सरकारने आशा सेविकांचे मानधन वाढवावे : आ. थोरात

0

संगमनेर (प्रतिनिधी) – प्रत्येक माणसासाठी आरोग्य हे सर्वांत महत्त्वाचे आहे. तळागळातील सर्वसामान्यांच्या आरोग्याची काळजी घेणार्‍या आशा सेविकांचे काम गौरवास्पद असून सरकारने त्यांचे मानधन वाढविलेच पाहिजे, अशी आग्रही मागणी शासनाकडे माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

 

संगमनेर पंचायत समिती येथे आशा सेविका दिनानिमित्त आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी सभापती निशाताई कोकणे होत्या. तर व्यासपीठावर उपसभापती नवनाथ आरगडे, अजय फटांगरे, मिलिंद कानवडे, शांताबाई खैरे, मीराताई शेटे, प्रियंका गडगे, बेबीताई थोरात, सुनंदा जोर्वेकर, विष्णू रहाटळ, सदाशिव वाकचौरे, किरण मिंडे, सीताराम राऊत, शिवाजीराव थोरात, गट विकास अधिकारी सुरेश शिंदे, डॉ. सुरेश घोलप, दत्तात्रय कोकणे, अशोक सातपुते, सौ. कानवडे आदी उपस्थित होते.

 

आमदार थोरात म्हणाले, ग्रामीण भागात नागरिक आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. विशेषत: महिला स्वत:च्या आरोग्याची अजिबात काळजी घेत नाहीत. परंतु आरोग्य जनजागृती बरोबरच आशा सेविका ह्या तात्काळ सेवा देतात. मदतीला धावतात त्यांच्या कामाची दखल घेतली गेली पाहिजे. या महिला भगिनींचे अनेक प्रश्‍न प्रलंबित आहे. विशेषत: त्यांचे मानधन तातडीने वाढविलेच पाहिजे. यासाठी आपण सरकारकडे पाठपुरावा करू तसेच विधानसभेतही सरकारला जाब विचारू असा विश्‍वास दिला.

 

त्याचबरोबर शासनाच्या अनेक योजना असतात. त्या योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहचवून जास्तीत जास्त नागरिकांना लाभ मिळवून द्यावा. संघटीत कामगार यांना बचत गट मोठे बळ देईल. यासाठी ही आशा सेविकांनी पुढाकार घ्यावा. नागरिकांच्या आरोग्याबाबत अधिक जागृकता दाखविताना जनतेची कामाच्या माध्यमातून सेवा करा असे आवाहनही त्यांनी केले आहे.
सभापती निशाताई कोकणे म्हणाल्या, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समितीच्या माध्यमातून जास्तीत जास्त चांगले काम सुरू आहे. आरोग्य विभागाने अधिक दक्षता घेताना तालुक्यातील सर्व आरोग्य केंद्रात आधुनिकता आणावी. नागरिकांना तात्काळ सेवा द्याव्यात.

 

आशा सेविका ह्या ग्रामीण भागात चांगले काम करीत असून प्रशासनाच्यावतीने त्यांना जास्तीत जास्त मदत करा असे आवाहनही त्यांनी केले.

 

उपसभापती नवनाथ आरगडे म्हणाले, नागरिकांना चांगल्या सुविधा देणे हेच आपले प्राधान्य असून जनतेला अथवा आरोग्य सेविकांना काही अडचणी आल्यास तात्काळ पदाधिकार्‍यांशी संपर्क करावा. याचबरोबर आ. थोरात यांच्या यशोधन कार्यालयातूनही गाव पातळीवरील समस्या सोडविण्यासाठी मदत करता येईल. यावेळी प्रियंकाताई गडगे, विष्णू रहाटळ, मिलिंद कानवडे यांनीही सूचना दिल्या. यावेळी तालुक्यातील आशा सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

*