वाळूतस्करांविरोधात ग्रामस्थ एकवटले

jalgaon-digital
3 Min Read
नेवाशातील पुनतगावात तराफा महसूल व ग्रामस्थांनी पेटवून केला नष्ट
पाचेगाव (वार्ताहर) – नेवासा तालुक्यातील पाचेगाव परिसरात पुनतगाव बंधार्‍याजवळ महसूल विभागाने कारवाई करत वाळूतस्करीच्या उपयोगासाठी आणलेला तराफा (थर्माकोल बोट) उद्ध्वस्त केला तर दुसर्‍या तराफ्यासह पसार होण्यात वाळूतस्कर यशस्वी ठरले.
पाचेगाव, पुनतगाव परिसरातून वाळू तस्करी पुन्हा सुरू झाली आहे.
मात्र पाणी असल्यामुळे तस्करांना वेगळी पद्धत वापरावी लागत आहे. प्रवरा नदीवरील पाचेगाव, पुनतगाव, मधमेश्वर हे तीनही बंधारे सध्या पाण्याने तुडूंब भरलेले आहेत. त्यामुळे पाण्यातून वाळू बाहेर काढावी लागत आहे. त्यासाठी थर्माकॉल तराफ्याचा वापर तस्कर करत आहेत.
काल गुरुवारी सकाळी 11 वाजता महसूल विभागाने पुनतगाव बंधार्‍याशेजारी कारवाई करत एक तराफा (बोट) उद्ध्वस्त केला. या कारवाई दरम्यान दुसरा तराफा पसार करण्यात वाळू तस्कर यशस्वी झाले. या कारवाईत वाळू तस्करांचे अंदाजे चाळीस हजार रुपयांचे नुकसान झाले असून या कारवाईने वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहेत.
पाण्यातून ही वाळू उपसून नदी काठावर साठविण्यात येत होती. त्यानंतर वाहनात भरून वाळू विकली जात होती. या घटनेची खबर लागताच महसूल विभाग आणि पुनतगाव ग्रामस्थ यांनी संयुक्त कारवाई करण्याचा निर्णय घेतला. तेथील एक तराफा पेटवून दिला. या घटनेची वाळू तस्करांना खबर लागताच पाचेगाव शिवरात असणारा आणखी एक तराफा वाळू तस्करांनी पसार केला.
प्रवरा नदीपात्रात गेल्या एक वर्षांपासून महसूल प्रशासनाकडून वाळू तस्करांच्या मुसक्या आवळण्यात आल्या होत्या. परंतु गेल्या महिनाभरापासून पुन्हा वाळू तस्करांनी अनधिकृत वाळू उपसा सुरू केला होता.पाचेगावात चार वर्षांपूर्वी ग्रामस्थांनी वाळू चोरी करणारा टेम्पो पेटविला होता. तर दोन वर्षांपूर्वी वाळू भरलेल्या अवस्थेत दोन डम्परवर महसूल विभागाकडून कारवाई करण्यात आली होती. वाळू तस्करांना पुनतगाव व पाचेगावातीलच काही तरुणांची मदत होत असल्याची चर्चा आहे.
कालच्या कारवाई प्रसंगी कामगार तलाठी गणेश जाधव यांच्यासह पुनतगाव ग्रामस्थ उपस्थित होते. कामगार तलाठी यांचा येथील सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थांनी सत्कार केला. वाळूतस्करांना सहकार्य करणार्‍या शेतकर्‍यांना बहसूल विभागाकडून नोटीसा पाठविण्यात येणार आहेत. त्याचबरोबर वाळू वाहतूक होणार्‍या रस्त्यांवर खड्डे खोदण्यात येणार असून पाचेगाव ग्रामस्थांनी वाळूतस्करीला प्रतिबंध घालण्यासाठी सर्व ते उपाय करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला. ग्रामस्थांची एकजूट कायम राहिली व कोणीही गद्दारी करुन तस्करांना सहकार्य केले नाही तर वाळू तस्करी करण्याची कोणीच हिंमत करु शकणार नाही. कारण येथील संतप्त ग्रामस्थ काय करु शकतात हे याआधीच्या घटनांतून दिसून आले आहे.
वाळूतस्करांकडून दमबाजी
महसूल विभाग व ग्रामस्थांनी तिथे उपलब्ध झालेले डिझेल व उसाच्या पाचरटाचा तराफा जाळण्यासाठी उपयोग केला. दरम्यान कारवाई करणारे कामगार तलाठी व ग्रामस्थांना वाळू तस्करांकडून दमबाजी करण्यात आल्याची चर्चा आहे. महसूल विभागाने जाळलेल्या तराफ्याच्या किंमतीची भरपाई देण्याची मागणी केली असल्याचे समजते.
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *