Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

पोलीस प्रबोधिनीतून चंदनाची झाडे चोरीला; सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

Share

नाशिक । प्रतिनिधी

सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या त्र्यंबकरोडवरील महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या आवारातून चंदनाची दोन झाडे चोरीला गेल्याचा प्रकार बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडला. अकादमीच्या चौफेर तसेच दोन्ही प्रवेशद्वारांवर शस्रधारी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असताना सदरचा प्रकार घडल्याने येथील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या आवारातील आर. पी. मेस आवारात असलेल्या गार्डनमध्ये चंदनाची झाडे आहेत. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दहा हजार रुपयांची चंदनाची दोन झाडे बुंध्यापासून कापून नेली.

या प्रकरणी गंगापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंदन चोरट्यांनी शहरात उच्छाद मांडला असून त्यांनी शासकीय अधिकार्‍यांचे बंगले लक्ष्य केले आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या प्रत्यक्ष पोलीस अधीक्षकांच्या बंगल्यातही मागील महिन्यात चोरी झाली होती. देवळाली कॅम्प येथील आर्टिलरी सेंटर येथेही चंदन चोरट्यांनी हात साफ केल्याने पोलीस चंदन चोरट्यांपुढे हतबल असल्याचे चित्र आहे.

पोलीस प्रबोधिनीत राज्यातील अधिकार्‍यांना महत्त्वपूर्ण प्रशिक्षण देण्यात येते. दरम्यान, या सर्वांच्या सुरक्षा व्यवस्थेला अतिशय महत्त्व आहे. काही वर्षांपूर्वी दहशतवाद्यांनी येथील रेकी केल्याचा प्रकार घडला होता.

यामुळे येथील सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. तर वेळोवेळी देशात सुरक्षेचा अलर्ट दिल्यानंतर येथे सुरक्षा वाढवली जाते. जेथे कोणालाही जाण्यास मज्जाव आहे अशा ठिकाणी जाऊन चंदन चोरटे आरामात चोरी करून जात असल्याने याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. तसेच इतक्या घटना घडूनही पोलिसांना चोरटे सापडत नसल्याने पोलिसांच्या कामगिरीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!