Thursday, May 2, 2024
Homeनगरसलाबतपूर-गोगलगाव रस्त्यावरील पुलाची दुरवस्था

सलाबतपूर-गोगलगाव रस्त्यावरील पुलाची दुरवस्था

सलाबतपूर |वार्ताहर| Salabatpur

नेवासा तालुक्यातील सलाबतपूर येथील सलाबतपूर-गोगलगाव रस्त्यावरील पुलाची अवस्था दयनीय झाली असून त्वरीत दखल घेऊन दुरुस्ती करावी, अशी मागणी सलाबतपूरचे सरपंच अझर शेख यांनी केली आहे.

- Advertisement -

दोन वर्षांपासून सलाबतपूर परिसरात पावसाचे प्रमाण चांगले राहिले आहे. त्यामुळे या नदीला चांगले पाणी टिकून राहिले. मात्र नदीवरील पूल हा पन्नास वर्षांपूर्वीचा जुना असून नादुरुस्त झाला आहे. या पुलाची कधी डागडुजीही झालेली नाही. या पुलाच्या कामाला मोठा तडाही गेला आहे. त्यामुळे या पुलाची अवस्था अतिशय बिकट बनली आहे. पन्नास वर्षात या परिसराचा कायापालट झाला. 20-25 वर्षापूर्वी गाडीबैल, सायकल तर क्वचित मोटारसायकल व चार चाकी वाहन पहावयास मिळत होते. मात्र आता परिस्थिती बदलली असून अवजड वाहनांची संख्या व वाहतूक वाढली आहे.

या पुलावरून सुरेगाव, गळनिंब, गोगलगाव, मंगळापूर अशी वाहतूक होत असे. मात्र अलिकडच्या काळात कायगाव ते भेंडा रस्त्याचे काम झाल्याने आता नेवासा व शेवगाव, पाथर्डी या तालुक्यांतील प्रवासी औरंगाबाद, देवगड, गंगापूरसह मराठवाड्यात जाण्यासाठी बायपास म्हणून या रस्त्याचा वापर करत आहेत. अतिवृष्टी व दळणवळणाच्या अतिरिक्त वापरामुळे पुलाचे तीनतेरा वाजले आहेत. गंगाथडीच्या पट्ट्यात ऊस उत्पादन जास्त असल्याने या पुलावरून मोठ्याप्रमाणात ऊस वाहतूक होते आहे. प्रशासनाचा डोळा चुकविण्यासाठी वाळू व मुरूम विटभट्टीसाठी माती याच रस्त्यावरून वाहिली जाते.पूल शेवटची घटका मोजत असून याची दुरुस्ती लवकर व्हावी, अशी मागणी होत आहे.

पावसाळ्यात लहान मुले याच पुलावरून शाळेत जातात. महिलांनाही कामानिमित्त जावे यावे लागते. रस्ता अनेक वर्षांपासून वाहतुकीस धोकादायक बनला असून याकडे प्रशासनाचे निवेदन देऊन लक्ष वेधले आहे. मात्र जर प्रशासनाने जाणूनबुजून दुर्लक्ष केले आणि या पुलावर काही अघटीत घटना घडली तर याला सर्वस्वी संबंधित प्रशासन जबाबदार राहील.

– अझर शेख, सरपंच, सलाबतपूर

- Advertisment -

ताज्या बातम्या