‘अ‍ॅट्रॉसिटी’च्या गैरवापराविरोधात आंदोलन उभारणार

0

संजीव भोर, सर्व जाती धर्मियांचे नेतृत्त्व करणार

अहमदनगर (प्रतिनिधी) – अ‍ॅट्रॉसिटी कायद्याच्या गैरवापरामुळे सवर्ण समाजातील अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. अनेकजण या कायद्याच्या भीतीपोटी आत्महत्या करत आहेत. मात्र दलित मतांसाठी काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी व इतर कोणताही पक्ष या कायद्याच्या गैरवापराविरोधात बोलायला तयार नाही. दुसर्‍याकडे अ‍ॅट्रॉसिटी कायद्यासंदर्भात न्यायालयावर दबाव आणण्याचे काम सुरू आहे. हा न्यायालयाचा अवमान आहे. यामुळे अ‍ॅट्रॉसिटी कायद्याच्या गैरवापराविरोधात जनआंदोलन उभारण्याचा निर्धार शिवप्रहार संघटनेच्यावतीने करण्यात आला असल्याची माहिती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजीव भोर यांनी दिली.

नगरच्या शासकीय विश्रामगृहावर रविवारी शिवप्रहार संघटनेची जिल्हा बैठक संस्थापक अध्यक्ष भोर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन चौगुले यांनी बैठकीच्या आयोजनाचा उद्देश विषद केला. 20 मार्च 2018 ला सर्वोच्च न्यायालयाने अ‍ॅट्रॉसिटी कायद्याच्या गैरवापराबाबत दिलेला निकाल व त्यानंतर न्यायालयाच्या निकालाच्या विरोधात काँग्रेस पक्षाने दलित समाजाने घेतलेली एकांगी भूमिका व देशभर तसेच महाराष्ट्रातही या निकालाविरोधात उमटलेल्या प्रतिक्रिया तसेच सत्ताधारी भाजप सरकारनेही अ‍ॅट्रॉसिटी कायदा समर्थकांच्या दबावाखाली घेतलेली पक्षपाती भूमिका या पार्श्वभूमीवर ही संघटनेची बैठक झाली.

काँग्रेससारख्या पक्षाने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात पक्षपाती भूमिका घेणे चुकीची आहे. शिवाय हे लोकशाहीस घातक असून या विरोधात संघटितपणे आवाज उठवणे आवश्यक असल्याचे नमूद करतानाच बैठकीत भोर यांनी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल व अनुषंगिक कायदेशीर बाबी यावर सविस्तर मार्गदर्शन केले. अ‍ॅट्रॉसिटी कायद्याच्या गैरवापराने पीडित सर्व जातीधर्मातील बांधवांनी एकत्र येऊन व्यापक लढा उभारला पाहिजे. न्यायालयीन लढ्यासाठीही कटिबद्ध झाले पाहिजे, अशी गरज भोर यांनी व्यक्त केली. बैठकीत सखोल विचार मंथन केल्यानंतर गावपातळीपासून तालुका तसेच जिल्हास्तरावर राज्यव्यापी आंदोलन उभे करण्याचा मानस पदाधिकार्‍यांनी व्यक्त केला.

येत्या 21 एप्रिलपर्यंत तालुक्यांच्या ठिकाणी अ‍ॅट्रॉसिटी कायदा गैरवापराने पीडित सर्व जाती-धर्मियांच्या प्राथमिक बैठका घेऊन 30 एप्रिलपर्यंत प्रत्येक तालुक्यात बैठका आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. या सर्व तालुका समन्वय समितीच्या सदस्यांची एकत्रित बैठक घेऊन जिल्हा व्यापी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला जाईल, असे भोर यांनी यावेळी स्पष्ट केले. आगामी काळात निवडणुकांमध्ये जो समाजाचा तोच आमचा ही भूमिका या कायद्याने पीडित सर्व समाजबांधवांपर्यंत पोहचविण्याचा उद्देश समोर ठेवून जनजागृतीचे व्यापक अभियान व मोर्चे काढण्यात येणार आहेत.

अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर करून सवर्ण समाजावर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात सर्वच जिल्ह्यात व व्यापकस्तरावर आवाज उठविण्याचा निर्धार सर्व कार्यकत्यारनी व्यक्त केला. बैठकीस शिवप्रहारचे जिल्हाध्यक्ष सचिन चौगुले, शिवाजी चौधरी, नवनाथ आढाव, मदन मोकाटे, गणेश हारदे, कुणाल गायकवाड, विनायक सातपुते, राकेश भोकरे, यशवंत तोडमल, अमोल पाठक, दीपक शिंदे, नितीन ढाळे, धीरज रसाळ, अर्जुनराव काळे, अण्णा काळे, अमोल रोकडे, दत्ता गागरे, विकास खोर्दे, अरुण जाधव मनोज गायकवाड, राजेंद्र कर्डीले, दत्तात्रय चव्हाण, गणेश शिंदे, संदीप चौधरी, बाबासाहेब चौधरी, भूषण पाटणकर, विकास शिर्के, गोरख आढाव, संदीप पवार, हर्षद पवार, संदीप संसारे, नागनाथ उमाप, गणेश भापकर, आदी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*