सरपंच निवडणुकीत पक्षाचा झेंडा हाती घेता येणार नाही

0

अहमदनगर (प्रतिनिधी) – थेट सरपंच निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने निर्देश जारी केले आहेत. त्यात या निवडणुकीसाठी असणार्‍या इच्छुकांना आता स्थावर आणि जंगम मालमत्तेचा तपशील देणे बंधनकारक करण्यात आले आहे. याशिवाय सरपंच निवडणुकीत कोणत्याही राजकीय पक्षांचे चिन्ह वापरता येणार नाही. त्यामुळे राजकीय फायदा उठवू पाहणार्‍यांचे मनसुबे धुळीस मिळणार आहेत.

महाराष्ट्राच्या वाड्यावस्त्यांवरील राजकारण ढवळून काढणार्‍या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आता आमूलाग्र बदल झाला आहे. सदस्यांमधून सरपंच निवडण्याऐवजी थेट मतदारांतून सरपंच निवडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेऊन त्यादृष्टीने सुधारणा केल्या आहेत.

मतदारांतून निवडल्या जाणार्‍या सरपंचाला मुक्त चिन्ह घेऊनच निवडणूक लढवावी लागणार आहे. सरपंच पदाच्या सर्व उमेदवरांना वाटण्यात आलेली चिन्हे गोठविण्यात येणार असून ती पुन्हा प्रभागातील उमेदवारांना वाटता येणार नाही. शिल्लक असलेल्या चिन्हेच इतरांना निवडावे लागणार आहेत. या निर्देशामुळे भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस यासह इतर राजकीय पक्षांसाठी राखीव असलेले चिन्ह घेता येणार नाही. त्यामुळे राजकीय फायदा उठवू पाहणार्‍या इच्छुकांची गोची होणार आहे.

ऑक्टोबर 2017 ते फेब्रुवारी 2018 या कालावधीत महाराष्ट्रातील चार हजार 120 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. ऑक्टोबरमध्ये राज्यातील 13 जिल्ह्यांमधील 117 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. या निवडणुकांपासूनच जनतेतून सरपंच निवडण्याची प्रक्रिया राबविली जाणार आहे. जनतेतून सरपंच निवडण्यासाठी आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या निवडीसाठी राज्य निवडणूक आयोगाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून जनतेतून निवडल्या जाणार्‍या सरपंचाबाबत असलेले संभ्रम दूर करण्यात आले आहेत.

 

LEAVE A REPLY

*