समृद्धी महामार्ग ; धोत्रे येथे मिळाला चारपट मोबदला

0
कान्हेगाव (वार्ताहर) – कोपरगाव तालुक्यातील धोत्रे या गावातील शेतकरी दादासाहेब सारजामन आधोडे यांच्या गट नंबर 116 मधील 2 एकर 19 गुंठे बागायत क्षेत्राची समृध्दी महामार्गासाठी शासनाच्या थेट खरेदी पध्दतीने खरेदीखताची नोंदणी करण्यात आली. या योजनेमुळे भूसंपादन कायद्यानुसार बाजारभावाच्या 4 पट व शासनाच्या सहमती मोबदला थेट खरेदी पध्दतीने 25 टक्के वाढीव रकमेचा लाभ अधोडे यांनी घेतला.
खरेदीखत नोंदणी करण्यापूर्वी 2 तास आधीच आधोडे यांच्या  बँक खात्यात आरटीजीएस द्वारे रूपये 78 लाख 24 हजार 852 रूपये जमा करण्यात आले. यावेळी एमएसआरडीसीचे भूसंपादन उपजिल्हाअधिकारी विठ्ठल सोनवणे, शिर्डी उपविभागीय अधिकारी रविंद्र ठाकरे, इगतपुरीचे उपविभागीय अधिकारी श्री. पाटील, कोपरगावचे तहसीलदार किशोर कदम, दुय्यम निबंधक व धोत्रे गावचे प्रगतशील शेतकरी उमेश शिंदे, तसेच धोत्रे गावाचे शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते संजय चव्हाण, प्रदीप चव्हाण, किसन माळवदे, दत्तात्रय माळवदे, इलियास शेख, राजेंद्र काळे इत्यादी हजर होते.
दरम्यान महामार्गाला जमिनी देण्यासाठी शेतकर्‍यांचा विरोध मावळला असुन महामार्गाच्या भूसंपादनास गती मिळणार आहे. जुलै महिन्यात एक तरी खरेदी व्हावी असे जिल्हाधिकारी यांचे म्हणणे होते. आधोडे यांनी थेट जमीन खरेदी करून दिली आहे. यानंतर इतर शेतकरी जमीन खरेदी देण्यासाठी पुढे येण्याची शक्यता आहे. भोजडे, कान्हेगाव, संवत्सर, कोकमठान, जेऊर कुंभारी, डाउच, चांदेकसारे, घारी, देर्डे कोर्‍हाळे धोत्रे अशा एकूण दहा गावातून हा मार्ग जात आहे. कोपरगाव तालुक्यातून सदर महामार्गासाठी 352.70 हेक्टर जमीन संपादित होणार आहे.

 

LEAVE A REPLY

*