तलाठ्यांच्या भरवशावर नाशिकची ‘समृद्धी’

शेतकर्‍यांंची मनधरणी करण्याचे प्रयत्न; अद्याप एकाही शेतकर्‍याची परवानगी नाही

0
नाशिक । मुंबई-नागपूर या 710 किलोमीटरच्या समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनाबाबत शेतकर्‍यांमध्ये नाराजीचा सूर कायम असून शेतकर्‍यांची मनधरणी करण्याचे काम तलाठ्यांवर सोपवण्यात आले आहे. मात्र मनधरणी करण्यासाठी गेलेल्या तलाठ्यांना जिल्ह्यात अद्याप एकाही शेतकर्‍याने संमती दिलेली नाही.

गेल्या वर्षभरापासून वादग्रस्त ठरलेल्या मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी प्रशासनाने अखेर जमिनीचे दर जाहीर केले. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर व इगतपुरी तालुक्यातून जाणार्‍या या महामार्गासाठी येथील 49 गावांतील सुमारे तीन हजार शेतकरी बाधित होत आहेत. या महामार्गासाठी किमान 40 ते कमाल 80 लाख रुपये हेक्टरी दर जाहीर करण्यात आला.

मात्र यापूर्वीही सिन्नर आणि इगतपुरी तालुक्यातील शेतकर्‍यांनी इतरही प्रकल्पांना शेतजमिनी दिल्याने आता पुन्हा नागपूर-मुंबई महामार्गासाठी जमीन संपादित करून शेतकर्‍यांना भूमिहीन करण्याचे शासनाचे धोरण असल्याचा आरोप शेतकर्‍यांनी केला आहे. दर जाहीर केल्यानंतर हा विरोध अधिक तीव्र करण्यात आला. शिवडे गावात तर शेतकर्‍यांनी स्वतःची चिता रचून आत्महदहनाचा इशाराच प्रशासनाला दिला आहे.

समृद्धी महामार्गासाठी जिल्ह्यातील शेतकर्‍यांना भरपाई देण्यासाठी दोन्ही तालुक्यांतील 49 पैकी 48 गावांचे दर प्रशासनाने निश्चित केले आहेत. मात्र गेल्या चार दिवसांपासून एकाही शेतकर्‍याने जमीन देण्यासाठी संमती दिलेली नाही. यामुळे तलाठ्यांना शेतकर्‍यांशी संवाद साधण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

तलाठी आणि शेतकरी यांचे जवळचे नाते असल्याने आता तलाठ्यांनी स्वतःहून शेतकर्‍यांशी संपर्क साधून त्यांचे मन वळवण्याचे प्रयत्न करण्याचे सांगण्यात आले आहे. येत्या दोन दिवसात तलाठ्यांची बैठक घेण्यात येऊन शेतकर्‍यांच्या भावना जाणून घेण्यात येणार आहेत. मात्र आजपर्यंत एकाही गावातील शेतकर्‍यांनी जमीन संपादनासाठी संमती दिलेली नाही.

LEAVE A REPLY

*