Type to search

Featured सार्वमत

कांबळे, लोखंडे, वाकचौरेंचा भेटीगाठींवर भर

Share

थोरातांच्या घोड्यावर कांबळे स्वार लोखंडेंना मतदारांकडून अपेक्षा

संगमनेर (प्रतिनिधी)- शिर्डी लोकसभा मतदार संघासाठी संगमनेर विधानसभा मतदारसंघात घोषित उमेदवारांनी तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत. माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या ताकदीवर काँग्रेस आघाडीचे उमेदवार आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी कार्यकर्त्यांशी संपर्क वाढविला आहे. तर शिवसेनेचे उमेदवार खा. सदाशिव लोखंडे यांनी देखील तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत मतदारांशी संपर्क साधला आहे. सध्या गाठीभेटींना वेग आल्याचे दिसून येत आहे. मागीलवेळी लोखंडे यांना थोरात-विखेंनी मदत केल्याचे लोखंडे यांनी जाहीरपणे एका कार्यक्रमात सांगितले होते. मात्र, आता कांबळे थोरातांच्या घोड्यावर स्वार झाले आहेत. मागीलप्रमाणे थोरातांकडून लोखंडेंना मतदानरुपी मिळणारा खुराक कमी होणार असल्याने आता लोखंडे की कांबळे याकडे सर्वांचे लक्ष आहे.

शिर्डी लोकसभा मतदारसंघात उमेदवारीवरून मोठ्या घडामोडी घडल्या. अखेर उमेदवार्‍या जाहीर झाल्या आणि कार्यकर्त्यांनी मोकळा श्‍वास घेतला. आता आपला उमेदवार विजयी व्हावा, यासाठी कार्यकर्ता कामाला लागला आहे. माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांनी तालुक्यात बैठका सुरू केल्या आहेत. संगमनेरात थोरात यांच्या कार्यालयासमोरच कांबळे यांचे प्रचार कार्यालय सुरू झाले. तर कांबळे यांनी तालुक्यात बैठकांना सुरुवात केली. पठारभागातील काही गावांना कांबळे यांनी भेटी देत कार्यकर्ते, मतदार यांच्याशी संवाद साधला. जनतेसाठी सदैव उपलब्ध राहणार असल्याचा विश्‍वास कांबळे यांनी मतदारांना दिला आहे. गत आठ दिवसांपासून कांबळे यांनी संगमनेर तालुका पिंजल्याचे दिसते.

तर खा. सदाशिव लोखंडे यांनी संगमनेरात येऊन कार्यकर्ते, पदाधिकार्‍यांची बैठक घेतली. व्यापारी हॉलमध्ये झालेल्या बैठकीतून खा. लोखंडे यांनी पाण्यावर राजकारण करण्यापेक्षा शेतकर्‍यांच्या शेतात पाणी पाठविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगत निळवंडे, नाबार्ड, महामार्ग, वीज, पाणी प्रश्‍न मार्गी लावल्याचे सांगितले. केलेली कामे कार्यकर्त्यांनी मतदारांपुढे मांडावी, असे आवाहन त्यांनी केले. सन 2005 मध्ये समन्यायी पाणीवाटप कायदा झाला हा कायदा रद्द करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे सांगत त्यांनी पुन्हा एकदा शेतकर्‍यांसाठी संघर्षाची भूमिका दर्शविली आहे. मागील लोकसभा निवडणुकीत जनतेने मला सर्वाधिक मते दिली, त्यामुळेच मला पुन्हा शिवसेनेकडून संधी मिळाली, आताही जनता आपल्यावर विश्‍वास दाखवेल अशी अपेक्षा लोखंडे यांना आहे.

शिर्डी लोकसभा मतदारसंघात येणारा संगमनेर विधानसभा मतदारसंघ तसा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. असे असतानाही गेल्या तीन लोकसभा निवडणुकीत येथे युतीच्या उमेदवाराला मोठे मताधिक्य देण्यात आले आहे. संगमनेर तालुक्यावर आ. थोरात यांच्या नेतृत्वाखाली एकहाती सत्ता आहे. त्यामुळे काँग्रेसचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांना संगमनेरातून सर्वाधिक मतदान होण्यासाठी स्थानिक काँग्रेस कार्यकर्ते सरसावले आहेत. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची असलेली लोकप्रियता लोखंडे यांना लोकसभा निवडणुकीत कितपत साथ देईल, हे येणारा काळच ठरवेल. बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार डॉ. अरुण साबळे व भाकपचे उमेदवार बन्सी सातपुते यांच्या उमेदवारीचा फटका कुणाला बसणार हे औत्सुक्याचे ठरणार आहे. माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे देखील शिर्डी मतदार संघातून पुन्हा एकदा उमेदवारी करण्याच्या तयारीत आहेत. यंदा त्यांना कुठल्याही पक्षाने उमेदवारी दिली नसल्याने ते अपक्ष निवडणूक लढतील असे वाटते. या मतदारसंघात त्यांचा दांडगा जनसंपर्क असल्याने या लढतीत कोण बाजी मारेल याची उत्सुकता संगमनेरकरांना आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!