Type to search

Featured maharashtra मुख्य बातम्या

समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

Share

मुंबई – मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी घेण्यात आला. हा मार्ग शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग म्हणून ओळखला जाईल, अशी माहिती राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याचा भाजपचा विचार होता. मात्र, शिवसेनेनं बाळासाहेबांच्या नावासाठी आग्रह धरला होता. तसं पत्रच तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं होतं. त्यावेळी भाजप व शिवसेनेची युती असल्यानं तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढं पेच निर्माण झाला होता. मात्र, युती तुटून शिवसेनेच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकार आल्यानंतर अखेर याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.

तुलनेने मागास असलेल्या विदर्भ-मराठवाड्याच्या अर्थकारणाला गती देणारा प्रकल्प म्हणून या महामार्गाकडे पाहिले जाते. भूसंपादनाच्या वादामुळं सुरुवातीला शिवसेनेनं या प्रकल्पाला विरोध केला होता. मात्र, त्यानंतर शिवसेनेनं विरोधाची भूमिका बदलली होती.

मुंबई-पुणे या देशातील पहिल्यावहिल्या द्रुतगती महामार्गाची मुहूर्तमेढ बाळासाहेबांनी रोवली होती. मुंबई-पुणे प्रवास दोन तासांवर आणण्याचे बाळासाहेबांनी पाहिलेले स्वप्न सन 1995 मध्ये राज्यात युतीची सत्ता आल्यानंतर पूर्ण झाले. यात तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांचा सिंहाचा वाटा होता. देशातील पहिल्या द्रुतगती महामार्गाचे शिल्पकार असलेले बाळासाहेब ठाकरे यांच्या दूरदृष्टीचा यथोचित सन्मान व्हावा अशी शिवसेनेच्या खासदार-आमदारांची भावना होती. आजच्या निर्णयामुळं त्या भावनेचा सन्मान झाला आहे, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. हा महामार्ग लवकरच पूर्ण होईल, असंही ते म्हणाले.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!