Type to search

Featured सार्वमत

संगमनेरातील 20 गावांना मीटरने पाणी

Share

1 जूनपासून अंमलबजावणी, पाणीचोरीला आळा बसणार

तळेगाव दिघे (वार्ताहर)- संगमनेर तालुक्यातील दुष्काळपीडित तळेगाव भागाला पाणीपुरवठा करणार्‍या तळेगाव प्रादेशिक योजनेअंतर्गतच्या वीस लाभार्थी गावांना 1 जूनपासून मीटरने पाणीपुरवठा केला जाणार आहे. मीटर बसविल्याने पाणीचोरी व ग्रामपंचायतींकडून नळ कनेक्शन लपविण्यास आळा बसेल. याकामी योजनेअंतर्गत मुख्य जलवाहिन्यांना मीटर बसविण्यात आले असल्याची माहिती तळेगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजना समितीचे सचिव सुरेश मंडलिक यांनी दिली.

तळेगाव भागाला पाणीपुरवठा करणार्‍या तळेगाव प्रादेशिक योजनेअंतर्गतच्या वीस गावांमध्ये पाणी पुरवठ्याची अनागोंदी सुरू होती. काही गावांना अधिक पाणीपुरवठा करण्यात येत होता, मात्र पाणीपट्टी कमी भरण्याच्या उद्देशाने नळ कनेक्शन संख्या कमी दाखविण्याचा प्रकार सुरू होता. त्यामुळे मुख्य जलवाहिन्यांना मीटर बसवून ग्रामपंचायत अंतर्गतच्या टाक्यांमध्ये पाणी सोडण्याची बाब योजनेच्या विचाधीन होती. आता तळेगाव प्रादेशिक योजनेअंतर्गतच्या वीस गावांत पाण्याच्या टाक्या व मुख्य जलवाहिन्यांना मीटर बसविण्यात आले आहेत.

1 एप्रिलपासून मीटरने पाणीपुरवठा करण्याची अंमलबजावणी केली जाणार होती, मात्र आचारसंहिता असल्याने एक जूनपासून अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे योजनेअंतर्गतच्या गावांना यापुढे नळकनेक्शनऐवजी आता मीटरनुसार पाणीपट्टी भरावी लागणार आहे. या प्रादेशिक योजनेंतर्गतच्या काही ग्रामपंचायती नळ कनेक्शन संख्या कमी दाखवून अल्प प्रमाणात पाणीपट्टी भरीत होत्या. त्यामुळे नियमित पाणीपट्टी भरणार्‍या गावांना त्याची भरपाई करावी लागत होती. यापुढे मीटरने पाणी पुरविले जाणार असल्याने त्याप्रमाणात पाणीपट्टी भरावी लागेल. त्यातून पाणीचोरीस आळा बसेल, असे योजना समितीचे सचिव सुरेश मंडलिक यांनी सांगितले.

या गावांचा समावेश
तळेगाव दिघे, पारेगाव खुर्द, नान्नजदुमाला, पारेगाव बुद्रुक, वडझरी बुद्रुक, वडझरी खुर्द, तिगाव, कासारे, कौठेकमळेश्वर, मेंढवण, चिंचोलीगुरव, देवकौठे, करूले, वडगावपान, लोहारे, मिरपूर, निळवंडे, पोखरीहवेली, माळेगाव हवेली, सोनोशी सहित वीस गावांना मीटरने पाणी पुरविले जाणार आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!