देशदूत 'साहित्यिक कट्टा' (भाग ५) : वसंतराव खैरनार यांच्याशी चर्चा

देशदूत 'साहित्यिक कट्टा' (भाग ५) : वसंतराव खैरनार यांच्याशी चर्चा

सहभाग : वसंतराव खैरनार, समिती समन्वयक, ग्रंथ प्रदर्शन, ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, नाशिक.

संवाद : डॉ. वैशाली बालाजीवाले, कार्यकारी संपादक, देशदूत आणि देशदूत टाईम्स.

अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या साहित्य संमेलनाच्या 94th All India Marathi Literay Convention तयारीचा सर्वच समित्यांकडून अंतिम टप्पा सुरू आहे. साहित्यकुंभाच्या पार्श्वभूमीवर ‘देशदूत’च्या वतीने ‘देशदूत साहित्यिक कट्ट्या’त विविध समितीच्या सदस्यांसोबत चर्चा केली जात आहे. ग्रंथप्रदर्शन समितीचे Book Exhibition Committee प्रमुख वसंतराव खैरनार Vasantrao Khairnar यांच्यासोबत ‘देशदूत’च्या कार्यकारी संपादक डॉ. वैशाली बालाजीवाले यांनी संवाद साधला. .

यापूर्वी नाशिकमध्ये झालेल्या 78 व्या साहित्य संमेलनात ग्रंथप्रदर्शन समितीची धुरा माझ्याकडे होती. त्यामुळे या समितीमध्ये काम कसे करायचे याचा अनुभव पाठीशी आहे. याच अनुभवाच्या जोरावर येणार्‍या संमेलनात चांगले काम करण्याचा विश्वास वाटत आहे. हे संमेलन यापूर्वी एप्रिलमध्ये घेण्याचे ठरले होते. त्यादृष्टीने ग्रंथप्रदर्शनासाठी दालन राखीव करण्याचे कामसुद्धा जोरात सुरू झाले होते. त्यावेळी साधारण 150 दालने राखीव झाली होती. मात्र करोनाचा प्रादुर्भाव वाढत गेल्याने शहरात टाळेबंदी करावी लागली.

संमेलन अनिश्चित काळासाठी पुढे ढकलावे लागले. संमेलन पुढे गेल्याचे समजताच काही दालनधारकांनी एक पाऊल मागे घेतले. परतावा घेत राखीव केलेली दालने परत केली. तर साधारण 40-50 जणांनी ती दालने तशीच ठेवली. जेव्हा करोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आणि संमेलनाबाबत पुन्हा एकदा चर्चा झडू लागल्या तेव्हा पुन्हा दालने राखीव करण्यासाठी संपर्क सुरू झाला. सद्यस्थितीत सगळीच दालने राखीव करण्यात आली आहेत. तथापि यासंदर्भात विचारणा सुरूच असल्याने दालनांची संख्या वाढवता येईल का याबाबत चर्चा सुरू आहे, असे खैरनार यांनी सांगितले.

साहित्य संमेलनात सर्वच प्रकारची पुस्तके असतात. त्यात कथा, नाटक, चरित्र, आत्मचरित्र, कादंबरी, ऐतिहासिक, राजकीय या सर्व विषयांचा समावेश केलेला असतो. या संमेलनाच्या निमित्ताने विचारांची देवाणघेवाण तर होणार आहेच पण रसिकांना पुस्तकांंचाही आस्वाद घेता येणार आहे. याचसाठी काही प्रकाशकांनी गाजलेली पण सध्या उपलब्ध नसलेली पुस्तकेदेखील पुन्हा छापून घेतली आहेत.

या साहित्य संमेलनात राज्यातील सर्वच मान्यवर प्रकाशनांनी त्यांची दालने राखीव केली आहेत. त्यामुळे साहित्य रसिकांना उत्तम मेजवानी मिळणार आहे. ग्रंथ प्रकाशकांमध्ये या संमेलनाबाबत उत्सुकता आहे. करोनामुळे गेले दोन वर्षे ग्रंथ प्रकाशकांना गैरसोय सहन करावी लागली. त्यांच्यासाठी ही पर्वणी असल्याची त्यांची प्रतिक्रिया आहे.

नाशिकमध्ये पार पडलेल्या 78 व्या साहित्य संमेलनात विक्रमी ग्रंथ विक्री झाली होती. साधारणपणे पावणेदोन कोटी रुपयांची पुस्तके त्यात विकली गेली होती. यावेळची परिस्थिती व प्रकाशकांचा उत्साह बघता नवा उच्चांक प्रस्थापित होऊ शकेल, असा आशावाद वाटतो.

या संमेलनात अनेक बदल झाले आहेत. कालानुरूप होणारे बदल स्वागतार्ह असतातच. हे संमेलन भव्य करण्याचा सर्वच आयोजाकांचा मानस आहे. करोना विषाणूच्या गडद छायेनंतर एक सकारात्मकता घेऊन हे संमेलन येत आहे. त्यामुळे इतिहासात या संमेलनाचे महत्त्व वेगळे असेल. आपल्याला संमेलनाध्यक्ष म्हणून खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर लाभले आहेत. यामुळे या संमेलनातून एक वैज्ञानिक दृष्टिकोन समाजासमोर ठेवला जाणार आहे.

संमेलनाच्या आयोजनाच्या रूपाने नाशिकला साहित्य रसिकांच्या सेवेची संधी प्राप्त झाली आहे. नाशिककरांनी घरी होणार्‍या या साहित्य सोहळ्यासाठी उपस्थित राहून वैचारिक मेजवानीचा आस्वाद घ्यावा.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com