संगमनेर फेस्टिव्हलमध्ये राज्यस्तरीय समूहनृत्य स्पर्धा

0
संगमनेर (प्रतिनिधी) – राजस्थान युवक मंडळ व मालपाणी उद्योग समूहाद्वारा दरवर्षी होणार्‍या संगमनेर फेस्टिव्हलला यंदा 26 ऑगस्ट रोजी सुरुवात होणार आहे. संगमनेरचा मानबिंदू ठरलेल्या या महोत्सवात सलग दोन दिवस स्थानिक कलाकारांना राज्यस्तरीय मंच उपलब्ध करून देणारी समूहनृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. दोन गटांत होणार्‍या या स्पर्धेसाठी सांघिक आणि वैयक्तिक अशी एकूण दीड लाखाची भरघोस बक्षिसे ठेवण्यात आली असल्याची माहिती संगमनेर फेस्टिव्हलचे अध्यक्ष मनीष मालपाणी यांनी दिली.
संगमनेरचा सांस्कृतिक वारसा जोपासताना राजस्थान युवक मंडळ व मालपाणी उद्योग समूहाने 10 वर्षांपूर्वी संगमनेर फेस्टिव्हलला सुरुवात केली. संगीत, नृत्य, नाट्य यासह समाज प्रबोधनपर दर्जेदार कार्यक्रमांच्या आयोजनातून अल्पावधीतच हा महोत्सव संगमनेरकरांच्या आवडीचा विषय ठरला. गणेशोत्सवातील सात दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या मेजवानीसह सलग दोन दिवस होणार्‍या शालेय व महाविद्यालयीन गटांच्या समूहनृत्य स्पर्धा म्हणजे स्थानिक कलाकारांसाठी पर्वणीच ठरल्या आहेत.
यावर्षी 26 ऑगस्टरोजी संगमनेर फेस्टिव्हलला दिमाखदार पद्धतीने सुरुवात होत आहे. सात दिवस चालणार्‍या या महोत्सवात सोमवार दिनांक 28 व मंगळवार दिनांक 29 ऑगस्ट रोजी राज्यस्तरीय समूहनृत्य स्पर्धा होणार आहेत. राज्यातील मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, कोल्हापूर, औरंगाबाद अशा मोठ्या शहरांतील कलाकारांच्या सहभागाने गेली 10 वर्ष ही स्पर्धा राज्यात प्रचंड गाजली आहे.
यावर्षीच्या स्पर्धेसाठी दिल्या जाणार्‍या बक्षिसातही आयोजकांनी मोठी वाढ केली असून मोठ्या गटात अनुक्रमे पहिले बक्षीस 21 हजार, दुसरे 15 हजार, तिसरे 11 हजार, चौथे सात हजार तर पाचवे पाच हजारांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. छोट्या गटासाठी अनुक्रमे पहिले 15 हजार, दुसरे 11 हजार, तिसरे सात हजार, चौथे पाच हजार व पाचवे तीन हजार अशी भरघोस बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. याशिवाय विविध नृत्य प्रकारांसाठी प्रोत्साहनपर स्वतंत्र बक्षिसांसह सर्वोत्कृष्ट संकल्पना, सर्वोत्कृष्ट वेशभूषा व सर्वाधिक कलाकारांचा समूह अशी एकूण दीड लाखाची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
9 ते 15 वर्षे वयोगटासाठी लहान समूह व 16 वर्षांपुढील समूहासाठी मोठा सूमह अशा दोन गटांत या स्पर्धा होणार आहेत. नाव नोंदणीसाठी सचिन गाडे (73500 88885) व कुलदीप कागडे (9527320109) यांच्याशी संपर्क साधण्यास सांगण्यात आले आहे. स्पर्धेत सहभागी होणार्‍या लहान गटाची रंगीत तालीम 19 ऑगस्टरोजी तर मोठ्या गटाची 20 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5 वाजता मालपाणी लॉन्स, कॉलेज रोड, संगमनेर येथे होणार आहे.

संगमनेर ङ्गेस्टिव्हल यंदा 10 वर्षांचा होत आहे. संगमनेरचा सांस्कृतिक मानबिंदू म्हणून जनमानसाने डोक्यावर घेतलेल्या संगमनेर फेस्टिव्हलमधून संगमनेरकरांची सांस्कृतिक भूक शमविण्याचा आमचा प्रयत्न आहे. यावर्षी संगीत, नृत्य व नाट्य क्षेत्रांतील दर्जेदार कार्यक्रमांसह सलग दोन दिवस होणार्‍या राज्यस्तरीय समूहनृत्य स्पर्धा विशेष आकर्षण असणार आहे. राज्यभरातील नावाजलेल्या कलाकारांच्या सहभागामुळे यावर्षी ही स्पर्धा अधिक दर्जेदार होईल. यावर्षी छोट्या व मोठ्या गटांच्या सांघिक बक्षिसांसह विशेष प्रोत्साहनपर व वैयक्तिक बक्षिसेही ठेवण्यात आली आहेत. संगमनेर व परिसरातील जास्तीतजास्त नृत्य संघांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे.
मनीष मालपाणी
अध्यक्ष-संगमनेर फेस्टिव्हल

दीड लाखाची भरघोस बक्षिसे..
गेल्या 10 वर्षांपासून सुरू असलेल्या संगमनेर फेस्टिव्हलमधील समूहनृत्य स्पर्धेसाठी यंदा तब्बल दीड लाखाची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. सांघिक बक्षिसांसह यंदा विशेष प्रोत्साहनपर व वैयक्तिक बक्षिसांमध्येही वाढ करण्यात आली आहे. लोकनृत्य अथवा पारंपरिक नृत्य प्रकार, शास्त्रीय नृत्यप्रकार, हिप-हॉप, वेस्टर्न, फ्युजन नृत्यप्रकार, स्पोर्ट्स डांस, काँटेंप्ररी नृत्यप्रकारांसाठीच्या स्वतंत्र बक्षिसांसह सर्वोत्कृष्ट संकल्पना, सर्वोत्कृष्ट वेशभूषा व सर्वाधिक कलाकारांचा समूह अशी एकूण दीड लाखाची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.

LEAVE A REPLY

*