‘समृद्धी’ जमीन संपादन प्रकरणी दर निश्‍चितीची प्रक्रिया सुरू

0
नाशिक | दि. १२ प्रतिनिधी – नागपूर-मुंबई एक्स्प्रेस वे अर्थात समृद्धी महामार्गास नाशिक जिल्ह्यातून प्रचंड विरोध होत असतानाही प्रशासनाने जमीन खरेदीसाठी खासगी वाटाघाटीसाठी गट नंबर जाहीर करून आता दर निश्‍चितीचीही प्रक्रिया सुरू केली आहे. नागपूरमध्ये प्रथम दरांची निश्‍चितीची प्रक्रिया पार पडली असून वर्धा आणि ठाण्यातही प्रक्रिया सुरू आहे. सर्वाधिक विरोध होणार्‍या नाशिकमध्येही त्याबाबत लवकरच काम सुरू केले जाणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला नागपूर-मुंबई शीघ्र दूरसंचार द्रुतगती महामार्ग ऑक्टोबर २०१९ साली पूर्ण करावयाचा आहे. नाशिक जिल्ह्यात मात्र या प्रकल्पाला शेतकर्‍यांनी तीव्र विरोध दर्शवला असून या प्रकल्पासाठी एक इंचही जमीन देणार नाही, असा पवित्रा घेत शेतकर्‍यांनी हरकती नोंदवण्यास सुरुवात केली आहे. मात्र ऑक्टोबर २०१७ पासून समृद्धी महामार्गाचे बांधकाम आणि निर्मितीच्या कामास प्रत्यक्षात सुरुवात केली जाणार आहे.

त्याचाच पहिला टप्पा म्हणून जमीन संपादनासाठी थेट खासगी वाटाघाटी करून जमीन खरेदीच केली जाणार आहे. जमिनी ताब्यात घेण्यासाठी भूसंपादनाने शेतकरी समाधानी होत नसल्यास थेट वाटाघाटी करून खरेदी करण्याचा निर्णय झाला.
त्यानुसार गट नंबर प्रसिद्ध करत संबंधित शेतकर्‍यांना वाटाघाटीसाठी पाचारण करण्याचेही सांगण्यात आले. आता जमिनींसाठी दर निश्‍चितीही त्यांच्यापुढे ठेवली जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक ठिकाणचे गेल्या पाच वर्षांत झालेले व्यवहार, तेथील रेडीरेकनरचे दर यांचा ताळमेळ घेऊन सार्वजनिक बांधकाम, महसूल आणि दुय्यम निबंधक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दरांची निश्‍चिती होईल.

त्यानंतर थेट शेतकर्‍यांना किती लाभ देणार हेच सांगत त्यांच्या जमिनी ताब्यात घेतल्या जातील. दर निश्‍चितीची शासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रेडीरेकनरनुसार येणारा सर्वाधिक दर निश्‍चित करत त्यात २५ टक्के अधिक रक्कम वाढवून देत दर अंतिम केले जाण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

*