Wednesday, April 24, 2024
HomeUncategorizedसार्वमत संवाद कट्टा : करोनासोबत जगण्याचे तंत्र शिका

सार्वमत संवाद कट्टा : करोनासोबत जगण्याचे तंत्र शिका

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – करोनावर अद्याप औषध सापडलेले नाही. मात्र आपल्या दैनंदिन जगण्याच्या सवयींसोबत काही पथ्ये पाळली तर या संकटावर मात करण्यास नक्कीच मदत होईल, असे मत मान्यवरांनी नोंदविले.

‘सार्वमत संवाद कट्टा’ या उपक्रमात ‘करोनासोबत जगणे’ या विषयावर आयोजित चर्चेत प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ.दिलीप शिरसाठ, व्यापारी असोशिएशनचे माजी अध्यक्ष सुमनभाई शहा, कामगार नेते अविनाश आपटे, नागेबाबा आरोग्य मित्र सुभाष गायकवाड यांनी मत नोंदविले. सार्वमतचे कार्यकारी संपादक अनंत पाटील यांनी त्यांना बोलते केले.

- Advertisement -

करोना हा आता जीवनाचा भाग झाला आहे. मात्र त्याचा फैलाव होऊ नये, ही प्रत्येक नागरिकाचीही जबाबदारी आहे. सरकार, प्रशासन आपल्यापरिने प्रयत्न करत आहे. मात्र जनतेने योग्यप्रकारे साथ दिली नाही, तर हे प्रयत्न फोल ठरतील. त्यामुळे करोनासोबत जगताना सुचनांचे पालन करणे, हे आपले कर्तव्य आहे. असे या मान्यवरांनी सांगितले.

जगभर करोनाचा फैलाव झाला. मात्र त्यात आपल्या रोगप्रतिकार शक्तीच्या मदतीने मात करणार्‍यांचे प्रमाण भारतात अधिक आहे, अशी माहिती डॉ.शिरसाठ यांनी दिली. नियमित हात धुणे, एकमेकांत अंतर राखणे, बाहेर न चुकता मास्कचा वापर करणे, या सवयी आपण पाळल्याच पाहिजेत. सध्या या गोष्टीच एकप्रकारे करोना होऊ नये, यासाठीचा उपाय आहे असे त्यांनी सांगितले.

करोनामुळे किती काळ घरात बसणार, असा प्रश्न उपस्थित करून सुमनभाऊ शहा म्हणाले, आता करोनावर मात करण्यासाठी जनतेने आपल्या जीवनशैलीत बदल घडवला पाहिजे. उत्तम व सकस अन्नसेवन हे देखिल करोनावर मात करण्यासाठी आवश्यक आहे. प्रशासनाच्या सुचनांचे पालन न करणे, ही सार्वत्रिक सवय आपल्याला मोडावी लागेल. अन्यथा याचा त्रास आपल्यालाच होईल, असे अविनाश आपटे यांनी सांगितले. आपली बेफिकीरी इतरांसाठी त्रासदायक ठरते, याचे भान प्रत्येकाचे राखावे, असे गायकवाड यांनी सांगितले.

करोनावर मात करणार्‍यांचे प्रमाण मोठे आहे. मात्र नागरिकांनी हात धुणे, मास्क व अंतर हा बचावाचा मंत्र पाळावा.

– डॉ. दिलीप शिरसाठ

करोनामुळे जगण्यातच मोठा बदल घडून आला आहे. नागरिकांनी आता अधिक जबाबदारीने वागले पाहिजे. तरच वेगाने करोनावर मात करता येईल.

– सुमनभाई शहा

करोनावर मात ही सामूहिक जबाबदारी आहे. बाहेर गर्दी करणे योग्य नाही. नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळावी.

– अविनाश आपटे

मला काही होत नाही, ही बेफिकीरी करोनाशी लढताना अडचण निर्माण करत आहे. प्रत्येकाने असा विचार केला तर करोना रोखणार कसा ?

– सुभाष गायकवाड

- Advertisment -

ताज्या बातम्या