संगमनेरात टोमॅटो व्यापार्‍याचे 4 लाख 20 हजार लांबविले

0
संगमनेर (तालुका प्रतिनिधी) – तालुक्यातील पिंपळगाव देपा येथील टोमॅटो व्यापारी संभाजी राऊत यांचे 4 लाख 20 हजार रुपये ब्रीझा गाडीतून चोरट्याने लांबविल्याची घटना संगमनेरात घडल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
संभाजी प्रकाश राऊत हे काल मंगळवारी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास पांडुर्ली जि. नाशिक येथे टोमॅटो माल भरण्याकरिता पैसे काढण्यासाठी साकूर फाट्याहून संगमनेरात आले. आयसीआयसीआय बँकेतून त्यांनी 4 लाख 90 हजार रुपये काढले. त्यातील 70 हजार रुपये हे त्यांनी त्यांच्याकडील कर्मचार्‍याकडे दिले.
उरलेले 4 लाख 20 हजार रुपये एका प्लॅस्टिक पिशवीत घेऊन ते त्यांची ब्रीझा गाडीकडे आले. पैसे गाडीत घेऊन त्यांचा व्यापारी मित्र ज्ञानेश्‍वर गाडेकर (रा. घारगाव) व ते स्वत: हे बँकेपासून संगमनेर मार्केट यार्डमध्ये गेले. तेथून ते दुपारी 1.15 वाजता मित्रासह पांडुर्ली येथे गेले. तेथे जाऊन टोमॅटो खरेदीचे पैसे शेतकर्‍यांना देण्यासाठी ब्रीझा गाडीत शीटखाली ठेवलेल्या प्लॉस्टिक पिशवीतील पैसे काढण्याचा प्रयत्न केला असता त्यांना तेथे पैसे मिळून आले नाहीत.
पैसे चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर संभाजी राऊत हे पुन्हा संगमनेरला आले. त्यांनी पुन्हा बँकेत व मार्केट यार्डमध्ये जाऊन चौकशी केली मात्र पैशांची पिशवी मिळून आली नाही. तेव्हा 4 लाख 20 हजार रुपये चोरीला गेल्याची त्यांची खात्री झाली.
याबाबत संभाजी राऊत यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 234/17 भारतीय दंड संहिता 379 नुसार दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

LEAVE A REPLY

*