वाळूचा साठा केल्याप्रकरणी सरपंचाला 20 लाखांचा दंड

0
कर्जत (प्रतिनिधी) – तालुक्यातील मिरजगाव येथील सरंपच नितीन ज्ञानोबा खेतमाळीस यांनी माती मिश्रीत वाळू साठा केल्याप्रकरणी सुमारे 20 लाख 3 हजार 525 रूपये दंड तहसीलदार किरण सावंत यांनी केला आहे. वाळूसाठा करताना ग्रामपंचायतीच्या जेसीबी आणि ट्रॅक्टरचा वापर करण्यात आल्याचे बोलले जात असून पदाचा गैरवापर करत केलेल्या प्रतापाने एकच खळबळ उडाली आहे.
मिरजगांव येथील कामगार तलाठी यांना सोमवारी (दि.24) रोजी मिरजगावचे सरपंच नितीन ज्ञानोबा खेतमाळीस यांच्या सर्वे नंबर 553/2 मध्ये 371 ब्रास माती मिश्रीत वाळू साठा आढळून आला. त्यानंतर 5 साक्षीदारांच्या उपस्थित पंचनामा केला. याची माहिती सरपंचांना समजल्यानंतर हा वाळूसाठा ग्रामपंचायतीच्या बाजारतळ, फुले आंबेडकर कार्यालय, काळा मारूती गार्डन या कामासाठी साठवून ठेवल्याचे उत्तर सरंपच खेतमाळीस यांनी दिले.
मात्र तहसीलदार यांनी अशाप्रकारे वाळू उपसा करण्यासाठी परवानगी घेतली आहे का? याविषयी तहसील कार्यालयात 25 जुलै रोजी लेखी म्हणणे मांडण्याचे आदेश दिले आहे. 371 ब्रास गौण खनीज उत्खनन आणि वाहतुक केल्याप्रकरणी महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 48(7)प्रमाणे 371 ब्रास वाळू त्याची रॉयलटी 1 लाख 48 हजार 400 रूपये, 1000 ब्रास, 3 लाख 71 हजार त्याची पाचपट 18 लाख 55 हजार रू, भुपृष्ट भाडे 125 असे एकूण 20 लाख 3 हजार 525 रूपये दंड करण्यात आला आहे. अशी नोटीस सरपंच खेतमाळीस यांना देण्यात आली आहे.
कमगार तलाठी यांनी त्यांचे नोटिसीमध्ये हा वाळू साठा नितीन खेतमाळीस यांनी जलयुक्त कामाच्या वेळी केला असल्याचे म्हटले आहे. या प्रकारामुळे मिरजगाव ग्रामपंचायतीच्या पदाधिकारी बदलावर परीणाम होणार असून अनेक राजकीय घडामोडी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

 

LEAVE A REPLY

*