‘समृद्धी’ महामार्ग विरोधात आज आंदोलन

0
नाशिक । समृद्धी महामार्गाविरोधात उद्या प्रकल्प बाधित शेतकरी तहसील कार्यालयासमोर आंदोलन करणार आहेत. नाशिकसह 10 जिल्ह्यातील शेतकरी संपूर्ण राज्यभरात तहसील कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याचे समृद्धी महामार्ग विरोधी कृती समितीच्या वतीने कळवण्यात आले आहे.

नागपूर- मुंंंबई समृद्धी महामार्गातील बाधित शेतकरी या महामार्गाला तीव्र विरोध करत आहेत. शासनाने या प्रकल्पासाठी जमिनीचे दर जरी जाहीर केले असले तरी अनेक जिल्ह्यांमध्ये या महामार्गाला प्रखर विरोध होत आहे. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर आणि इगतपुरी तालुक्यातून हा मार्ग जात असून सुमारे 100 किलोमीटर लांबीच्या या महामार्गासाठी चार हजार शेतकर्‍यांच्या जमिनी संपादित करण्यात येत आहे.

मात्र या प्रकल्पात अनेक शेतकर्‍यांच्या बागायती जमिनी बाधित होत असल्याने शेतकर्‍यांचा जमिनी देण्यास विरोध आहे. याकरिता विविध माध्यमातून आंदोलन करण्यात येत असून याच पार्श्वभूमीवर 10 ऑगस्ट रोजी ज्या ज्या जिल्ह्यातून हा मार्ग जात आहे त्या जिल्ह्यातील तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नागपूर- मुंबई जोडणारे अस्तित्वात असलेल्या मार्गाचे चार पदरीकरण करावे. शेतकर्‍यांच्या हिताचा भूसंपादन कायदा 2013 ची अंमलबजावणी करावी. महामार्गाबाबत शेतकर्‍यांनी दाखल केलेल्या हरकतींवर सुनावणी घ्यावी. तसेच उच्च न्यायालयातील केसेसला महाराष्ट्र शासनाने त्वरित जबाबपत्र दाखल करावे. तोपर्यंत भूसंपादन प्रक्रिया थांबवावी.

बागयती जमिनी वाचवाव्यात. शेतकर्‍यांची खोटी माहिती मुख्यमंत्र्यांना देणार्‍यांवर कारवाई करावी. शेतकर्‍यांना सरसकट कर्जमुक्ती आणि स्वामीनाथन आयोग लागू करावा, अशा विविध मागण्या या आंदोलनाद्वारे करण्यात येणार असल्याचे कृती समितीच्या वतीने कळवण्यात आले.

LEAVE A REPLY

*