संगमनेरात एटीएम फोडून २६ लाख लंपास

0
संगमनेर | दि. ७ प्रतिनिधी- शहरातील नाशिक-पुणे महामार्गवरील ऑरेंज कॉर्नर येथील भारतीय स्टेट बँकेचे एटीएम गॅस कटरने तोडून त्यातील २६ लाख ३३ हजारच्या रोकडसह सीसीटीव्ही कॅमेरा अज्ञात चोरट्यांनी लांबविला. ही घटना आज (दि.७) मध्यरात्री २.३० वाजेच्या सुमारास घडली.

शहरातील नाशिक-पुणे महामार्गलगत ऑरेंज कॉर्नर येथे भारतीय स्टेट बँकेचे एटीएम आहे. ग्राहकांच्या मागणीवरून एसबीआय कडून हे नवे एटीएम सुरू करण्यात आले. या परिसरात ग्राहकांची अल्प प्रमाणात वर्दळ असते. त्यामुळे एटीएममध्ये बरेच पैसे शिल्लक होते. शुक्रवार (दि.३) रोजी बँकेमार्फत यामध्ये पैसे भरण्यात आले होते. आज मध्यरात्री २.३० ते ३.४५ वाजेदरम्यान अज्ञात चोरट्यांनी एटीएमला लक्ष केले.

जिल्ह्यासह तालुक्यात चोर्‍यांचे प्रमाण वाढल्याने एसबीआयने एटीएमची सेवा ८ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. बुधवारी ८ वाजता सुरक्षा रक्षक नेहमीप्रमाणे एटीएमचे शटर बंद करून घरी निघुन गेला होता. मध्यरात्रीच्या सुमारास काही अज्ञात चोरट्यांनी एटीएमच्या शटरचे कुलूप गॅसकटरने तोडून आत प्रवेश केला. एटीएम मशीनदेखील गॅसकटरने तोडून त्यातील जवळपास २६ लाख ३३ हजार रूपयांची रोकड लांबविली. तर सीसीटीव्ही कॅमेराही चोरट्यांनी चोरून नेला.

या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिस उपअधिक्षक अशोक थोरात, गुन्हा शाखेचे उपपोलिस निरीक्षक पंकज निकम, सहा. पो. नि. शंकरसिंग राजपुत, पो. कॉ. इस्माईल शेख, गोरक्ष शेरकर, बाळासाहेब आहिरे, विजय पवार आदींसह पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. घटनेचे फुटेज सीसीटाव्ही कॅमेर्‍यातही कैद झाले असल्याने पोलिसांनी तपासाची सुत्रे गतीने हलविले आहेत.

घटनास्थळी नाशिकच्या ठसे तज्ञासह अहमदनगरच्या श्‍वानपथकासही प्रचारण करण्यात आले. श्‍वानपथकाने घटनास्थळापासून जवळच असलेल्या सुयोग कॉलनीपर्यंत माग काढला. यासाठी पोलिस पथकांची निर्मिती करण्यात आली आहे.दरम्यान एसबीआय बँक शाखेचे प्रमुख राम विष्णु वेरजे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेचा तपास पोलिस उपनिरीक्षक पंकज निकम करीत आहे. या घटनेने शहरातसह तालुक्यात एकच खळबळ उडाली असून आरोपींच्या शोधासाठी पोलिस यंत्रणेसमोर आव्हान उभे राहिले आहे.

LEAVE A REPLY

*