संगमनेरच्या तहसिलदारांचे शासकीय वाहन झाले वयोवृद्ध

0
संगमनेर (तालुका प्रतिनिधी)-संगमनेर तालुक्याचे तहसीलदार साहेबराव सोनवणे यांचे शासकीय वाहन एमएच 17 क्यू 99 या टाटा सुमो हे वाहन आता वयोवृद्ध झाले असून ते सध्या नादुरुस्त आहे. त्यामुळे कोटी रुपये खर्च करुन बांधलेल्या नव्या तहसिल शासकीय कार्यालयाला आता नव्या शासकीय वाहनाची गरज आहे. तालुक्यात कुठे शासकीय कामासाठी जायचे असेल, तर त्यांना खासगी गाडीचा किंवा मोटारसायकलीचा आधार घ्यायची वेळ आली आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुका हा सर्वाधिक विस्ताराने खूप मोठा आहे. तालुक्यातील गावे असून वाडयावस्त्या आहेत. या गावांमध्ये महसुली कामे, मंत्र्यांचे दौरे, तालुक्यात होणारे विविध आंदोलने झाल्यास तहसिलदार यांना त्या ठिकाणी जाणे अत्यंत गरजेचे असते किंवा कुठे भेट द्यायची असेल, तर तहसीलदार सोनवणे यांना खासगी वाहनाने किंवा त्या गावात असणार्‍या तलाठी यांच्या मोटारसायकलीवरून त्या ठिकाणी जावे लागते.
पण तहसिलदारांचे शासकीय वाहन एक वर्षापासून नविन नगर रोडवरील प्रांत कार्यालयाच्या आवारात नादुरुस्त अवस्थेत धुळखात पडून आहे. तालुक्यात मुळा व प्रवरा या दोन नद्या जात असून याठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाळू उपसा होत आहे. अशावेळी तहसिलदार यांना त्या ठिकाणी कारवाई करण्यासाठी रात्री-बेरात्रीच्या वेळी जायचे असेल तर त्यावेळी त्यांना खासगी वाहनाचाच आधार घ्यावा लागतो.
याउलट तालुक्यात अचानक आपत्ती व्यवस्थापनाची घटना उद्भवल्यास अशावेळी तहसिलदार यांनी त्या ठिकाणी कसे पोहचतील असा प्रश्‍न आता निर्माण झाला आहे. वर्षापासून तहसिलदार यांचे शासकीय वाहन नादुरुस्त आहे. वास्तविक पाहता यापुर्वीच तहसिलदार यांना नविन वाहन मिळणे गरजेचे होते. परंतु अद्यापही वाहन मिळाले नाही. नविन शासकीय वाहन मिळावे म्हणून तहसिलदार सोनवणे यांनी वरिष्ठांकडेही पाठपुरावा केला आहे. नविन शासकीय वाहन मिळण्यासाठी तहसिलदार यांना अजून किती दिवस वाट पहावी लागणार आहे? असा प्रश्‍नही आता यानिमित्ताने निर्माण झाला आहे.

 

LEAVE A REPLY

*