समृध्दी महामार्गाबाबत शिवसेना शेतकर्‍यांसोबत : पक्षप्रमुख ठाकरे यांचे शेतकर्‍यांना आश्‍वासन

0
कोपरगाव (तालुका प्रतिनिधी) – समृद्धी हे नाव गोंडस असले तरी या गोंडस नावाखाली शेतकरी भरडला जाता कामा नये. समृद्धी महामार्गाकडे आपण राजकारण म्हणून पहात नाही. शेतकर्‍यांच्या व्यथा मला समजलेल्या आहेत. आता शेतकर्‍यांनी एकजुट दाखवावी शिवसेना त्यांच्यामागे भरभक्कम उभी राहील अशी ग्वाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकर्‍यांना दिली.
कोपरगाव येथील विश्वात्मक जंगली महाराज आश्रमालगत समृद्धी महामार्गास विरोध करणार्‍या शेतकर्‍यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी श्री. ठाकरे थांबले होते. यावेळी ते म्हणाले ठराविक शेतकर्‍यांनी या प्रश्‍नावर मुंबईत यावे. आपण नकाशा घेवून बसू व या प्रश्‍नी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेबरोबर भेट घडवून देवू व समृद्धी महामार्गाचा प्रश्‍न निकाली लावू. मात्र तुमची एकजुट हवी.
यावेळी मंत्री रामदास कदम, दादा भुसे, खासदार चंद्रकांत खैरे, सदाशिव लोखंडे संपर्क प्रमुख आ. सुनिल शिंदे आदी उपस्थित होते. प्रारंभी माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे, कैलास जाधव, असलम शेख आदि शिवसैनिकांनी त्यांचे स्वागत केले. प्रास्तविक शिवाजी ठाकरे यांनी केले. या प्रसंगी बोलतांना होन यांनी समृद्धी महामार्गाची माहिती दिली. 750 कि.मि. लांबीचा महामार्ग कोपरगाव भागातून जात आहे.
त्यात आमची घरे दारे, बागायती शेतजमीन, विहीरी, बंगले, मंदीरे, साठवण तलाव आदी जात आहे. समृद्धी महामार्गासाठी लागणारी 5290 एकर जमीन आम्ही देण्यास तयार आहोत परंतु आमच्या घरादारावर नांगर फिरवून जर समृद्धी महामार्ग होणार असेल तर आम्ही कदापिही तो होवू देणार नाही. उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, राजधानी व उपराजधानीला समृद्धी महामार्गाने जोडले जाते ही बाब चांगली आहे.
मात्र शेतकर्‍यांच्या घरादारावरून त्यांना योग्य न्याय न देता तुम्ही जबरदस्ती करीत असाल तर त्यांस शिवसेनेचा सक्त विरोध राहील. असे असेल तर महामार्ग होवू देणार नाही. उपस्थित शेतकर्‍यांनी पोलीस जबरदस्ती करून बैठका घेत आहेत व शेतकर्‍यांना जमीनी देण्याबाबत प्रवृत्त करीत आहेत.
त्यावर ठाकरे म्हणाले पोलीसांनी वेड्यावाकड्या आदेशाचे पालन करू नये, शेतकरी हे आपले अन्नदाते आहे. त्यांचा तळतळाट घेवू नका, त्यांचा शाप तुमच्या मुलाबाळांना लागेल. शेतकर्‍यांनी सैरभैर होवू नका, एकजुट दाखवा आणि शासन जर जबरदस्तीच करणार असेल तर त्या विरोधात शिवसेना उतरेल असा इशाराही ठाकरे यांनी दिला.

 

LEAVE A REPLY

*