समृद्धीच्या कामाला लॉक डाऊन कधी?; नागरी वस्तीत परप्रांतीय कामगारांची  वर्दळ वाढल्याने ग्रामस्थांमध्ये  भीती

सिन्नर / अजित देसाई

मुंबई -नागपुर समृद्धी महामार्गाचे काम जोरात सुरू असून नाशिक जिल्ह्यात इगतपुरी पासून सिन्नर तालुक्यातील पाथरे गावापर्यंत हा मार्ग जातो. यासाठी दोन टप्प्यात कामाची विभागणी करण्यात आली असून त्यासाठी दोन ठेकेदार नेमण्यात आले आहेत. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉक डाऊन ची परिस्थिती असताना समृद्धी महामार्ग मात्र याला अपवाद ठरला आहे. सामान्य जनतेसाठी आणि उद्योगांसाठी असणारे  नियम समृद्धीला लागू नाही काय असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. बिनदिक्कत सुरू असलेल्या या कामावर माणसांची वर्दळ वाढू लागल्याने परिसरातील गावांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.

समृद्धी महामार्गासाठी सिन्नर तालुक्यात गोंदे आणिवावी  येथे दिलीप बिल्डकॉन तर शिवडे येथे जीएससीपीएल या कंपनीकडून वसाहती उभारण्यात आल्या आहेत. या ठिकाणी हजारोंच्या संख्येने अधिकारी व कर्मचाऱ्यांची व्यवस्था करण्यात आली असून कंपन्यांचे प्रशासकीय कामकाज देखील याच ठिकाणांवरून चालवले जात आहे.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात शासनाकडून लॉक डाऊन चे निर्देश देण्यात आले आहेत. संचारबंदी व जमावबंदीचे आदेश देखील निर्गमित करण्यात आले आहेत. मात्र, हे आदेश समृद्धी महामार्गाच्या ठेकेदारांना लागू नाही काय अशी परिस्थिती दिसून येत आहे. गेल्या संपूर्ण आठवडा ग्रामीण भागातील जनता रस्त्यावर पडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांचा ससेमिरा चुकवत आहे. तर दुसरीकडे समृद्धी महामार्गाचे काम जोरात सुरू असून यंत्रांसोबतच शेकडोच्या संख्येने मनुष्यबळाचा वापरदेखील  केला जात आहे.

याशिवाय शिवडे आणि वावी येथील वसाहती नागरीवस्ती जवळ असल्याने रोज सायंकाळी आणि सकाळच्या वेळी या वसाहतीतील बाहेर पडणाऱ्या शेकडो परप्रांतीय कामगारांचा त्रास देखील या गावांमधील नागरिकांना सहन करावा लागत आहे . एक एक-  दोन दोन च्या गटाने वसाहतीतून बाहेर पडणारे कामगार गावात आल्यावर मात्र शेकडोंच्या संख्येने दिसत असून अगोदरच कोरोनाच्या जीवघेण्या आजाराची धास्ती घेतलेल्या स्थानिक ग्रामस्थांमध्ये यामुळे अधिक भीतीचे वातावरण आहे.

या दोन्ही गावातील नागरिकांकडून वारंवार प्रशासकीय यंत्रणेकडे विचारणा करण्यात आली. आणि या कामगारांचा नागरी वस्तीत होणारा शिरकाव थांबवा यासाठी विनंती करण्यात आली. मात्र रस्ते विकास महामंडळासोबतच स्थानिक प्रशासकीय यंत्रणांकडून याबाबत दुटप्पी भूमिका घेतली जात आहे. एकमेकांकडे बोट दाखवत जबाबदारी झटकण्याचा प्रकार सुरू असून प्रशासकीय यंत्रणेचे लॉक डाऊनच्या परिस्थितीत सुरू असलेल्या समृद्धीच्या कामाला पाठबळ मिळत असल्याचा आरोप केला जात आहे.

समृद्धीच्या कामावर असणारे सर्वच कामगार परप्रांतिय असून होळीच्या दरम्यान निम्म्याहून अधिक कामगार आपापल्या राज्यात जाऊन परत आले आहेत. त्यामुळे या कामगारांच्या आरोग्यविषयक तपासणीचा मुद्दाही स्थानिक पातळीवर उपस्थित करण्यात येत आहे. कंपनी प्रशासनाकडून आमच्याकडे कुठलाही कर्मचारी आजारी नसल्याचे सांगितले जाते.

मात्र, गावात फिरणारे  असंख्य कामगार खोकल्याने बेजार झाले आहेत. त्यांच्यामुळे इतरांना लागण होऊन साथ रोगाचा प्रादुर्भाव होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. यासंदर्भात स्थानिक ग्रामपंचायतींनी अनेकदा सूचित करून देखील या कामगारांचा नागरी वस्तीकडे होणारा ओघ थांबलेला दिसत नाही. प्रशासकीय यंत्रणा हातावर घडी घालून गप्प बसली आहे.

त्यामुळे लॉकडाऊन पाळणाऱ्या गावकऱ्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. लॉक डाऊन, संचारबंदी, जमावबंदी फक्त  आम्हालाच…. समृद्धीच्या कामाला नाही काय असा प्रश्न विचारला जात आहे.

प्रशासकीय यंत्रणांचे वर हात

समृद्धी महामार्गाचे काम राज्य रस्ते विकास महामंडळाच्या नियंत्रणाखाली सुरू आहे. समृद्धीचे सुरू असणारे काम आणि या कामावरील लोकांचा नागरी भागात असणारा वावर याबद्दल रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना विचारले असता, समृद्धीचे काम हे यंत्राद्वारे करण्यात येत असल्याने अतिशय तोकडे मनुष्यबळ त्यासाठी लागते. त्यामुळे हे काम बंद ठेवण्याचा प्रश्न उद्भवत नाही अशी सारवासारव करण्यात आली.

नागरी वस्तीतील कामगारांचा वावर याबद्दल विचारले असता कंपनी प्रशासनाला सांगितले जाईल एवढेच उत्तर मिळाले. तर तहसीलदार राहुल कोताडे समृद्धीचा कामासाठी देखील लॉक डाऊन असून त्याबाबत रस्ते विकास महामंडळाला सुचित करण्यात आले असल्याचे सांगितले. नागरी वस्तीत होणारा कामगारांचा वावर नियंत्रणात आणावा यासाठी ठेकेदार कंपन्यांना देखील सूचना देण्यात आली असल्याचे ते म्हणाले. मात्र, शासनाच्या दोन यंत्रणांमधील समन्वयाचा अभाव ठेकेदार कंपन्यांच्या पथ्यावर पडल्याचे चित्र आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com