शिर्डीत शताब्दी महोत्सवाची कामे सुरू

0

कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांची माहिती

शिर्डी (प्रतिनिधी) – साईबाबा संस्थानच्यावतीने साईबाबा समाधी शताब्दी महोत्सवाच्या नियोजनाच्या दृष्टीने विविध प्रकल्पांची कामे हाती घेण्यात आली आहेत.
मंदिर परिसरातील ग्रॅनाईट फ्लोरिंगची कामे येत्या 17 जुलैपासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती संस्थानच्या कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी दिली.
साईबाबा समाधी शताब्दी महोत्सवाच्या नियोजनाबाबत शिर्डीतील ग्रामस्थांनी केलेल्या मागण्यांबाबत साई संस्थानच्या कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली संस्थानच्या सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीस संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी डॉ. संदीप आहेर, कार्यकारी अभियंता आर. एस. घुले, प्रशासकीय अधिकारी सूर्यभान गमे, उत्तम गोंदकर, दिलीप उगले, अशोक औटी, मुख्य लेखाधिकारी तथा प्रशासकीय अधिकारी बाबासाहेब घोरपडे, उपकार्यकारी अभियंता रघुनाथ आहेर, संरक्षण अधिकारी मधुकर गंगावणे आदी उपस्थित होते.
रुबल अग्रवाल म्हणाल्या, साईबाबा संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे व व्यवस्थापन समितीने ग्रामस्थांंच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेतलेले आहेत. साईबाबा समाधी शताब्दी महोत्सव नियोजनाच्या दृष्टीने 1 ऑक्टोबर 2017 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शताब्दीचे ध्वजारोहण होणार आहे.
15 ऑक्टोबर 2017 रोजी शिर्डी नगरपंचायत, ग्रामस्थ व साईबाबा संस्थानच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय साई मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. साईभक्तांना सुखकर दर्शन मिळावे याकरिता नवीन दर्शनबारी प्रकल्प उभारण्याकामी निविदा प्रक्रियेची कार्यवाही चालू असून दर्शन रांगेसाठी सल्लागार (कन्सल्टंट) नेमणूक निश्‍चित झाली आहे.
साईबाबा हॉस्पिटलच्या सी. टी. स्कॅन व एमआरआय मशीनच्या खरेदीकरिता तिसर्‍यांदा निविदा मागविण्यात आल्या असून एका महिन्यात याकामी वर्क ऑर्डर देण्यात येईल. साईनाथ रुग्णालयाच्या तिसर्‍या मजल्याच्या कामाचे टेंडर उघडण्यात आले आहे.
नगर-मनमाड रस्त्यावर दोन्ही बाजूस आकर्षक कमानी उभारण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत लवकरात लवकर करण्यात येणार आहे. वाहतूक व्यवसथापनासाठी नगर-मनमाड रस्त्याच्या दुभाजकाचे काम व सुशोभिकरण सुरू करण्यात आले असून ‘स्काय वॉक’चा प्रस्ताव शासन मान्यतेसाठी पाठविण्यात आला आहे.
मंदिर परिसरात 233 एलजीएलईडीटीव्ही लावण्याच्या वर्कऑर्डरची कार्यवाही व्यवस्थापन समितीच्या बैठकीनंतर करण्यात येणार आहे, असे त्या म्हणाल्या.
साईबाबांच्या मूळ पादुका देशातील विविध राज्यांतील शहरात नेण्यात येतील व याकामी स्पेशल वातानुकूलित बस खरेदी करण्यात येणार आहेत. तथापि सुरक्षेच्या कारणास्तव परदेशांत ग्रामस्थांनी सूचविल्याप्रमाणे चांदीच्या पादुका नेण्याबाबतचा निर्णय व्यवस्थापन समितीच्या बैठकीत घेण्यात येणार आहे, असेही त्या म्हणाल्या.
अग्रवाल म्हणाल्या की, शिर्डीतील सर्व चौक व रस्त्यांच्या सुशोभिकरणाचा प्रस्ताव नगरपंचायतीने तयार करून संस्थानकडे सादर करावा व त्यासाठी संस्थानमार्फत निधी उपलब्ध करून देण्यात येईल. संस्थान हॉस्पिटल, शहरातील विविध रस्ते व मंदिर परिसरात सर्व ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत प्रकल्प सल्लागार नियुक्त करण्याची निविदा प्रक्रिया शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागामार्फत तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
हा प्रकल्प संस्थानमार्फत तातडीने पूर्ण करण्यात येणार आहे. साईबाबा संस्थानद्वारे वरीष्ठ महाविद्यालय सुरू करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व महाराष्ट्र शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
  • घनकचरा प्रकल्प – 
    संस्थान व शिर्डी नगरपंचायतीच्या वतीने एकत्रित घनकचरा प्रकल्पासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली असून ती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करुन घनकचरा प्रकल्प उभारण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात येणार आहे.
  •  निधीसाठी प्रयत्न निधीसाठी प्रयत्न शताब्दी महोत्सवासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्याकडून जास्तीतजास्त निधी मिळविण्यासाठी व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे व समितीच्या  मार्गदर्शनाखाली प्रयत्न करण्यात येईल असे रुबल अग्रवाल यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*