पालखीसोबत येणार्‍या साईभक्तांना सात दिवस साईंची सेवा करण्याची संधी मिळणार

0

डॉ. सुरेश हावरे : साईभक्तांचे साईसेवक संमेलन उत्साहात

राहाता (तालुका प्रतिनिधी) – देशभरातून पायी पालखीत येणार्‍या साईभक्तांना यापुढे शिर्डीत मंदिर परिसरात सात दिवस सेवा करण्याची संधी मिळणार असल्याचा निर्णय विश्वस्त मंडळाने घेतला. त्यामुळे शेगावप्रमाणे शिर्डीतही साईनामाचा गजर घुमणार असून यासंदर्भात साई पालखी मंडळाच्या 532 गटांनी नाव नोंदणी केली आहे.
देशभरातील पायी पालख्या घेऊन येणार्‍या साईभक्तांचे साई सेवक संमेलन काल शिर्डी साईबाबा संस्थान च्या वतीने आयोजित करण्यात आले होते. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे होते. यावेळी उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, विश्वस्त भाऊसाहेब वाकचौरे, नगराध्यक्षा सौ. योगीताताई शेळके, सचिन तांबे, प्रताप भोसले, माजी नगराध्यक्षा अनिता जगताप, कैलास कोते, वंदनाताई गोंदकर, कार्यकारी आधिकारी रुबल अग्रवाल तसेच मोठ्या संख्येने राज्यातून आलेले पालखी प्रमुख उपस्थीत होते. शिर्डीत येणार्‍या लाखो साई भक्तांना साईंची सेवा करावी अशी मनोमन इच्छा असते.
शेगावच्या गजानन महाराजांप्रमाणे विना मोबादला सेवा देऊन साईंचा आशीर्वाद मिळावा अशी भावना भक्तांची होती. त्या मागणीला आता यश मिळाले असून सर्वसामान्य साई भक्ताला आता ही सेवा देण शक्य झाले आहे. याची सुरुवात देशभरातून पायी पालख्या घेऊन येणार्‍या साईभक्तांपासून सुरू करण्यात येणार असल्याचा निर्णय साई भक्त संमेलनात संस्थानच्या वतीने अध्यक्ष सुरेश हावरे यांनी जाहीर केला. साकुरी येथील सिध्द संकल्प मॅरेज हॉल येथे काल पार पडलेल्या साई सेवक संमेलनात डॉ. हावरे बोलत होते. या प्रसंगी संस्थानचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, विश्वस्त भाऊसाहेब वाकचौरे, सचिन तांबे, प्रताप भोसले, नगराध्यक्षा योगिताताई शेळके, कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल आदी उपस्थित होते.
देशाच्या आणि राज्याच्या कानाकोपर्‍यातून आलेल्या पदयात्री साई पालख्यांच्या प्रतिनिधींच्या साई सेवक संमेलनास ऐतिहासिक प्रतिसाद मिळाला. या प्रसंगी डॉ. हावरे म्हणाले, शेगावच्या शिवशंकर भाऊ पाटील यांचे आशीर्वाद घेऊन शेगावच्या सेवेकरी योजनेच्या धर्तीवर साईसेवक योजना राबविण्यात येणार असून साईबाबांच्या मंदिरात सेवाभाव वाढवणे व भक्तांना सेवाभावी वागणूक मिळण्यासाठी ही योजना सुरु करण्यात येत आहे. पालखी सोबत येणार्‍या पदयात्री भाविकांना साईसेवक हा सन्मान देण्याचा आणि साईंची सेवा करण्याची संधी या माध्यमातून मिळणार आहे. 29 जुलै 2017 पासून सुरू करण्यात येईल.
आजचा दिवस ऐतिहासिक असून या उपक्रमाची मुहूर्तमेढ आज 532 गटांची नोंदणी होवून रोवली आहे. या गटांना मंदिर, प्रसादालय, हॉस्पिटल व निवासस्थाने याठिकाणी वर्षातून सलग 7 दिवस साई सेवेची संधी दिली जाईल. साई सेवकांनी सेवाभावी वृत्तीने भक्तांचा आदर करुन, सन्मान करुन ओम साई राम म्हणून साईभक्तांच्या अडचणी सोडावयाच्या आहे. या साई सेवकांना ओळखपत्र, गणवेश देऊन त्यांची संस्थानच्या वतीने निवास, भोजन, नाष्टा व चहापाण्याची व्यवस्था मोफत करण्यात येईल. या उपक्रमात सहभागी होणार्‍या साई सेवकांनी स्वच्छतेचे पालन करणे आवश्यक असून त्यांना व्यसनमुक्तीची शपथही दिली जाईल.
या प्रसंगी संस्थानचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, विश्वस्त सर्वश्री भाऊसाहेब वाकचौरे, सचिन तांबे, प्रताप भोसले व विश्वस्त तथा नगराध्यक्षा सौ. योगिताताई शेळके यांची भाषणे झाली. तसेच साई पालख्यांच्या प्रतिनिधींनी आपली मते व्यक्त केली. यावेळी प्रातिनिधीक स्वरुपात 5 साई सेवकांना साई सेवक नोंदणी प्रमाणपत्र देण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल यांनी केले तर आभार उपकार्यकारी अधिकारी डॉ. संदीप आहेर यांनी मानले.

साईपालखी प्रतिनिधींच्या संमेलनात सहभागी झालेल्या माजी नगराध्यक्षा व शिवसेनेच्या नगरसेविका अनिता जगताप व भाजप नगरसेविका वंदना गोंदकर यांनी साईभक्तांना शिर्डीत आल्यावर विविध समस्यांचा सामना करावा लागतो.

त्यांना येणार्‍या अडचणीसदर्भात व्यासपीठावर मला मत व्यक्त करावायाचे आहे. मला बोलण्याची संधी मिळावी अशी मागणी डॉ. हावरे यांच्याकडे केली. त्यावर हावरे यांनी स्थानिक पदाधिकार्‍यांना या व्यासपीठावर बोलण्याची परवानगी नाही.

डॉ. हावरे यांची प्रतिक्रीया ऐकल्यानंतर माजी नगराध्यक्षा जगताप यांनी मी साईबाबा संस्थानची माजी विश्‍वस्त आहे. मला माझे मत व्यक्त करू द्या. मात्र तरीही डॉ. हावरे यांनी नकार दिल्याने सौ. जगताप व सौ. गोदकर संमेलनातून बाहेर पडल्या. या संमेलनावर आपण बहिस्कार टाकत असल्याचे त्यांनी सार्वमतशी बोलताना सांगितले.

LEAVE A REPLY

*