विरोध मावळल्याने समृद्धीचा मार्ग मोकळा; लवकरच राबवणार खरेदी प्रक्रिया

0
नाशिक । समृद्धी महामार्गाला कडाडून विरोध करणार्‍या नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील गावांची विरोधाची धार कमी होत असून आता याच गावातील शेतकरी जमीन देण्यास पुढे आल्याची माहिती जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी दिली. दिवाळीनंतर या गावांतील खरेदी प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असेही ते म्हणाले.

या गावातील 100 टक्के मोजणी पूर्ण झाल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. समृद्धीचे महत्त्व शेतकर्‍यांच्या लक्षात येत असून, इतर गावातील विरोधही लवकरच शमेल आणि शेतकर्‍यांचा नकार होकारात बदलेल, असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त होऊ लागला आहे.

नाशिकमधील इगतपुरी आणि सिन्नर तालुक्यांतील काही शेतकर्‍यांच्या जमिनी सरकारला समृद्धी महामार्गासाठी हव्या आहेत. परंतु, वडिलोपार्जित जमिनी सहजासहजी सरकारला देण्यास शेतकरी तयार नाहीत. याउलट विरोधाची धार दिवसेंदिवस तीव्रच होत आहे. सिन्नर तालुक्यातील शिवडे, पाथरे , डुबेरे , वारेगांव, घारवड यांसारख्या काही गावांमधील शेतकर्‍यांनी अजूनही विरोधाचे निशाण फडकावत ठेवले आहे.

त्यामुळे जिल्ह्यात अजूनही 100 टक्के मोजणी पूर्ण होऊ शकलेली नाही. आमच्या जमिनी सोडून अन्य कोठूनही या महामार्गासाठी जमिनी संपादित करा, या मागणीवर ग्रामस्थ ठाम होते. मात्र ते व्यवहार्य ठरत नसल्याचे ग्रामस्थांना पटवून देण्यात प्रशासनाला यश आले आहे. जे लोक महामार्गाला तीव्र विरोध करीत होते, ते आता प्रशासनाला मदत करू लागल्याचा दावा अधिकारी करीत आहेत.

हा विरोध मावळला असून, राज्यातील अन्य काही भागांतदेखील समृद्धीचे महत्त्व शेतकर्‍यांना पटू लागल्याचा दावा प्रशासनातील अधिकारी करीत आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात सिन्नर तालुक्यातील 89 गटांतील 151 खातेदारांचे 69.59 हे. क्षेत्र संपादित करण्यात आले आहे.

त्यांना 74 कोटी, 5 लाख, 45 हजार, 359 रुपये मोबदला देण्यात आला. तर इगतपुरी तालुक्यातील 61 गटांतील 253 शेतकर्‍यांचे 32.95 हेक्टर क्षेत्र संपादित करण्यात आले आहे. त्यापोटी 40 कोटी, 86 लाख, 65 हजार, 309 रुपयांचा मोबदला देण्यात आला. आतापर्यंत 102.53 हेक्टर क्षेत्र संपादित करण्यात आले असून त्यापोटी 114 कोटी, 92 लाख, 10 हजार, 368 रुपयांचा मोबदला शेतकर्‍यांना देण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले.

LEAVE A REPLY

*