नाशिक ता. १३ : सरदार नारोशंकर राजेबहाद्दर यांच्या काळात बांधलेला नाशिकचा राजेबहाद्दर वाडा म्हणजे नाशिकचे ऐतिहासिक वैभव.

वसईच्या लढाईत सरदार नारो शंकर राजेबहाद्दर यांनी चर्चवरील घंटा काढून आणली आणि येथील नारोशंकर मंदिराला बहाल केली. पुढे स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या काळात नाशिक महापालिकेच्या बोधचिन्हात हीच घंटा वापरली गेली.

सतराव्या शतकाच्या उतरार्धात नाशिक मोघलांच्या हातातून मराठ्यांच्या ताब्यात आले आणि त्यानंतर गुलशनाबादचे नामांतर होऊन नाशिक असे झाले.

पेशवाईच्या कालखंडात सरदार नारोशंकर राजेबहाद्दर यांनी १७ व्या शतकाच्या उत्तरार्धात हा वाडा बांधल्याचा उल्लेख सापडतो.

निजाम,  पेशवाई आणि ब्रिटिश राजवटीचा  हा वाडा म्हणजे एक मूक साक्षीदारच होय. अठराव्या शतकात ब्रिटिशांच्या काळात येथे सरकारी कार्यालये होती. त्याच काळात या वाड्याचे नामकरण सरकारवाडा झाले असावे.

वाड्याच्या शेजारीच पोलिस स्टेशनही होते. अगदी अलिकडच्या काळापर्यंत हे पोलिस स्टेशन इथे होते.  आजही पोलिसांचे एक कार्यालय या हद्दीत आहे.

साधारणत: ब्रिटिश काळातच नाशिकच्या प्रसिद्ध सार्वजनिक वाचनालयाची याच वाड्यात स्थापना झाली. अगदी अलिकडच्या काळापर्यंत या ठिकाणी वृत्तपत्र वाचनालय सुरू होते.

अठराव्या शतकात पेशवे आणि निजामकालिन अनेक घटनांचा साक्षीदार असलेल्या या वाड्याची काळाच्या ओघात दुर्गती झाली. एका पावसात वाड्याचा बराच भाग ढासळला आणि हा ऐतिहासिक ठेवा लयाला जातो की काय अशी काळजी नाशिककरांना लागली.

वाड्याला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी पुढे आले ते नाशिकचे एक जुनेजाणते व्यक्तिमत्व  अण्णा बेळे. त्यांनी यासाठी आवाज उठविला, चिकाटी आणि कष्टाने पाठपुरावा केल्यावर सरकारने पुरातत्व विभागाच्या माध्यमातून वाडा जतन करण्याचा प्रयत्न केला.

आजमितीस वाड्याच्या तळमजल्याचा पुढचा भाग आणि आतील भागातील चौक व इतर भागाचे काम बऱ्यापैकी पूर्ण झाले आहे.

जसजसा निधी मिळत जाईल, तसतसे त्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्याच्या डागडुजीचे कामही सुरू असल्याचे पुरातत्व विभागाचे सहायक संचालक डॉ. श्रीकांत घारपुरे सांगतात.

वाड्याच्या परिसरातील अतिक्रमणे, बाजूलाच असलेले पोलिस स्टेशन आणि महावितरणचे खांब या गोष्टीही वाड्याच्या सौदर्यात अडथळे ठरत आहेत. त्यावरही मात करण्याचे काम प्रयत्न पुरातत्वविभाग आणि काही जागरूक नाशिककरांतर्फे होत आहे.

जागतिक वारसा सप्ताहानिमित्त २५ नोव्हेंबरपर्यंत सरकारवाडा सर्वसामान्य नाशिककरांसाठी खुला करण्यात आला आहे. या ठिकाणी भारतातील पुरातत्व वारसा सांगणार्या प्रदर्शनाचे आयोजनही करण्यात आले आहे. नाशिककरांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे.

LEAVE A REPLY

*