मालुंजा बुद्रुक येथे वाळू तस्कराकडून तलाठ्यास मारहाण

0
श्रीरामपूर (प्रतिनिधी)- शेतीतून अवैध वाळूचा उपसा केला म्हणून मला 1,96,14,425/- रुपयाचा दंड करून माझ्या जमिनीवर बोजा का चढविला असे वाळूतस्कराने श्रीरामपूर तालुक्यातील मालुंजा बुद्रुकच्या कामगार तलाठ्यास विचारले असता कायद्यानुसार वाळूचा लिलाव घ्या असे कामगार तलाठी म्हणताच त्याचा राग येऊन वाळू तस्कराने कामगार तलाठ्यास शिवीगाळ करत लाथा बुक्क्यांनी मारहाण केली तसेच जिवे मारण्याची धमकी दिली व सरकारी कामकाजात अडथळा आणला. याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रीरामपूर तालुक्यातील मालुंजा बुद्रुक येथील कामगार तलाठी बाबासाहेब रामजी पंडीत यांनी म्हटले आहे की, सकाळी 10 वाजता कोतवाल मनोज कारभारी क्षीरसागर यांच्यासमवेत मालुंजा बुद्रुक तलाठी कार्यालयात येऊन त्यांनी त्यांच्या कामकाजास सुरुवात केली असता दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास विश्‍वजित उ़र्फ बच्चू दिनकर बडाख याने कार्यालयात आम्हाला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तुम्ही जाणून बुजून प्रवरा नदीपात्रालगत असलल्या शेतात वाळूच्या गाड्यांवर कारवाई करता.
तुम्ही माझ्यावर शेती गट नं. 61 व 62 मधून अवैध वाळूचा उपसा केला म्हणून 1,96,14,425/- रुपयांचा दंड केला. व माझ्या जमिनीवर बोजा का चढविला असे म्हणाला असता त्यावर कामगार तलाठी पंडीत यांनी तुम्हाला वाळूचा व्यवसाय करायचा असेल तर कायद्यानुसार लिलाव घ्या, असे म्हटले असता त्याचा राग येऊन कामगार तलाठी व कोतवाल हे काम करत असताना बच्चू बडाख याने कामगार तलाठ्याच्या अंगावर धावून जात गचांडी पकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यावेळी कोतवाल मनोज क्षीरसागर याने मला त्याच्या तावडीतून सोडविले.
त्यानंतर बडाख याने माझ्या टेबलावर असलेला लिनोव्हा कंपनीचा लॅपटॉप बाहेर फेकून दिला व त्याचे नुकसान केले. तसेच मी सरकारी काम करत असताना त्यात अडथळा आणला. त्यानंतर विश्‍वजित बडाख याने कामगार तलाठ्यांंना तू माझ्या नादी लागू नको नाही तर तुला संपवून टाकू अशी जिवे मारण्याची धमकी दिली व तो तेथून निघून गेला.
याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात कामगार तलाठी बाबासाहेब रामजी पंडित यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नं. फस्ट 94/2017 प्रमाणे विश्‍वजित उर्फ बच्चू दिनकर बडाख याच्याविरुध्द भादंवि कलम 353, 332, 323, 504, 506, 427 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. पथवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री. शेंडगे अधिक तपास करत आहेत.
तसेच दि. 7 डिसेंबर 2013 रोजी मालुंजा बुद्रुक येथील तलाठी व्ही. बी. बेरड व मंडल अधिकारी एस. एम. कपूर हे मालुंजा बुद्रुक येथे कार्यरत असताना त्यांनी प्रवरा नदीपात्रात शेत गट नं. 61 व 62 मधून शेती मालक दिनकर सारंगधर बडाख यांनी 2132 ब्रास माती मिश्रीत वाळूचा अनधिकृत उपसा केल्याने उपशाचा सविस्तर पंचनामा केल्याने दिनकर सारंगधर बडाख यांच्या नावावर असलेल्या क्षेत्रावर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मधील कलम 48 (7) (8) नुसार त्यांचेवर कार्यवाही केली व त्याचा सविस्तर अहवाल तालुका दंडाधिकारी श्रीरामपूर यांचेकडे पाठविला.
त्यानंतर कामगार तलाठी म्हणून बाबासाहेब पंडीत हे हजर झाले. त्यावेळी तहसीलदारांनी दिनकर सारंगधर बडाख यांच्याकडून 1,96,14,425/- रुपये सक्तीने वसूल करण्याचे आदेश दिले. सदर शेती मालकाने दंड न भरल्यास त्या शेतीवर बोजा चढविला जावा म्हणून आदेश दिले. त्यानंतर तहसीलदारांच्या आदेशान्वये या जमिनीच्या लिलावाची कार्यवाही करण्यात आली.

त्यानंतर 18 मे 2017 रोजी पहाटे विश्‍वजित उर्फ बच्चू दिनकर बडाख याने याच शेती गट नं. 61 व 62 मधून विना परवाना वाळूचा व्यवसाय चालू केला असल्याच्या माहितीवरून अनेकवेळा छापे टाकून वाळू साठा जप्त केला तसेच दंडही आकारले. या गोष्टींचा राग त्याच्या मनात होताच.

LEAVE A REPLY

*