संगीता बर्डे नेवाशाच्या प्रथम नगराध्यक्ष

0

उपनगराध्यक्षपदी ‘क्रांतीकारी’चे नंदकुमार पाटील विजयी

नेवासा (तालुका प्रतिनिधी) – अपेक्षेप्रमाणे नेवासा नगर पंचायतीच्या पहिल्या नगराध्यक्षपदी भाजपच्या सौ. संगीता दत्तात्रय बर्डे या बिनविरोध तर उपनगराध्यक्षपदी क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे नंदकुमार पाटील विजयी झाले.

नेवासा नगर पंचायतीच्या पहिल्याच नगराध्यक्ष पदाची निवड शांततेत पार पडली. आरक्षित जागेवर भाजपचे उमेदवार निवडून आल्याने भाजपच्या अनुसूचित जमातीच्या नगरसेविका सौ. संगीता दत्तात्रय बर्डे या बिनविरोध प्रथम नगराध्यक्ष झाल्या. त्यांना सूचक म्हणून रणजित सोनवणे तर अनुमोदक म्हणून दिनेश व्यवहारे हे होते.

उपनगराध्यक्षपदासाठी मात्र चमत्कार होईल असे वातावरण निर्माण करण्यात आले होते. प्रत्यक्षात तसे घडले नाही. 17 सदस्यांच्या नगर पंचायतीमध्ये 9 नगरसेवक माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे निवडून आले आहेत तर भाजपने गटनोंदणी केलेल्या मध्ये भाजपचे 6, अपक्ष म्हणून निवडून येवून नंतर भाजपा प्रवेश केलेला 1 तसेच एका जागेवर विजयी झालेला काँग्रेसचे उमेदवार अशा 8 सदस्यांचा समावेश आहे.

उपनगराध्यक्ष पदासाठी क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे नंदकुमार पाटील यांना 9 तर विरोधी गटांकडून इंदिरा काँग्रेसच्या नगर सेविका सौ. शालिनीताई सुखधान यांना 8 मते पडली. नंदकुमार पाटील उपनगराध्यक्षपदी निवडून आल्याचे निवडणूक अधिकार्‍यांनी घोषीत केले.

दोन्ही पदांची निवड जाहीर होताच दोन्ही बाजूंच्या समर्थकांनी गुलाल उधळत, फटाके फोडून व पेढे वाटून आनंद व्यक्त केला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रांताधिकारी उज्वला गाडेकर तर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नगरपंचायतचे मुख्याधिकारी संदीप भोळे यांनी काम पाहिले.

LEAVE A REPLY

*