संतप्त ग्रामस्थांचा पोलिसांवर हल्ला

0

कुरण येथे पोलीस व्हॅनवर दगडफेक, पोलीस निरीक्षक ओमासेंना धक्काबुक्की, दोन पोलीस जखमी

 

संगमनेर (प्रतिनिधी) – शहरापासून जवळच असलेल्या कुरणमध्ये गोवंश जनावरांची कत्तल होत असल्याची माहिती मिळाल्याने पोलीस या ठिकाणी छापा टाकण्यास गेले होते. मात्र पोलिसांना चुकीची माहिती मिळाली असून पोलीस बोगस कारवाई करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. तरी देखील पोलीस कारवाईवर ठाम राहिल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी शहर पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे यांना धक्काबुक्की केली. त्यानंतर वातावरण तणावग्रस्त बनले. संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी पोलीस व्हॅनवर देखील दगडफेक करून मारहाण केली. यामध्ये पोलीस कर्मचारी जखमी झालेले आहेत. ही घटना शुक्रवारी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास घडली.
कुरण येथे गोवंश जनावरांची कत्तल सुरु असल्याची माहिती पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे यांना मिळाली. ते पोलीस कर्मचार्‍यांना सोबत घेऊन घटनास्थळी छापा टाकण्यासाठी दाखल झाले. कुरण गावाच्या अलीकडे काहीअंतरावर नासीर अहमद शेख यांच्या गोठ्याजवळ डाळिंबाच्या शेतात 25 ते 30 जनावरे आढळून आली. ही जनावरे कत्तलीसाठी आणली का? अशी विचारणा पोलिसांनी केली. त्यावर संबंधिताने ही जनावरे कत्तलीसाठी आणली नसल्याचे सांगितले. मात्र त्याच्या उत्तरावर समाधान न झाल्याने पोलिसांनी चौकशी सुरुच ठेवत ती जनावरे ताब्यात घेण्यासाठी वाहने बोलविली. त्यामुळे संबंधिताने गावातील ग्रामस्थांना बोलविले. त्यामुळे शेकडोचा जमाव जमा झाला यामध्ये महिलांची संख्याही मोठी होती. या जमावाने कुरणचा रस्ता लोकांनी अडविला.
पोलिसांनी केलेली कारवाई चुकीची आहे असे म्हणत त्यांनी पोलीस निरीक्षक ओमासे यांना घेरावो घातला. त्यांच्या तावडीतून निसटून ओमासे सरकारी वाहनात बसले. मात्र ग्रामस्थांनी त्यांना पुन्हा गाडीच्या खाली ओढत धक्काबुक्की करत गावातील एका देवळाकडे नेले. पुन्हा ओमासे त्यांच्या तावडीतून निसटून पोलीस वाहनात येऊन बसले. मात्र त्यांचा एक कर्मचारी पोलीस नाईक सुपे हे ग्रामस्थांच्या तावडीत सापडले. ग्रामस्थांनी सुपे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ते गंभीर जखमी झाले. तसेच पोलीस हेडकॉन्स्टेबल विठ्ठल गायकवाड हेही मारहाणीत जखमी झाले.

 

दरम्यान या घटनेची माहिती कळताच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अजय देवरे हे फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. ओमासे, चालक मनाळ यांना सरकारी गाडीतून तेथून काढून दिले. पुन्हा ग्रामस्थांनी सरकारी गाडी अडविली, ओमासे हे आमच्याकडून पैसे घेतात व आमच्यावर कारवाई करतात, असा आरोप करत महिलांनी आक्रमक पावित्र घेतला. तर काहींनी अचानक दगडफेक सुरु केली. त्यामुळे डीवायएसपी देवरे यांनी ओमासे यांना घटनास्थळावरून मार्गदस्त केले. त्यानंतर ओमासे यांनी थेट पोलीस ठाणे गाठले.
त्यानंतर डीवायएसपी देवरे यांनी वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान आश्‍वी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश कमाले, घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप निघोट, तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गांगुर्डे, संगमनेर शहरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनय सरवदे, पोलीस उपनिरीक्षक अन्सार इनामदार, गवांडे यांच्यासह मोठा फौजफाटा कुरणमध्ये दाखल झाला. क्षणात कुरणला पोलीस छावणीचे स्वरुप आले. या घटनेची माहिती वार्‍यासारखी कुरणसह संगमनेरात पसरली तशी कुरण येथे व संगमनेर शहर पोलीस ठाण्यात मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी झाली.
दरम्यान कुरण ग्रामस्थांनी एकही जनावर पोलिसांच्या ताब्यात जाऊ दिले नाही. कोणते वाहनही फिरकू दिले नाही. कोणतीही कारवाई न करता पोलीस निरीक्षक ओमासे यांना माघारी यावे लागले.
घटनेची माहिती मिळताच अतिरीक्त पोलीस अधईक्षक रोहिदास पवार हे तातडीने संगमनेरात दाखल झाले. त्यांनी घटनेची माहिती घेतली. जखमी पोलीस नाईक सुपे यांना शहर पोलीस ठाण्यात आणले. श्री. पवार यांनी त्यांच्याकडून माहिती घेऊन जखमी सुपे यांना शहरातील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.
दरम्यान याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

 

कुरण शिवारात कत्तलीसाठी जनावरे आणल्याची माहिती गुप्त खबर्‍याकडून मिळाल्यानंतर कुरण येथे गेलो. तेथे नासीर शेख याच्या गोठ्याजवळील डाळिंबाच्या शेतात 25 ते 30 गाया व वासरे होते. हे ताब्यात घेण्यासाठी आपण संगमनेरहून गाडी बोलविली. परंतु स्थानिकांनी जादा माणसे बोलवून घेऊन आमच्यावर हल्ला केला. त्यात मला धक्काबुक्की झाली. तर एका कर्मचार्‍यास गंभीर मारहाण झाली असल्याचे पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे यांनी सांगितले.

 

 

कुरण येथे कत्तलखाना सुरु असल्याची माहिती वरिष्ठांना मिळाली. त्यानुसार तेथे गेलो असता तेथे जनावरे आढळून आली. ही जनावरे कशासाठी आणली गेली, याची चौकशी करत असताना अचानक तेथील लोकांनी हल्ला केला. पोलीस अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांना शिवीगाळ, धक्काबुक्की केली, त्यात मला जबर मारहाण झाली.
-अशोक सुपे, (जखमी, पोलीस नाईक)

LEAVE A REPLY

*