिसांचा सौम्य लाठीहल्ला, निवड प्रक्रियेला स्थगिती
अहमदनगर (प्रतिनिधी) – नगर तालुक्यातील पिंपळगाव उज्जैनी येथे उमेदवारांच्या बंडखोरीमुळे सरपंच व उपसरपंच पदांच्या निवड प्रक्रियेदरम्यान दोन गटांत हाणामारी झाली. कृषी अधिकारी व सरकारी कर्मचार्‍यांना मारहाण केल्यामुळे जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीहल्ला केला. या घटनेनंतर गणपूर्तिआभावी निवड प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली. याप्रकरणी दंगा करणार्‍या 20 जणांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंपळगाव उज्जैनी येथे ग्रामपंचायत निवडणूक झाली. त्यात 11 सदस्य निवडून आले. बुधवारी (दि. 21) सरपंच व उपसरपंच पदांची निवड प्रक्रिया होती. सकाळी 9.30 वाजता या पदांच्या निवडीसाठी नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यास सुरुवात झाली. सरपंच पदासाठी दोन तर उपसरपंच पदासाठी दोन असे चार अर्ज दाखल झाले. हे सर्व अर्ज वैध ठरले. अर्ज मागे घेण्याची वेळी दुपारी दीड पर्यंत होती. या दरम्यान एकाही उमेदवाराने अर्ज मागे घेतला नाही. सरपंच निवडीसाठी दुपारी दोन वाजता सभा घेण्यात येणार होती.
त्यामुळे तेथे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सभा होण्याआधी उमेदवार व त्यांचे नातेवाईक यांच्यात वादावादी सुरू झाली. एका उमेदवाराने बंडखोरी केल्यामुळे त्याच्या नातेवाईकांनी त्यास मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे वातावरण तणावाचे झाले. यावेळी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी आगाऊ पोलीस बंदोबस्त बोलावून घेतला व ग्रामपंचायतीच्या बाहेर असणार्‍या ग्रामस्थांना समजाविण्याचा ते प्रयत्न करीत होते.
या दरम्यान काही अज्ञात तरुणांनी निवडणूक प्रक्रियेच्या दालनात जाऊन पंचायत समितीचे कृषी अधिकारी किशोर सुरेश जगताप यांच्यासह अन्य कर्मचार्‍यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. सरकारी अधिकार्‍यावर हल्ला केल्याचे लक्षात येताच चव्हाण यांनी मारहाण करणार्‍यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या अंगाला झटापट करीत तरुण बाहेर पडले. पुढे कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलिसांनी जमावाला पांगविण्यासाठी सौम्य लाठीहल्ला केला. यावेळी झालेल्या पळापळीत एक महिला भिंतीला धडकल्यामुळे तिला मार लागला आहे.
दरम्यान, वातावरण चिघळल्यामुळे सरपंच व उपसरपंच पदांच्या निवडीसाठी आलेले काही सदस्य ग्रामपंचायतीतून निघून गेले. निवड प्रक्रिया होण्याच्या आधीच सदस्यांच्या गणपूर्तिअभावी निवड प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली. काही वेळात हे वातावरण निवळल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक चव्हाण यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली. कोणीही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होईल असे कृत्य करू नये असे आवाहन करण्यात आले. या घटनेनंतर सायंकाळी कृषी अधिकार्‍यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार 15 ते 20 जणांवर दंगा केल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ते तरुण नगर शहरातील…
घटना घडली तेव्हा ग्रामस्थांनी अधिकार्‍यांना व कर्मचार्‍यांना मारहाण केली नाही. मात्र निवड प्रक्रियेत गोंधळ घालण्यासाठी बाहेरच्या काही तरुणांना बोलाविण्यात आले होते, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. हा सर्व प्रकार पोलिसांच्या कॅमेर्‍यात चित्रित झाला असून मारहाण करणारे नगर शहरातील तरुण असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे रात्री पोलिसांनी अटक मोहीम राबवून काही संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे.
वादाचे खरे कारण
या ग्रामपंचायत निवडणुकीत प्रस्थापितांचे 7, एक अपक्ष व विरोधी पक्षाचे 3 असे असे 11 सदस्य निवडून आले आहेत. मात्र अपक्ष व प्रस्थापितांच्या गटाचे दोन उमेदवार सोडून सत्ता स्थापन करण्यासाठी विरोधकांनी सरपंचपदाचे आमिष दाखवून काही सदस्यांना बंडखोरी करण्यास भाग पाडले. यावेळी बंडखोरी केलेल्या सदस्याला त्याच्याच नातेवाईकांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच निवड प्रक्रियेतून अलिप्त राहण्यास सांगितले. त्यामुळे तणाव निर्माण झाला व पोलिसांना बळाचा वापर करावा लागला.
बघ्याची भूमिका कशी घेऊ शकतो!
सरकारी कर्मचारी काम करीत असताना त्यांचे संरक्षण करणे आमची जबाबदारी आहे. घटनास्थळी अधिकार्‍यांना अचानक मारहाण सुरू केल्यामुळे आम्ही बघ्याची भूमिका कशी घेऊ शकतो? म्हणून बळाचा वापर करावा लागला. सध्या गावात किरकोळ तणाव आहे. तेथे बंदोबस्त लावण्यात आला आहे. घटनेतील आरोपी कॅमेर्‍यात चित्रित झाले असून त्यांना ताब्यात घेण्यासाठी पथक तैनात करण्यात आले आहे. जर कोणी कायदा हातात घेईल तर त्याची गय करणार नाही.
विनोद चव्हाण, सहायक पोलीस निरीक्षक

 

LEAVE A REPLY

*