संगमनेर : भूमिअभिलेखच्या गलथान कारभाराबाबत उपसंचालकांकडून चौकशीचे आदेश

0
सुकेवाडी (वार्ताहर) – संगमनेर येथील भूमिअभिलेख कार्यालयाच्या गलथान कारभाराबाबत नाशिक उपसंचालकांकडे संघर्ष सामाजिक संघटनेने तक्रार केली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत संगमनेर भूमी अभिलेख अधिकार्‍यांना ताकीद देण्यात आली असून संघटनेच्यावतीने नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
तसेच कार्यवाहीत हलगर्जीपणा केल्यास कडक कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही उपसंचालकांनी दिला आहे. त्यानुसार भूमीअभिलेख अधीक्षक नगर यांना आदेश प्राप्त झाले आहेत.
संगमनेर भूमीअभिलेख कार्यालयात तालुक्यातून येणार्‍या नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते.
अधिकार्‍यांच्या गलथान कारभारामुळे अनेक कामे प्रलंबित राहत असल्याने संघर्ष सामाजिक संस्थेच्यावतीने कार्यालयातील अधिकार्‍याच्या गलथान कारभाराविरुद्ध आंदोलनाचा इशारा देत नाशिकच्या उपसंचालकांकडे तक्रार केली. नागरिकांची कामे वेळेवर होत नाहीत, अशा तक्रारी होत्या.
या प्रश्‍नाबाबत सामाजिक जबाबदारी म्हणून संघर्ष सामाजिक संघटनेच्यावतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. या कार्यालयाबाबत असणार्‍या तक्रारींचे निवेदन उपसंचालक नाशिक प्रदेश नाशिक, भूमी अभिलेख यांच्याकडे पाठविण्यात आले होते. संघर्ष सामाजिक संस्थेच्या 8 सप्टेंबर 2017 च्या तक्रार अर्जाची दखल घेत उपसंचालक भूमी अभिलेख कार्यालयाकडून जिल्हा अधीक्षक भूमीअभिलेख अहमदनगर यांना 13 सप्टेंबर 2017 रोजी आदेश देण्यात आले आहेत.
सदरचा सामाजिक संस्थेचा तक्रारी अर्ज इकडील कार्यालयास प्राप्त झाला आहे. सदर तक्रारी अर्जात उपस्थितीत केलेल्या प्रत्येक मुद्याबाबत आपण सविस्तर चौकशी करून नियमाप्रमाणे कार्यवाही करावी तसेच अर्जदारांना आपल्या स्तरावरून जरूर ती सुनावणीची संधी देऊन त्यांच्या तक्रारीबाबत शहानिशा करावी.
त्या अंती समर्पक उत्तर देऊन केलेल्या कार्यवाहीचा अहवाल आपल्या स्वयंस्पष्ट अभिप्रायासह इकडील कार्यालयास सादर करावा, याप्रकरणी सदरचा अहवाल सादर करण्यास विलंब होणार नाही याची कटाक्षाने काळजी घ्यावी, सदरचा अहवाल पाठविण्यात विलंब केल्यास विलंब अधिनियम 2005 अन्वये कार्यवाही करण्यात येईल, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
तसेच जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख अ. नगर यांनी या वरिष्ठांच्या आदेशाची दखल घेऊन उपअधिक्षक कार्यालयास चौकशीचे आदेश 26 सप्टेंबर 2017 ला देण्यात आले. सदर चौकशी पंधरा दिवसांत करून अहवाल सादर करण्यात यावा, असा आदेश करण्यात आलेला आहे,
अशी माहिती संघर्ष सामाजिक संघटनेचे अध्यक्ष संग्राम जोंधळे यांनी दिली. याकामी संघटनेचे उपाध्यक्ष अब्दुला चौधरी, शिवपालसिंह ठाकूर, उमेश सटाणकर, बी. एम. महाजन, नागेश परदेशी, भारत पडवळ, अरुण शेटे, अण्णू फिटर, शिवाजी घोडेकर, दस्तगीर शेख आदींनी पाठपुरावा केला.

LEAVE A REPLY

*