Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

संगमनेर-अकोलेत मुसळधार, नगरमध्ये दमदार

Share

शेतांचे झाले तलाव । अंकुरलेल्या पिकांना जिवदान । शेतकरी सुखावला

अहमदनगर (प्रतिनिधी) – राज्यात कोकण, नागपूर, औरंगाबाद, हदपसरसह अन्य ठिकाणी पावसाचे पुनरागमन झाले आहे. नगर जिल्ह्यातील संगमनेर आणि अकोले तालुक्यात वीजांच्या कडकडाटासह वादळी मुसळधार पाऊस झाला. नगर तालुक्यातही दमदार हजेरी लावली. जिल्ह्याच्या काही भागात हलकासा पाऊस झाला. पाऊस पुन्हा पडता झाल्याने अंकुरलेल्या पिकांना जीवदान मिळाल्याने या भागातील शेतकरी सुखावला आहे. जिल्ह्याच्या अन्य भागात अजूनही जोरदार पावसाची प्रतिक्षा आहे.

संगमनेर शहरासह तालुक्यात मुसळधार

संगमनेर शहरासह तालुक्यातील सर्वच भागात काल शुक्रवारी सायंकाळी मुसळधार पाऊस झाला. तब्बल तीन तास पावसाने जोरदार हजेरी लावल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले. शहरातील सर्वच रस्ते ओसंडून वाहत होते. गेल्या दोन आठवड्यापासून पावसाने दडी मारली होती. मात्र कालच्या पावसाने शेतकर्‍याने पेरलेल्या पिकांना जीवदान मिळाले आहे.

पाऊस सुरू झाल्यानंतर वीज प्रवाह खंडीत करण्यात आला होता.काल दिवसभर उकाडा जाणवत होता. सायंकाळी ढगांनी गर्दी केली. झालर धरलेल्या ढगांनी सायंकाली बरसने सुरू केले.  क्षणात पाणीच पाणी झाले. नवीन नगर रोडला प्रचंड पाणी वाहत होते. गुडघ्या इतक्या पाण्यामुले वाहन चालविणे मुश्किल होते. मालदाड रोड बाजूने येणार्‍या रस्त्याने प्रचंड पाणी वाहत होते.

बस स्थानकाजवलील गटारी तुडुंब भरून वाहत होत्या. रस्त्याने पाणी असल्याने नागरीकांना अदाज येत नव्हता. त्यामुळे काही जण गटारीतही पडले. बस स्थानकाच्या कॉर्नरजवलील गटारीवर ढापे टाकले नसल्याने अंदाज येत नव्हता.

संगमनेर तालुक्यातील बोटा, घारगाव, चंदनापुरी, सावरगांव तल, देवगांव, जोर्वे, धांदरफल, राजापूर, सुकेवाडी, खांजापुर, घुलेवाडी, मालदाड, चिकणी, परिसरात दमदार पाऊस झाला. पाऊस नसल्याने मका, घास, कडवळ यांसारख्या चारा पिकांनी माना टाकल्या होत्या. शेतकरी हवालदिल झाला होता. पिण्यासह जनावरांच्या चार्‍याचा प्रश्न गंभीर झाला होता.

काल झालेल्या पावसाने सुकेवाडीकडून संगमनेरकडे वाहणारा ओढा तुडंब पाण्याने भरला. दुधगंगा कॉर्नर परिसरातील राहत्या घरातंमध्ये पाणी घुसले. पुनर्वसन कॉलनी परिसरात मालदाड रोड, पावबाकी परिसरातुन पाण्याचा लोंढा येत होता. दुधगंगा कार्नरजवळील नाल्याची संगमनेर नगर पालिकेने पावसाळ्यापुर्वी सफाई केली. परंतु पाणी तुंबल्याने या पाणी पुढे जात नव्हते.

मिरा हॉटेल परिसरातील जमीनीचे बांध फुटले. या परिसरात दमदार पावसाचे आगमन झाल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण दिसत आहे. चार वर्षांपुर्वी बैल पोळ्या दिवशी पावसाने केलेल्या थैमानाची अनेकांना आठवण झाली. तालुक्याच्या पठारभागातही पावसाने जोरदार हजेरी लावली.

अकोले तालुक्यात दीड तास जोरदार पाऊस

अकोले तालुक्यातील प्रवरा, मुळा व आढळा परिसरात बहुतांश ठिकाणी सायंकाळी सुमारे तास -दीड तास पावसाने जोरदार बॅटिंग केली. अकोले शहर व परिसरात सुमारे एक ते दीड तास जोरदार पाऊस पडला.

प्रचंड उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे दिलासा मिळाला आहे तर शेतकरी राजा गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत होता. या पावसाने थोड्याच वेळात रस्त्यावर व शेतात पाणीच पाणी साठले होते. थोड्याच वेळात गटारी वाहत्या झाल्या.
गेल्या दोन आठवड्यापासून अकोले तालुक्यात पावसाने उघडीप दिली होती.

