भीमा पात्रातून होतोय बोटीच्या साह्याने वाळूउपसा

0
श्रीगोंदा (प्रतिनिधी) – श्रीगोंदा तालुक्यातील भीमा नदीच्या पात्रातील मौजे कौठा, गार गावच्या हद्दीत भीमा नदीला पूर आलेला असतानाही वाळू तस्कर बोटीच्या साह्याने अवैध रित्या वाळूउपसा करीत आहेत. नदीपात्रात वन विभागाच्या हदीतील वाळूउपसा अहोरात्र सुरु आहे. यामुळे वन जमिनीचे नुकसान होत असून याकडे वनविभागाचे दुर्लक्ष होत आहे. हा अवैध वाळूउपसा तातडीने बंद करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
भीमा नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीरपणे वाळू उपसा होत असल्याच्या तक्रारी ग्रामस्थ करीत आहेत. मात्र त्यांच्या तक्रारीची दखल घेतली जात नसल्याने संताप व्यक्त होत आहे. सध्या भीमा नदीपात्रातील गार आणि कौठा या गावाच्या हद्दीत वाळूतस्कर भरदिवसा बोटीच्या साह्याने वाळू तस्करी करीत आहेत. यापूर्वी कौठा क्र. 1 या ठिकाणचा लिलाव होत होता.
मात्र या वर्षी हा लिलाव कुणी घेतला नाही. याचा फायदा हे वाळूतस्कर घेत आहेत. हद्दीच्या वादात कारवाई करायची कुणी असा प्रश्न असला तरी दौंड महसूल विभाग आणि श्रीगोंदा महसूल विभाग यांनी एकत्र येऊन ही वाळू तस्करी रोखली पाहिजे, मात्र असे होत नाही. अनेक वेळा तक्रारी करणार्‍या गावकर्‍यांना घरचा रस्ता दाखवण्यात येत आहे.
याच ठिकाणाजवळ मोठ्या प्रमाणावर वन जमिनी आहेत. यामध्ये जंगली झाडे व वन्य प्राणी मोठ्या प्रमाणावर असताना नैसर्गीक साधनांना वाळू तस्कर हानी पोहचवत आहेत. वाळू तस्कर भीमा नदीला पाणी असल्याने वाळू उपसा करण्यासाठी यांत्रीक बोटीचा वापर करत आहेत. हा वाळू उपसा रोखावा अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

LEAVE A REPLY

*