आता एकरी 200 टन ऊस उत्पादनाचे ध्येय : संजीव माने

0

मेळाव्यास हजारो ऊस उत्पादक शेतकर्‍यांची उपस्थिती

भेंडा (वार्ताहर) – ऊस हे वैभव मिळवून देणारे पीक असून जमिनीची सुपीकता, योग्य लागवण पद्धत व खते-पाणी व्यवस्थापन यांचा मेळ घालून 168 टन उत्पादन मिळाले. आता एकरी 200 टन ऊस उत्पादनाचे ध्येय असल्याचे प्रतिपादन कृषिभूषण ऊस शेतीतज्ज्ञ संजीव माने यांनी केले.

भेंडा येथील ज्ञानेश्‍वर सहकारी साखर कारखाना व कृषी विज्ञान केंद्र, दहीगाव-ने यांचे संयुक्त विद्यमाने कुकाणा येथील साईश्रद्धा लॉन्स मध्ये आयोजित शेतकरी मेळाव्यात एकरी 150 टन ऊस उत्पादन याविषयावर मार्गदर्शन करताना श्री. माने बोलत होते. ज्ञानेश्‍वर उद्योग समूहाचे प्रमुख मार्गदर्शक माजी आमदर नरेंद्र घुले अध्यक्षस्थानी होते. कारखान्याचे उपाध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठलराव लंघे, संचालक काकासाहेब नरवडे, काशिनाथ नवले, ज्ञानेश्‍वर पवार, तालुका कृषी अधिकारी सुधीर शिंदे, कार्यकारी संचालक अनिल शेवाळे, सरव्यवस्थापक काकासाहेब शिंदे, संदीप पाटील, लोकेश कडू, विद्याधर बडे, अच्युतराव बनकर व्यासपीठावर उपस्थित होते.

श्री. माने पुढे म्हणाले, एकरी ऊस उत्पादन वाढीसाठी जमिनीची सुपीकता व आरोग्य सांभाळले पाहिजे. शेणखत किंवा कम्पोस्ट खताचा वापर करून जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढविणे गरजेचे आहे. 5 फूट सरी पद्धतीचा वापर करून दीड फूट अंतरावर एक डोळा पद्धतीने ऊस लागवड करावी. योग्य पाणी व्यवस्थापन, रोग, कीड व वन्य प्राण्यांपासून पिकाचे संरक्षण करावे. पाणी व खताचे नियोजन करावे. रासायनिक खतांचा प्रमाणात वापर करून शेणखत, सेंद्रिय खते, बायोकम्पोस्ट खते, हिरवळीच्या खतांचा वापर करावा. लागणीपेक्षा खोडव्यात ऊस उत्पादन वाढले पाहिजे.

यासाठी एकात्मिक पद्धतीने अन्नद्रव्य व्यवस्थापन केले पाहिजे. खोडवा ठेवताना पाचरट न जाळता ते शेतातच कुजविले पाहिजे. पाचरट कुजविल्याने सेंद्रिय कर्ब वाढविण्यास मदत होते. 2.5 किलो वजनाचे 40 हजार पक्व उसापासून एकरी 100 टन उत्पादन सहज मिळू शकते. एकरी 168 टनापर्यंत ऊस उत्पादनात यश मिळाल्याने आता एकरी 200 टन ऊस उत्पादन मिळविण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. तुम्ही किमान एकरी 150 टनाचे उद्दिष्ट ठेवावे. असे सांगून ऊस उत्पादन वाढीसाठी आवश्यक असणार्‍या जमिनीची सुपीकता, ऊस लागवणीची योग्य पद्धत, रासायनिक खतांची संतुलित मात्रा, पाणी व्यवस्थापन आणि पीक संरक्षण या पाच बाबींची तपशीलवार व शास्त्रोक्त माहिती त्यांनी दिली.कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील म्हणाले, शेतकरी हा निर्मिती क्षेत्रातील प्रमुख घटक आहे. निसर्गानेही साथ दिली, पाऊस चांगला झालेला आहे.त्यामुळे एकरी 150 टन ऊस उत्पादनाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रयत्न करू.

ज्ञानेश्‍वरचे सरव्यवस्थापक काकासाहेब शिंदे, संदीप पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी रावसाहेब निकम, मोहनराव भगत, प्रा. नारायण म्हस्के, शिवाजीराव गवळी, मोहनराव देशमुख, अनिल हापसे, शिवाजीराव मोरे, रामदास गोल्हार, विष्णू फटांगडे, जनार्दन पटारे, राजेंद्र मते, माणिकराव थोरात, जगन्नाथ कोरडे, सुधाकर लांडे, अशोकराव मिसाळ, पंडित भोसले, जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे, विठ्ठलराव अभंग, जनार्दन कदम, विलास लोखंडे, रामभाऊ पाऊलबुद्धे, तुकाराम मिसाळ, दत्तात्रय खाटीक, निवृत्ती दातीर, सुधाकर भोसले, हुकूम बाबा नवले, शिवाजीराव घोरपडे, देविदास चौरे, मुख्य शेतकी अधिकारी सुरेश आहेर यांचेसह ज्ञानेश्‍वर साखर कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते. डॉ. श्याामसुंदर कौशिक यांनी प्रास्ताविक केले. भाऊसाहेब सावंत यांनी सूत्रसंचालन केले.

खतांचा बेसल डोस महत्त्वाचा  – ऊस लागण करताना सरीमध्ये रासायनिक खतांचा बेसल डोस टाकणे खूप महत्त्वाचे आहे. ऊस उत्पादन वाढीतील ही एक प्रमुख बाब आहे.                                        – कृषिभूषण संजीव माने

LEAVE A REPLY

*