Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

गीता महोत्सवानिमित्त संगमनेरात दिमाखदार शोभायात्रा

Share

संगमनेर (प्रतिनिधी)- दिमाखदार, शिस्तबद्ध व उत्साही शोभायात्रेने संगमनेरमध्ये गीता महोत्सवास काल प्रारंभ झाला. या शोभायात्रेवर संगमनेरकरांनी ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करून उत्स्फूर्तपणे स्वागत केले. सकाळी 9 वाजता अकोले नाका येथील मालपाणी विद्यालयातून शोभायात्रेस प्रारंभ झाला. समारोप दुपारी 12 वाजता जाणता राजा मैदानावर झाला.

शोभायात्रेच्या मार्गावर काढण्यात आलेल्या सुंदर रांगोळ्या, महाभारतातील पौराणिक देखावे असलेले चित्ररथ, सजविलेले घोडे, उंट, ढोल ताशा पथक, ध्वज नृत्य पथक, भजनी मंडळ, गीता ग्रंथ पालखी, देशाच्या अनेक भागातून मोठ्या संख्येने आलेले गीता परिवाराचे कार्यकर्ते आणि विशेष सजविलेल्या रथातून सहभागी झालेले स्वामी गोविंददेव गिरी महाराज यामुळे संपूर्ण शहराला उत्सवाचे स्वरूप आले होते. संपूर्ण गीता कंठस्थ करणार्‍या सुवर्णपदक विजेत्या सन्मानार्थी विद्यार्थ्यांना सजविलेल्या तीन वाहनांतून मानाची पगडी व सुवर्णपदक गळ्यात घालून सहभागी करून घेण्यात आले होते.

राजस्थान युवक मंडळ, लायन्स क्लब ऑफ संगमनेर सफायर, इनरव्हील क्लब, माहेश्वरी पंच ट्रस्ट, ब्राह्मण प्रतिष्ठान, पद्मशाली समाज मंडळ, राउळ समाज मंडळ, श्रीकृष्ण मंदीर मेनरोड व्यापारी मंडळ, तीळवण तेली समाज मंडळ, बाजारपेठ मित्र मंडळ, संगमनेर मर्चंट्स बँक, मालपाणी उद्योग समूह, सोमवंशीय सहस्त्रार्जुन क्षत्रिय समाज मंडळ, नवघर गल्ली मित्र मंडळ, साईनाथ चौक युवक मंडळ, व्यापारी प्रतिष्ठान तसेच संस्थांनी स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांना माल्यार्पण करून अभीष्टचिंतन केले.

भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शाम जाजू व त्यांच्या पत्नी प्रतिभा, सुपुत्र संदेश, मंडळाचे प्रमुख राजेश चौधरी यांनी शोभायात्रेचे स्वागत करून स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांना माल्यार्पण करून त्यांचे अभीष्टचिंतन केले. गीता परिवाराचे कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी यांच्यासह मालपाणी परिवारातील सर्व सदस्य तसेच संगमनेर मधील अनेक नागरिक या शोभायात्रेत सहभागी झाले होते. महिला आणि युवतींचा सहभागही लक्षणीय होता. शोभायात्रेच्या मार्गावर अनेक स्वयंसेवी संस्थांनी जलपान आणि चहापान व सरबताची व्यवस्था केली होती.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!