शेतकर्‍यांचा संप हा विरोधकांचे राजकारण : राम शिंदे

0
संवाद यात्रेच्या माध्यमातून संप
करणार्‍या शेतकर्‍यांशी संवाद साधणार
अहमदनगर (प्रतिनिधी) – शेतकर्‍यांनी संपावर जाण्याची भूमिका घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहाता तालुक्यातील पुणतांबा येथील शेतकर्‍यांशी मुंबईत सकारात्मक चर्चा केली होती. जीसएटी अधिवेशनातही अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी योग्य वेळी कर्जमाफीचे आश्वासन दिलेले आहे़ तरीही शेतकर्‍यांनी संपावर जाण्याची भूमिका घेतली असून यात विरोधक राजकारण करीत आहेत, असा आरोप पालकमंत्री राम शिंदे यांनी केला. शेतकरी संवाद यात्रेच्या माध्यमातून शेतकर्‍यांशी संवाद साधत त्यांना संपावर जाण्यापासून थांबविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
भाजपच्या शिवार संवाद यात्रेच्या नियोजन बैठकीनंतर मंगळवारी मंत्री शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला़ शिंदे म्हणाले, सरकार शेतकर्‍यांसाठी सकारात्मक धोरण राबवीत आहे़ शिवार संवाद यात्रेच्या माध्यमातून सरकार शेतकर्‍यांशी संवाद साधणार आहे़ शेतकर्‍यांचे प्रश्‍न, त्यांच्या सरकारकडून असलेल्या अपेक्षा जाणून घेणार आहे़ सरकार शेतकर्‍यांना सक्षम करीत आहे़ मात्र, विरोधकांकडे मुद्दे नसल्यामुळे ते सरकारवर बेछूट आरोप करीत असल्याचे शिंदे म्हणाले़ यावेळी खासदार दिलीप गांधी, माजी मंत्री बबनराव पाचपुते, भानुदास बेरड, नगराध्यक्ष नामदेव राऊत, सत्यजित कदम, ममता पिपाडा आदी उपस्थित होते़
भाजपची गुरुवारपासून शिवार संवाद यात्रा सुरू होणार आहे. केंद्र सरकार व राज्य सरकारच्या शेतकरी हिताच्या योजनांची माहिती यावेळी शेतकर्‍यांना त्यांच्या बांधावर जाऊन देण्यात येणार आहे. त्यांच्या समस्या, अपेक्षाही यावेळी जाणून घेण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. जिल्ह्यातील वाड्या, वस्त्या, गावापर्यंत संवाद यात्रेच्या निमित्ताने भाजप पोहचणार आहे. पक्षाच्या गत अडीच वर्षांतील योजना, निर्णय याची माहिती सर्वसामान्यांना देण्यासोबत त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांचा अहवाल पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांच्या समोर 16 ते 18 जूनदरम्यान सादर करण्यात येणार आहे.
सवांद यात्रेमध्ये पक्षाचे खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी हे सहभागी होणार असून त्यांना विविध गावे, तालुके हे वाटून दिली जाणार आहेत. यात्रेसाठी निवडलेल्या कार्यकर्त्यांच्या मोबाईलवर शिवार संवाद नावाचे अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड करून दिले जाणार आहे. त्यांनी काय काम केले? ते कोठे आहेत? यांची सर्व माहिती मुख्यमंत्र्यांकडे ऑनलाईन स्वरूपात पाठविली जाणार असून मुख्यमंत्री स्वत: या यात्रेवर लक्ष ठेवणार आहेत.
दुसर्‍या टप्प्यात होणार्‍या कार्यविस्ताराचा कार्यक्रम दिनांक 28 मे ते 15 जून या कालावधीमध्ये पार पडणार आहे. 300 विस्तारकांची यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. ही मंडळी पक्षाची भूमिका, कामे सामान्य जनतेपर्यंत पोहचविणार आहेत. तसेच विस्तारक प्रत्येक गावांतील माहिती, तेथील शेतकर्‍यांच्या समस्या, सामाजिक स्थिती, राजकीय माहिती गोळा करून ती वरिष्ठ पातळीपयर्र्ंत पाठविणार आहे. आघाडी सरकारच्या 15 वर्षांच्या कार्यकाळापेक्षा भाजप सरकारने अडीच वर्षांत दहापटीने पटीने कामे केलेली आहेत. या आघाडी आणि भाजपच्या सरकारच्या कामाची तुलना जनतेला करून दाखवण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

आजीव सहयोग निधी जमा
जिल्ह्यातील पक्षाचे खासदार, आमदार, लोकप्रतिनिधींसह पदाधिकार्‍यांना पक्षासाठी आजीव सहयोग निधी जमा करण्याचे पक्षाने सांगितले आहे. तसेच या निधीचा उपयोग पक्षाच्या विस्तारासाठी केला जाणार आहे. हा निधी पक्षाच्या बँकेमधील खात्यावर पक्षातील पदाधिकारी व लोकप्रतिनिधींना जमा करावा लागणार आहे. शिंदे यांनी यात्रेसाठी पहिल्या टप्प्यात कर्जत-जामखेड मतदारसंघ व दुसर्‍या टप्प्यात अकोले हे गाव निवडले आहे. तसेच प्रत्येक लोकप्रतिनिधींनी आपल्या मतदारसंघात व एका गावात शेतकर्‍यांशी संवाद साधावा लागणार असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

*