साईपादुका मागे बोलवा; अन्यथा आमरण उपोषण

0
शिर्डी (शहर प्रतिनिधी) – साईबाबा विश्‍वस्त व्यवस्थेकडून वतीने साई समाधी शाताब्धी सोहळ्याच्या निमित्ताने साईबाबांच्या मूळ पादुका देशविदेशात दर्शनासाठी पाठविण्यात आल्या आहेत, त्या तातडीने माघारी बोलवा अशी मागणी बुधवारी शिर्डी ग्रामस्थांनी साईसंस्थानच्या विश्‍वस्तांना बैठकीत केली. पादुका तात्काळ मागे न बोलावल्यास व्दारकामाईत बसुन आमरण उपोषण करू असा इशारा ग्रामस्थांनी दिला. त्यानंतर संस्थान प्रशासनाने साईपादुका अमेरीकेत पाठविण्याचा निर्णय रद्द केल्याचे सांगितले.
बुधवारी सकाळी 11 वाजता साई संस्थांच्या अतितीगृहावर शिर्डी ग्रामस्थ व विश्‍वस्तांची बैठक पार पडली. बैठकीस उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, नगराध्यक्षा योगिता शेळके, भाऊसाहेब वाकचौरे, मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल, उपकार्यकारी अधिकारी डॉ. संदीप आहेर, माजी उपनगराध्यक्ष निलेश कोते, सर्जेराव कोते, प्रमोद गोंदकर, सचिन तांबे, सचिन शिंदे, तुकाराम गोंदकर, दत्तू आसणे, अविनाश गोंदकर, गणेश कोते, वैभव कोते, काका आहेर, प्रकाश गोंदकर, जावेद शेख, साहिल शेख, अमोल गायके, विशाल भडांगे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी ग्रामस्थांनी मूळ पादुका परत शिर्डीत बोलवा ह्या भूमिकेवर ठाम मत मांडत संस्थानच्या विश्‍वस्तांना धारेवर धरले. या दरम्यान ग्रामस्थ व संस्थान यांच्यात खडाजंगी होऊन काही काळ तणाव निर्माण झाल्याचे चित्र बघावयास मिळाले. निलेश कोते म्हणाले, आमच्या सहनशक्तीचा अंत बघू नका, आमच्या भावना समजून घ्या. बाबांच्या पादुकांचे भक्तांना दर्शन द्यायचे असेन तर मंदिराशेजारील 16 गुंठ्यात उभारलेल्या स्टेजवर त्या दर्शनासाठी ठेवण्यात याव्या.
साई भक्त तात्या कोते यांचे वंशज सर्जेराव कोते म्हणाले, मूळ पादुका दर्शनासाठी माझा प्रथमपासूनच विरोध आहे. देश विदेशातून शिर्डी येथे भक्त येतात मग तुम्ही भक्तांच्या दारोदारी का फिरत आहेत. हा गोरख धंदा बंद करावा, अन्यथा ज्या द्वारका माईत बसून बाबांनी चमत्कार दाखविले, त्याच्या पुढे बसून आमरण उपोषण करू. आम्ही ग्रामस्थ मागे हटणार नाही.
पदाधिकार्‍यांना खरोखरी पादुका दर्शन घडवायचे होते मग यांनी काशी, अयोध्या, पंढरपूर येथे का नाही नेल्या. मात्र तसे न करता गोव्यात नेल्या, असे सांगून जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही, असे कोते यांनी ठणकावून सांगितले. यावेळी संस्थान प्रशासच्यावतीने सदर विषय पुढील बोर्ड मीटिंगमध्ये ठेवण्यात येणार असल्याचे सांगत, साईपादुकांचा नियोजित अमेरिका दर्शन दौरा रद्द करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

 

LEAVE A REPLY

*