प्रवाह कवेत घेण्यास मराठी सक्षम

सार्वमत संवाद कट्टा : भाषिक स्वाभिमानाची आवश्यकता
प्रवाह कवेत घेण्यास मराठी सक्षम

अहमदनगर (प्रतिनिधी)-

अन्य भाषांची आव्हाने समोर दिसत असली तरी मराठी ही अभिजात आणि समृद्ध भाषा आहे. मराठीसमोरील आव्हानांची उदाहरणे इतिहासातही दिसतात. मात्र तरिही मराठी प्रवाही राहीली. यापुढेही आव्हाने झेलत मराठी मार्गक्रमण करत राहील. मात्र, समान्य मराठी भाषिकाने आपल्या भाषेबद्दल अधिक स्वाभिमान बाळगावा, अशी अपेक्षा मान्यवरांनी व्यक्त केली.

‘सार्वमत संवाद कट्टा’ या कार्यक्रमात मराठी भाषादिनानिमित्त ‘मराठी भाषा : आव्हाने आणि वास्तव’ या विषयावर चर्चा झाली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष तथा भेंडा महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.शिरीष लांडगे, कोपरगाव येथील के.जे.सोमय्या महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख तथा ग्रामीण साहित्याचे व्यासंगी अभ्यासक डॉ.गणेश देशमुख व संगमनेर महाविद्यालयातील मराठी विभागाचे प्राध्यापक तथा अध्यात्म व सामाजिक साहित्य अभ्यासक डॉ.राहुल हांडे या चर्चेत सहभागी झाले. सार्वमतचे कार्यकारी संपादक अनंत पाटील यांनी त्यांच्याशी संवाद साधला.

मराठी भाषेसमोरील आव्हाने किंवा आक्रमणे ही आजची बाब नाही. इतिहासातही याचे दाखले मिळतात. म्हणून मराठी भाषा संपली असे काही झाले नाही. शुद्धीकरणाचे अनेक प्रयत्न वेळोवेळी झाले. मात्र भाषा समृद्ध झाली. शुद्धीकरणाचा अतिरेकी आग्रह बाळगण्यापेक्षा ती अधिक प्रवाही कशी होईल, यासाठी प्रयत्न आवश्यक आहेत, असे मत प्राचार्य डॉ.शिरीष लांडगे यांनी मांडले.

डॉ.गणेश देशमुख म्हणाले, मराठी भाषा समृद्धीकडे राजकीयदृष्ट्या दुर्लक्षितपणाची भावना क्लेषदायक आहे. अनेकदा भाषा संशोधनाचा विषय पुढे येतो. मात्र त्यास राजकीय पाठबळ मिळत नाही. सरकारकडून यासाठी आवश्यक निधी उपलब्ध होणे आवश्यक आहे.

डॉ.राहुल हांडे यांनी भाषा वापराबद्दल आपण गंभीर आहोत, असे दिसत नाही. पर्यायी शब्द आपल्या भाषेत असताना इंग्रजी भाषेची घुसखोरी आपण खपवून घेतो. अंकल, आण्टी असा इंग्रजीचा वाढता प्रभाव पुढील पिढीच्या मराठी भाषा जडणघडणीच्या दृष्टीने धोकादायक आहे, असे ते म्हणाले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com