राष्ट्रपतींच्या हस्ते ध्वजारोहण करून समाधी शताब्दी सोहळ्यास प्रारंभ

0
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सपत्नीक साईसमाधीचे दर्शन घेतले.
शिर्डी (प्रतिनिधी) – साईबाबा समाधी शताब्दी सोहळ्याचा शुभारंभ राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते रविवारी सकाळी 10.55 वाजता करण्यात आला. मंदिर परिसरातील लेंडीबागेत विधिवत मंत्रोच्चारात ध्वजस्तंभाचे पूजन करून ध्वजरोहण करण्यात आले. यानंतर राष्ट्रपतींनी श्री साईबाबांच्या समाधी मंदिरात साईसमाधीचे सपत्नीक दर्शन घेतले.
याप्रसंगी राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय नागरी उड्डानमंत्री अशोक गजपती राजू, पालकमंत्री राम शिंदे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, संस्थानचे अध्यक्ष डॉ.सुरेश हावरे, उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, खासदार दिलीप गांधी, खासदार सदाशिव लोखंडे, आमदार सौ.स्नेहलताताई कोल्हे, विश्वस्त अ‍ॅड. मोहन जयकर, भाऊसाहेब वाकचौरे, बिपीन कोल्हे, प्रताप भोसले,
विश्वस्त तथा नगराध्यक्षा सौ. योगिताताई शेळके, माजी विश्‍वस्त सचिन तांबे, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव एन. जे. जमादार, विभागीय आयुक्त महेश झगडे, जिल्हाधिकारी अभय महाजन व मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल आदी उपस्थित होते.
राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी संस्थानच्या नोंदवहीत आपला अभिप्राय नोंदवला असून त्यात म्हटले आहे की, साईबाबा समाधी शताब्दी महोत्सवाचा शुभारंभ करण्याचे भाग्य मला लाभल्या बद्दल मी स्वतःला सौभाग्यशाली मानत आहे. बाबांचा श्रध्दा आणि सबुरी चा मंत्र व सबका मालिक एक हा संदेश श्रध्दाळूंसाठी आणि पूर्ण मानवतेकरिता वरदान आहे.
मानवतेच्या कल्याणाकरीता एक महत्वपूर्ण केंद्र म्हणून साईबाबा मंदिर परिसराची ख्याती निरंतर वाढत राहील अशी माझी शुभकामना आहे.
शताब्दी महोत्सवाच्या शुभारंभाच्या निमित्ताने सकाळी 6 वाजता शिर्डी गावातून (पालखी मार्गे) ध्वजाची शोभा यात्रा काढण्यात आली.
शताब्दी महोत्सवाच्या शुभारंभाच्या निमित्ताने साईभक्त प्रकाश गंगावणी, मुंबई यांच्या योगदानातून मोफत नेत्रतपासणी व नंबरचे चष्मे वाटपाचा कार्यक्रम अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल व विश्वस्तांच्या हस्ते करण्यात आला.

 

LEAVE A REPLY

*