वाळू तस्कारांच्या ट्रॅक्टरला गळती!

0

राहुरीतील हेराफेरी पकडले 5, कारवाई एकावर

राहुरी (तालुका प्रतिनिधी) – राहुरी तालुक्यातील मानोरी, वळण, पिंप्रीवळण, चंडकापूर, भागातून मुळा नदीपात्रातून होणारी बेकायदा वाळू तस्करी बंद करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आल्यानंतर त्वरित दखल घेत राहुरी पोलिसांच्या पथकाने कारवाई करण्याची तत्परता दाखविली व पाच ट्रॅक्टर पकडले. पकडलेल्या पाच टॅ्रक्टरपैकी फक्त एकाच ट्रॅक्टर कारवाई करण्यात आली आहे. पोलीस ठाण्यात येतानाच अन्य चार ट्रॅक्टर गायब झाले. याविषयी सध्या खमंग चर्चा सुरू आहे.

वाळू तस्करीबाबत ग्रामस्थांनी निवेदन दिल्यानंतर राहुरी पोलीस ठाण्याचे चार ते पाच पोलिसांचे पथक व एक आधिकारी दुपारी एक ते दोनच्या दरम्यान मुळा नदीपात्रात वाळू तस्कारांवर कारवाईसाठी दाखल झाले. यावेळी पिंप्री, चंडकापूर, हद्दीत नदीपात्रात चार ते पाच टॅ्रक्टर पोलिसांना आढळून आले. त्यापैकी काही ट्रॅक्टर पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना पोलिसांनी पाठलाग करून पकडल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले. यापैकी एक ट्रॅक्टर तर टायर फुटल्याने उलटला. पोलिसांनी एखूण पाच ट्रॅक्टर पकडले होते. परंतु पोलीस ठाण्यात एकच ट्रॅक्टर नेऊन त्यावर कारवाई करण्यात आलेली आहे. चार ट्रॅक्टर सोडून देण्यात आले आहेत.

वाळू तस्करीमुळे शेतीचे व शेतकर्‍यांचे जीवन धोक्यात आल्याने ग्रामस्थांच्या भावना तीव्र आहेत. मात्र पोलिसांच्या या संशयास्पद कारवाईतून असंतोष व्यक्त होत आहे. वाळू तस्कर व ग्रामस्थांमध्ये तीव्र संघर्ष होण्याची भीती ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे. याबाबत नंतर होणार्‍या घटनांना कोण जबाबदार असेल? असा सवाल ग्रामस्थांतून उपस्थित केला जात आहे. याबाबत वरिष्ठांनी त्वरित लक्ष देऊन कार्यवाही करून चौकशी करावी अशी मागणी प्रिंप्रीवळण पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी केली आहे.

राहुरी तालुक्यातील पूर्व भागात वाळू तस्करीला उधाण आले आहे. तांदूळवाडी, कोंढवड, आरडगाव, शिलेगाव, पिंप्रीवळण, चंडकापूर या भागांतून रात्रभर मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी सुरू आहे. यामुळे या भागातील रस्त्यांची पूर्ण वाट लागली आहे. मुजोर वाळू तस्कर कोणालाही न जुमानता नदीपात्रात सरळ वाहने घालून रात्री वाळू उपसा करून कोंढवड ते सोनई फाटा व करपरावाडी मार्गे शिलेगाव ते उंबरे या रस्त्याने वाहतूक करीत आहेत. काही वाळू तस्कर बैलगाडीच्या साह्याने दिवसभर वाळूचा उपसा करून रात्री त्याची विल्हेवाट लावत आहेत. राहुरीपासून ते नदीपर्यंत त्यांचे पंटर सरकारी यंत्रणेवर लक्ष ठेवून ‘लोकशन’ देत असतात.

 

LEAVE A REPLY

*