‘सोशल’वर अवतरले कोतकर

0

महापालिका निवडणुकीसाठी चाचपणी, समर्थकांची जुळवाजुळव

अहमदनगर : कोतकर पिता-पुत्रांच्या शिक्षेनंतर नेतृत्त्वहिन केडगावकरांच्या मनात एकटे पडल्याची भावना दाटून आली आहे. सोशल मीडियावर ‘संदीप कोतकरांचा जयजयकार करणारी पोस्ट’ टाकून तिला वाट मोकळी करून देण्यात आली आहे. आगामी महापालिका निवडणुकीची चाचपणीही कोतकर समर्थकांनी त्या माध्यमातून सुरू केली आहे. कोतकर फॅक्टर नगर शहराच्या राजकारणात कोणाला तारणार अन् कोणाला मारणार याची चर्चा सुरू झाली आहे.

संदीप कोतकर हे नाव माहिती नाही अशी व्यक्ती शोधूनही नगरमध्ये सापडणार नाही. फौजदारी प्रकरणात कोर्टाने त्यांना शिक्षा सुनावली आहे. त्यांच्या अपरोक्ष कोतकर कुटुंबाची राजकीय, सामाजिक धुरा त्यांच्या पत्नी माजी उपमहापौर सुवर्णा कोतकर यांनी खांद्यावर घेतली आहे. फेसबुकवर गत दोन महिन्यापासून ‘कोतकर काँग्रेस’ची मुव्हमेंट सुरू झाली आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर चाचपणी करणारी ही पोस्ट आहे. 2012 मध्ये माजी नगरसेवक निखील वारे यांनी टाकलेली ‘सर्वाधिक कामे कोणत्या महापौरांनी केली?’ ही पोस्ट पुन्हा एकदा व्हायरल झाली आहे. या पोस्टवर सर्वत्र ‘संदीप दादा’ असे उत्तर देत त्यांच्या नावाचा जयघोष सुरू झाला आहे. शहराला आतापर्यंत संदीप कोतकर, संग्राम जगताप, शीला शिंदे, भगवान फुलसौंदर हे चार महापौर लाभले. सेनेच्या सुरेखा कदम या विद्यमान महापौर आहेत.
केडगाव अन् काँग्रेस असे समीकरणच आजपर्यंत होते. संदीप कोतकर जेलमध्ये गेल्यानंतर सेनेने त्याला सुरूंग लावण्यास सुरूवात केली. कोतकर फॅमिलितील हर्षवर्धन कोतकरांच्या हाती भगवा देत युवा नेतृत्व उभं केलं.
चालू आठवड्यात ‘नगरच्या विकासाला खरंच संदीप दादांनी चालना दिली का?’ असा प्रश्‍न विचारून उत्तर मागणारी दुसरी पोस्ट व्हायरल झाली आहे. त्यावर निसंकोचपणे ‘हो’ उत्तर देऊन संदीप कोतकरांचा जयघोष समर्थकांनी सुरू केला आहे.

या कारणामुळे झाली पोस्ट शेअर
या सोशल पोस्टमागील कारण ‘नगर टाइम्स’ने शोधून काढले. संदीप कोतकर यांच्या कार्यकाळात नगर शहरासोबतच केडगावात विकासाची गंगा आली. आता संदीप कोतकर नाहीत. नेतृत्व नसल्याने आम्ही एकाकी पडलो आहे. आमदार संग्राम जगताप कोतकरांचे नातलग असले तरी त्यांचा पक्ष वेगळा असल्याने त्यांच्याकडून पाहिजे ते पाठबळ मिळत नाही. केडगावात विकास कामेही होत नाहीत. ही एकाकीपणाची भावना या पोस्टमागील उदयाचे कारण ठरली आहे.

महापालिकेची निवडणूक 14 महिन्यांवर येऊन ठेपली आहे. सुवर्णा संदीप कोतकर काँग्रेसमध्ये असले तरी त्यांची कोंडी केली जात आहे. त्यामुळे कोतकर समर्थक खवळले आहेत. ‘संदीप दादा कोतकर विचार मंच’ असं नवं टायटल घेऊन समर्थक महापालिका निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. त्याची तयारी म्हणून शाहूनगरला आमदार अरुणकाका जगताप यांच्या हस्ते पहिल्या शाखेची स्थापना झाल्यानंतर आतापर्यंत पाच शाखा स्थापन झाल्या आहेत. हळूहळू शाखा विस्ताराचं लोणं थेट नगर शहरात पोहचणार आहे. कोतकर यांचे समर्थक शहराच्या गल्लीबोळात आहेत. मात्र संदीप कोतकर प्रत्यक्षात राजकीय पटलावर नसल्याने ते उघडपणे समोर येत नाहीत. संदीपदादा कोतकर विचारमंचने शहरात पाय पसरले तर त्याचा फटका कोणाला बसणार अन् कोणाला तारणार याची चर्चा सुरू झाली आहे.

LEAVE A REPLY

*