वाळू वाहतुकीस केलेली मदत शेतकर्‍यांच्या आली अंगलट : राहुरी तालुक्यातील 14 शेतकर्‍यांच्या जमिनी जप्त

0

महसूलचा दणका , बुधवारी  लिलाव

राहुरी (प्रतिनिधी) – वाळू तस्करांना आपल्या शेतातून वाहने काढण्यास जागा दिल्याचा ठपका ठेवून राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द, कोंढवड, सात्रळ, डिग्रस, मुसळवाडी येथील 14 शेतकर्‍यांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात आला. त्यांना दंड भरण्याच्या नोटिसा बजाविण्यात आल्या. मात्र, नोटिसा बजावूनही जमिनीवर दंड न भरल्याने या 14 शेतकर्‍यांच्या सात-बारा उतार्‍यावर ‘महाराष्ट्र शासन’ अशी नोंद लावून त्यांच्या जमिनी जप्त करण्यात आल्या आहेत. 

मुळा व प्रवरा नदीपात्रातून वाळू उपसा करून ज्या शेतकर्‍यांच्या शेतातून वाळू व मुरूम उत्खनन होत आहे, त्या शेतकर्‍यांना नोटिसा काढण्यात आल्या. नोटिसांबाबत म्हणणे सादर करण्याचे आदेश देण्यात आले. मात्र, काही शेतकर्‍यांनी वाळू व मुरूम उत्खननात प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरित्या सहभाग घेतलेला असल्याने त्यांनी महसूल प्रशासनाला जबाब दिलेच नाही. तर काहींनी दिलेल्या जबाबात तथ्य आढळले नाही. त्यामुळे तहसीलदार अनिल दौंडे यांनी कारवाईचा निर्णय घेतला आहे.

राहुरीच्या गौणखनिज विभागाने दंडाची नोटीस देऊनही दंड न भरणार्‍या शेतकर्‍यांच्या सात-बारा उतार्‍यावर महाराष्ट्र शासनाची नोंद लावण्यात आली होती. अखेरीस दंडाची रक्कम जमा न झाल्याने राहुरी महसूल विभागाने 14 शेतकर्‍यांच्या जमिनीचा लिलाव करून दंड वसुलीचा निर्णय घेतला आहे;

दंडात्मक लिलावाच्या कारवाईत नितीन शहाजी धुमाळ यांची मुसळवाडी येथील जमिनीचा लिलाव करण्यात येणार आहे. त्यांच्याकडे 9 लाख 30 हजार 975 रुपये दंड वसुलीसाठी शासकीय किंमत 6 लाख 16 हजार 704 रुपये इतकी किंमत असलेल्या जमिनीचा लिलाव होणार आहे. सात्रळ येथील शेतकरी अशोक दगडू पडघलमल यांच्याकडून 5 हजार 425 रुपये वसुलीकरीता 2 लाख 70 हजार रुपये एवढी शासकीय किंमत असलेल्या जमिनीचा लिलाव होणार आहे.

सात्रळ येथील शेतकरी भाऊसाहेब महादू पडघलमल, माधव आनंदा पडघलमल यांच्याकडून येणार्‍या 15 हजार 425 रुपये वसुलीपोटी त्यांच्या शेतजमिनीचा लिलाव होणार आहे. सात्रळ येथील शेतकरी पोपट बबू पडघलमल, नाना श्रीपत पडघलमल, सोहबराव बाळाजी पडघलमल, दिलीप रतन पडघलमल यांच्याकडून 14 लाख 9 हजार 125 रुपये वसुलीसाठी जमिनीचा लिलाव केला जाणार आहे.

सात्रळ येथील शेतकरी आकाश दगडू पडघलमल, आजोबा माधव पडघलमल यांच्याकडून 15 हजार 425 रुपये दंड वसूलीसाठी जमीन विक्री केली जाणार आहे. तसेच कोल्हार खुर्द येथील शेतकरी गणेश भाऊसाहेब शिरसाठ, भाऊसाहेब कारभारी शिरसाठ यांच्याकडून 36 हजार 225 रुपये वसुलीसाठी त्यांच्या जमिनीचा लिलाव केला जाणार आहे. कोंढवड येथील शेतकरी संतोष दगडू म्हसे यांच्याकडून 2 लाख 18 हजार 425 रुपये वसुलीसाठी त्यांच्याही जमिनीचा लिलाव होणार आहे.

यासह कोल्हार खुर्द येथील शेतकरी सुभाष कारभारी अनापकरीता कारभारी रंगनाथ अनाप यांच्याकडून 4 लाख 62 हजार रुपये, कोल्हार खुर्द येथील चांदमल पन्नालाल राका यांच्याकडून 57 हजार रुपये, कोल्हार खुर्द येथील संजय फ्रान्सीस भोसले यांच्याकडील 30 हजार 825 रुपये, कोल्हार खुर्द येथील बाळासाहेब दत्तात्रय शिरसाठकरीता भाऊराव बळवंत शिरसाठ यांच्याकडे 6 लाख 93 हजार रुपये, डिग्रस येथील राजकुमार रावसाहेब भिंगारदे यांच्याकडील 91 हजार रुपये, डिग्रस येथील विजय रावसाहेब भिंगारदे यांच्याकडे 54 हजार 625 रुपये वसुलीसाठी एकूण 14 शेतकर्‍यांच्या जमिनीचा लिलाव करून महसूल विभाग दंडवसूली करणार आहे.

महाराष्ट्र राज्य शासन अधिनियम 1966 चे कलम 48(7) नुसार दंडात्मक आदेश पारित केलेले आहेत. शासनाच्या नियमानुसार शेतकर्‍यांच्या सातबार्‍यावर महाराष्ट्र शासनाची नोंद दंडाची रक्कम न भरल्याने लावण्यात आली होती. दंड वसूली होत नसल्याने अखेर जमीनीचा लिलाव करून दंड वसूली केली जाणार आहे. दि. 16 ऑगस्ट रोजी महसूल कार्यालयात जमीन लिलावाची प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याची माहिती तहसीलदार अनिल दौंडे यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

*