वाळू माफियांच्या वाहनांची तोडफोड

0
नामपूर l वार्ताहर- बागलाण तालुक्यातील द्याने गावात वाळू उपसा बंदी असतांना देखील मोसम नदीपात्रातून रात्री ११ वाजेच्या सुमारास अवैधरित्या दोन ट्रॅक्टरमधून वाळू लंपास करण्याचा प्रयत्न ग्रामस्थांनी उधळून लावला. यावेळी संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी दोघा ट्रॅक्टरची नासधूस केली. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. वाळू चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात येवून त्यांच्याविरूध्द कठोर कारवाई करण्याची ग्वाही तहसिलदार व पोलीस निरीक्षकांतर्फे देण्यात आल्यानंतर ग्रामस्थांचा असंतोष निवळला.

मोसम नदीपात्रात द्याने परिसरात वाळू बंदीचा ठराव ग्रामपंचायतीतर्फे करण्यात आला आहे. इतरत्र वाळू संपुष्टात आल्याने वाळू माफियांनी द्याने पात्रात आपला मोर्चा वळविला आहे. नदीपात्रातील वाळू चोरीस महसुल व पोलीस यंत्रणाच जबाबदार असून यापुढे गावातील पात्रातून वाळूचा उपसा झाल्यास रास्तारोकोसह तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी सरपंच इंदुबाई कापडणीस, भरत कापडणीस आदींसह ग्रामस्थांनी दिला.

द्याने गावातून मोसम नदीचा प्रवाह वाहत असून ग्रामस्थांनी वाळू उपसा बंदीचा ठराव यापुर्वीच केला असल्याने गाव परिसरातील नदीपात्रात वाळूचा साठा मोठ्या प्रमाणात असल्याने भुगर्भ जलपातळी येथे त्यामुळे खूपच चांगली आहे. वाळूमुळे जलसाठा असल्याने नदीपात्रातून वाळूचा एक कण देखील बाहेर पडणार नाही याची दक्षता द्याने ग्रामस्थांतर्फे स्वयंस्फुर्तीने घेतली जाते.

इतर गावात वाळू माफिया फोफावल्याने मोसम नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा खुलेआम केला जात असल्याने नदीपात्र कोरडे झालेले आहे. काही ठिकाणी अमर्याद वाळू उपसा झाल्याने खडक लागले आहे. नदीपात्रातील वाळू चोरून ती विकण्याचा धंदा या माफियांतर्फे केला जातो. वाळू मिळणे दुरापास्त झाल्याने त्यांनी आपला मोर्चा वाळूसाठा असलेल्या द्यानेकडे वळविला आहे.

नदीपात्रात रात्री ११ वाजेच्या सुमारास ट्रॅक्टर क्र. एम.एच.४१-१६८१ व ट्रॅक्टर क्र. एम.एच.४१-४२४३ मध्ये अंधाराचा लाभ उचलत नदीपात्रातून वाळू उपसून टाकली जात होती. याची कुणकुण ग्रामस्थांना लागताच त्यांनी नदीपात्राकडे धाव घेतल्याने वाळू भरणारे चोरटे ट्रॅक्टर सोडून जंगलात फरार झाले. दोन्ही ट्रॅक्टर ग्रामस्थांनी ताब्यात घेत ते ग्रामपंचायतीसमोर आणून उभे केले. यावेळी ग्रामस्थांच्या संतापाचा उद्रेक होवून दोन्ही ट्रॅक्टरची नासधूस केली गेल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

या प्रकाराची माहिती ज्येष्ठनेते भरत कापडणीस यांनी तहसिलदार प्रशांत पाटील, पो.नि. विजयकुमार ठाकुरवाड यांना दिल्याने त्यांनी पथकासमवेत द्याने येथे धाव घेत संतप्त ग्रामस्थांशी चर्चा केली. वाळू चोरट्यांना त्वरीत अटक करण्याच्या मागणीवर ग्रामस्थ ठाम असल्याने पो.नि. ठाकुरवाड यांनी या प्रकरणी त्वरीत वाळू चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल केला जाईल, असे आश्‍वासन दिल्याने ग्रामस्थांचा असंतोष निवळला.

यावेळी द्याने गावात यापुढे वाळू उपसा झाल्यास सर्व ग्रामस्थ रास्तारोको आंदोलन छेडतील, असा इशारा तहसिलदार प्रशांत पाटील यांना सरपंच इंदुबाई कापडणीस यांच्यासह संदीप कापडणीस, प्रमोद कापडणीस, रावसाहेब कापडणीस, डोंगर कापडणीस, भाऊसाहेब कापडणीस, अरूण कापडणीस, नितीन कापडणीस, सचिन कापडणीस यांच्यासह ग्रामस्थांनी दिला.
दरम्यान, या वाळू चोरीप्रकरणी दोघा ट्रॅक्टर चालकांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास एस.पी. महाजन हे करत आहेत.

LEAVE A REPLY

*