शेतकर्‍यांकडून समृद्धी महामार्ग दरपत्रकाची होळी

0
सोनेवाडी (वार्ताहर) – समृद्धी महामार्गासाठी सरकारने जमिनी अधिग्रहित करण्यासाठी शासन परिपत्रक जिल्हास्तरीय मोबदला जाहीर केला आहे. कोपरगाव तालुक्यातील दहा गावातील जमिनीचे दर निश्‍चित झालेले आहेत.
मात्र येथील शेतकर्‍यांनी आम्ही आमच्या जमिनी समृद्धी महामार्गासाठी देणारच नसल्याचे स्पष्ट करत सोमवारी सकाळी अकरा वाजता कोपरगाव तहसील कार्यालयासमोर समृध्दी महामार्गाच्या दरपत्रकाची होळी करत सरकारचा निषेध केला व निवासी नायब तहसीलदार शिवाजी सुसारे यांना समृद्धी महामार्गासाठी जीव गेला तरी जमिनी देणार नसल्याचे निवेदन दिले.
कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे, डाऊच, जेऊर कुभांरी, कोकमठाण, संवत्सर, कान्हेगाव, भोजडे, देर्डे कोर्‍हाळे, घारी आदी गावातील बागायती जमिनी सरकार मुंबई नागपूर समृद्धी महामार्गासाठी संपादित करणार आहे. सरकारने जमिनीचा दरही निश्‍चित केला मात्र येथील शेतकर्‍यांनी जमिनी देण्यास विरोध करत सोमवारी दरपत्रकाची होळी केली.
यावेळी ज्ञानेश्‍वर होन, साहेबराव होन, मतीन शेख, डॉ. जगदीश झंवर, माधव गायकवाड, राजेंद्र डुबे, शंकरराव चव्हाण, कृष्णा शिलेदार, विलास रत्ने, गणेश डुबे, निरंजन रोहम, सुनिल काजळे आदींसह दहा गावातील बाधित शेतकरी उपस्थित होते. यावेळी दरपत्रकाची होळी करत सुनिल काजळे, ज्ञानेश्‍वर होन, डॉ. झंवर, राजेश डुबे, अविनाश रोहम यांनी सांगितले की, जुना नागपूर मुंबई महामार्ग असताना नवीन समृद्धी महामार्गाचा हट्ट सरकार कशासाठी करत आहे, आमच्या बागायती जमिनी, घरे, विहीरी यात जात असून आम्ही भूमिहीन होत आहे.
सरकारने कितीही मोबदला दिला तरी आम्ही आमच्या जमिनी देणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले. निवासी नायब तहसीलदार शिवाजी सुसारे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शिवाजी सुसारे यांनी समृद्धी महामार्गात बाधित होणार्‍या शेतकर्‍यांच्या भावना जिल्हा अधिकारी कार्यालयामार्फत मंत्रालयात पाठवू असे सांगितले. सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत शेतकर्‍यांनी आपला संताप व्यक्त केला.

LEAVE A REPLY

*