Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

वाळूतस्करी; पाचेगाव ग्रामस्थांनी दुसरा तराफाही पेटवून केला नष्ट

Share

पाचेगाव (वार्ताहर)- नेवासा तालुक्यातील पुनतगावात गेल्या गुरुवारी महसूल प्रशासनाने वाळूचा अवैधरित्या उपसा करणार्‍या एक तराफा बोट ग्रामस्थांच्या मदतीने जाळून नष्ट केल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा वाळू तस्करी करणारा दुसरा तराफा पाचेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थांनी रविवारी सकाळी जाळून नष्ट करण्यात यश मिळवले.

याबाबत माहिती अशी की, वाळूउपशासाठी वापरल्या जाणार्‍या एकूण दोन तराफा बोटींपैकी एक तराफा जाळण्यात आला होता. परंतु दुसरा तेथून वाळू तस्करांनी त्या दिवशी पळविला होता. या तराफ्याद्वारे पुन्हा वाळू तस्करी होत असल्याची खबर पाचेगाव येथे रविवारी सकाळी मिळाली. सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थांनी त्वरित पाचेगाव प्रशासनास सदर माहिती दिली. त्यानंतर लगेच घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. दरम्यान वाळू भरलेल्या अवस्थेत हा तराफा आढळून आला. पाचेगाव व पुनतगाव ग्रामस्थांच्या मदतीने सदर तराफा जाळून नष्ट केला. या कारवाई दरम्यान पाचेगावचे कामगार पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, तलाठी कार्यालयातील कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

ग्रामस्थांच्या या धडक कारवाईने वाळू तस्करांचे चांगलेच धाबे दणाणले असून अवैध वाळू उपशास आता कायमचा चाप बसेल अशी आशा व्यक्त होत आहे. एकीकडे वाळूचे रक्षण करण्यासाठी पुनतगाव व पाचेगाव ग्रामस्थ कायमस्वरूपी प्रयत्न करीत आले आहेत. पण कुंपणच शेत खात असेल तर कसे होणार? असा आरोप सामाजिक कार्यकर्त्याबरोबरच ग्रामस्थ करीत आहेत.

स्थानिक तरुण या वाळू तस्करांना थोड्याफार पैशासाठी मदत करतात. या तरुणांचाही बंदोबस्त करण्यासाठी सामजिक कार्यकर्ते व दोन्ही गावांतील ग्रामस्थ आता सरसावले आहेत. पाचेगावच्या पलीकडील हद्दीतील परिसरातून देखील मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा होत आहे. रविवारी पहाटेच्या वेळी तीन ते चार डंपर वाळू भरून गोणेगाव परिसरातून गेल्याची खात्रीशीर माहिती आहे. प्रवरा नदीपात्रात पाणी असताना देखील मोठ्या प्रमाणावर वाळू तस्करी होत आहे. जर नदीपात्रातील पाणी कमी झाले तर या भागातील वाळूचे काय होईल अशी भीती या भागातील ग्रामस्थांना चिंतीत करू पाहत आहे.

तालुक्यातील अवैध वाळू उपसा थांबला नाहीतर सामाजिक कार्यकर्ते तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

तहसीलदारांचे दुर्लक्ष
या घटनेची माहिती नेवासा तहसीलदार यांना फोनद्वारे देण्यासाठी संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही असा आरोप पाचेगाव येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी केला. या अगोदरही तीन आठवड्यांपूर्वी असाच अनुभव आला होता असे सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितले. त्याचबरोबर तहसीलदारांच्या वाहनचालकाचे तालुक्यातील वाळू तस्करांबरोबर लागेबांधे असल्याची जोरदार चर्चा पाचेगावात झडत आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!