वारीतून समृध्द प्रबोधनाचे सामर्थ्य मिळते !
देशदूत संवाद कट्टा

वारीतून समृध्द प्रबोधनाचे सामर्थ्य मिळते !

देशदूत संवाद कट्ट्यावर उमटला वारकर्‍यांचा सूर

Rajendra Patil

जळगाव ।

वारी म्हणजे जिवनाला बळ देण्यासोबतच आकार देण्याचे एक उत्तम माध्यम आहे. तसेच वारीतून समृध्द प्रबोधनाचे बळ मिळत असते, असा सूर देशदूत लाईव्ह संवाद कट्ट्यावर उमटला.

कोरोनासारख्या महामारीमुळे गेल्या तीन महिन्यांपासून बंद असलेल्या संवाद कट्ट्याला बुधवार दि.1 जुलैपासून पुन्हा नव्याने सुरूवात करण्यात आली. आषाढी एकादशीनिमित्त वारकरी आणि वारी यांचे निस्सिम नाते उलगडून सांगण्यासाठी संवाद कट्ट्यात ह.भ.प. दिपक महाराज पाटील भुसावळकर, ह.भ.प.मुकूंद महाराज चिरमाडे आसोदेकर, ह.भ.प.गोपाळबुवा ढाके भादलीकर सहभागी झाले होते. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारामचा गजर करीत कार्यकारी संपादक अनिल पाटील यांनी चर्चेला सुरूवात केली.

वारी आणि वारकरी यावर संबोधन करतांना ह.भ.प.मुकुंद महाराज चिरमाडे म्हणाले की, वारीच्या समृध्द परंपरेत मी वयाच्या 16 व्या वर्षापासून सहभागी होत आहे. आजपर्यंत विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी पंढरीच्या 62 वार्‍या मी पुर्ण केल्या आहेत. माझे पुर्ण कुटूंबच वारकरी आहे. माझ्या उभ्या आयुष्यात पंढरपुरला किर्तन करायची संधी मिळाली ही फार मोठी बाब आहे. ज्ञानेश्वर महाराज, तुकोबाराय यांनी आपल्या निरूपणातून निर्व्यसनीपणा, माणूसकी जगाला शिकवला. किर्तनाची समृध्द परंपरा अनेकजण महाराष्ट्राबाहेरही जपत आहेत.दुःखातून सुखाकडे जाण्याचे मनोबल वारी देते.

ह.भ.प.गोपाळबुवा ढाके म्हणाले की, कोरोनामुळे वारीत जाता आले नाही याचे दु:ख आहे. मात्र मनात असलेल्या विठ्ठलाचे घरीच नामस्मरण केले. पंढरपुरचा महिमा सांगतांना गोपाळबुवा म्हणाले की, ‘होय होय वारकरी पाहे पाहे पंढरी’ पंढरपूर पहायचे असेल तर प्रत्येकाने एकदा वारीत जावून बघावे. वारकरी संप्रदायाबाबत बोलतांना त्यांनी लहानपणी पंढरपुरात वारीत हरविल्याचा अनुभव सांगितला. 1972 पासून सुरू केलेली पायी वारी अव्याहतपणे सुरू आहे. जळगाव जिल्ह्यातून निघालेली वारी एकूण 5 जिल्ह्यातून जाते. मात्र पाचही जिल्ह्यात वारीला भाविकांकडून आपलेपणा मिळतो. खान्देशातील वारीत सहभागी होणारा वारकरी मुख्यत: शेतकरी असतो. बदलत्या काळात वारकर्‍यांची संख्या कमी झाली आहे. मात्र ठिकठिकाणी वारकर्‍यांची सेवा करणारे सेवेकरी आजही तसेच आहेत.

ह.भ.प.दिपक महाराज पाटील म्हणाले की, लहानपणापासूनच वारकरी संप्रदायाचे संस्कार माझ्यावर झाल्याने एम.ए.बी.एड.शिक्षण घेवून देखील शिक्षकी पेशा सांभाळतांना मी वारकरी संप्रदायाची जपणूक करीत आहे. विदर्भात होणार्‍या वारकरी संप्रदायाच्या शिबीरांमधून मला या संप्रदायाविषयी गोडी निर्माण झाली.

समाजात परिवर्तन आणण्याकरीता ज्ञानोबा-तुकोबांच्या विचारांशिवाय पर्याय नाही. कोरोनामुळे श्रवणाची परंपरा खंडीत झाली असली तरी वारी खंडीत झालेली नाही. विविध ठिकाणच्या संतांच्या पादुकांच्या माध्यमातून अख्खा महाराष्ट्रच पंढरपूरात पोहोचला आहे. समाजाला ज्या गोष्टीतून सुख मिळते त्याचा विचार वारकरी संप्रदाय देतो. वारकरी संप्रदायाचे ज्ञान माणसाला परिपूर्ण करते. वारकरी संप्रदाय हा प्रत्येकाच्या अंगात दडलाय. प्रपंचाच्या समस्यांचे निराकरण वारकरी संप्रदायात सापडते.

वारकरी संप्रदाय हा संतांच्या विचाराला जागणारा संवेदनशील संप्रदाय आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला जगी ठाव नाही उरला. वारी म्हणजे एक चार्जिंग असते. मन, मस्तीक, आत्मा या बाबींना वारीतून बळ मिळत असते, असेही ते म्हणाले.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com