मुसळधार पावसाने शेतांचा झाला तलाव. (छाया-ज्ञानेश्वर खुळे)

शुक्रवारी दुपारी कडाक्याचे ऊन पडले होते. सायंकाळच्या सुमारास ढग भरून आले. सायंकाळी 6 वाजता अकोले शहर व परिसरात जोरदार पावसास सुरुवात झाली.साडे सात वाजेपर्यं कमी अधिक प्रमाणात पाऊस कोसळत होता.रात्री उशिरा पर्यंत अकोले शहर व परिसरात पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळत होत्या.

तालुक्यातील गणोरे येथील माध्यमिक शाळेच्या परिसरात काळे वस्ती जवळच सिन्नर-संगमनेर एसटी बस समोर बाभळीचे झाड पडले. जेसीबीच्या सहाय्याने झाड बाजुला करण्यात आले.त्यानंतर रस्तावरील वाहतूक सुरळीत झाली.

अकोले शहरासह कळस बुद्रुक, सुगाव,कुंभेफळ, सुगाव, रेडे, गर्दनी, उंचखडक, टाकळी, ढोकरी, इंदोरी, मेहेंदुरी, रुंभोडी आदी प्रवरा परिसरातील गावांत कमी अधिक पाऊस झाला.या पावसामुळे मात्र कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नाही. रात्री राजूर व परिसरात पावसाची रिमझिम सुरू झाली होती.

मुळा, भंडारदरा पाणलोटातही हजेरी 

मुळा आणि भंडारदरा पाणलोट क्षेत्रात पावसाच्या दीर्घ विश्रांती नंतर काल पावसाने हजेरी लावली. दिवसभराच्या उकड्यांनंतर दुपारी मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळल्या.

गेल्या आठवड्या पासून पावसाने दांडी मारल्याने शेतकरी चिंतातूर झाले होते. भर पावसाळ्यात उन्हाचे चटके बसत होते. यामुळे उभी पिके करपून जातात की काय अशी चिंता पसरली असताना दुपार नंतर आकाशात काळे ढग जमा झाले आणि पावसाच्या धारा कोसळू लागल्या. यामुळे शेतकरी आनंदी झाला आहे.

पाऊस गायब झाल्याने  मुळा नदीचा विसर्ग कमी झाला होता. काल सकाळी आठ वाजता कोतुळ येथून मुळा धरणाकडे पाण्याचा विसर्ग 886 क्युसेक होता तर सायंकाळी सहा वाजता 795 कुसेक होता. दरम्यान, भंडारदरा पाणलोटातही सायंकाळी 7 वाजेपासून हलकासा पाऊस सुरू झाला होता. दुपारी काहीकाळ पावसाने जोरदार हजेरी लावली होती.

साकतखुर्द, दहीगाव, शिराढोणमधील शेतकर्‍यांना दिलासा

नगर तालुक्यातील साकतखुर्द, दहीगाव, शिराढोण, वाळुंज, पारगाव, वाटेफळ, तुक्कड ओढा, दरेवाडी आदी गावात पावसाने दमदार हजेरी लावली असून तब्बल दीड महिन्याच्या विश्रांती नंतर आलेल्या पावसाने बळीराजा सुखावला आहे.

रोहिणी, मृगा पाठोपाठ जून महिना तसेच जुलै महिन्याचा पंधरवडा कोरडा गेल्या नंतर शुक्रवारी सायंकाळी झालेल्या पावसामुळे हवालदिल झालेल्या बळीराजाला दिलासा मिळाला.

सुरवातीला काही ठिकाणी काही काळ सरी कासेळल्या तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस झाला. नंतर पाऊस येईल या आशेवर शेतकर्‍यांनी पेरणीची लगबग केली. तर साकतखुर्द, दहिगाव, वाटेफळ, शिराढोण, वाळुंज पारगाव याठिकाणी पावसाअभावी पेरणीच झाली नाही. तर ज्या ठिकाणी पेरणी पुरता पाऊस झाला तेथिल शेतकर्‍यांनी मूग, बाजरी, मका, कडवळ आदी पेरण्याचे धाडस केले.

यांनतर पावसाने पाठ फिरविल्याने शेतकर्‍यांवर दुबार (पान 10 वर) पेरणीचे संकट पडले. खरीप हातचा जाऊ नये म्हणून शेतकर्‍यांनी खासगी सावकाराकडून कर्ज काढून महागडे बी बियाणे, खते घेतली होती. पावसाने अचानक दडी मारल्याने माना टाकलेल्या पिकांना जगवायचे कसे या प्रश्नाच्या कचाट्यात शेतकरी असताना शुक्रवारी झालेल्या पावसामुळे बळीराजाला दिलासा मिळाला आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!