Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

चंदनचोर टोळी जेरबंद; गुन्हे शाखा युनीट दोनची कामगिरी

Share

नाशिक । प्रतिनिधी

शहरात विविध ठिकाणांवरून चंदनाची झाडे पळवणार्‍या टोळीचा छडा लावण्यात शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा दोनला यश आले आहे. टोळीतील दोघांना जेरबंद केले असून त्यांच्या ताब्यातून टाटा सफारी जप्त करण्यात आली आहे. संजय माणिक जाधव (25, रा. पाथर्डी गाव) आणि अनिल उत्तम जाधव (10, रा. पळसे शिवार) अशी या दोघा संशयितांची नावे आहेत.

शहरात दोन महिन्यात 28 चंदन वृक्ष तोडून चंदन चोरी केल्याची उघडकीस आली. चोरटे शहरातील सर्वाधिक सुरक्षीत समजल्या जाणार्‍या महाराष्ट्र पोलीस अकादमी, सीबीएस येथील पोलीस अधीक्षकांचे शासकीय निवासस्थान, देवळाली कॅम्प येथील आर्टिलरी सेंटरसह निवासी परिसरातून चोरट्यांनी चंदन चोरी सुरु केली होती.

याप्रकरणी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी चंदन चोरट्यांचा शोध घेण्याच्या सुचना केल्या. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट दोनचे पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांनी चोरट्यांचा शोध सुरु केला. खबर्‍यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे शहरालगत असलेल्या ग्रामीण भागात पाल टाकून राहणारे आणि अंगावर चाबुक मारून उपजिवीका करणारे चंदन चोरी करीत असल्याचे समजले.

त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक शामराव भोसले, हवालदार देवकिसन गायकर, पोलीस नाईक संजय ताजने, शंकर काळे, पोलीस नाईक परमेश्वर दराडे, गुलाब सोनार, मोतीलाल महाजन, पोलीस शिपाई महेंद्र साळुंखे, योगेश सानप, बाळा नांद्रे आदींनी तपास करून गिरणारे गावातून संशयितांना ताब्यात घेतले.

त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी सातपूर औद्योगिक वसाहतीतील कंपनीतील सुरक्षारक्षकास करवतीचा धाक दाखवून चंदन चोरी केल्याची, तसेच महाराष्ट्र पोलीस अकादमीतील चंदन चोरी केल्याची कबुली दिली. या संशयितांनी चार ठिकाणी चंदन चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून टाटा इंडिगो सीएस ही कार जप्त केली आहे. या संशयितांचा ताबा सातपूर पोलिसांकडे देण्यात आला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!