साईसमाधी शताब्दीसाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार

0

शिर्डीतील संयुक्त बैठकीत ना. राधाकृष्ण विखे यांची माहिती

शिर्डी (प्रतिनिधी)- श्रीसाई संस्थानचे विश्‍वस्त मंडळ स्थानिक शिर्डी शहरातील विकासकामांना निधी न देता जिल्ह्याबाहेर निधीचे वाटप करते, हे अव्यवहार्य आहे. श्रीसाई समाधी जन्मशताब्दीच्या पूर्वसंध्येला विकासकामांना गती नाही, निधी देण्यातही गती दिसत नाही. याबाबत संस्थानच्या प्रशासकीय अधिकार्‍यांनाही अधिकार नाही.शताब्दी महोत्सवात विकासकामे गतीमान करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , साईसंस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांच्याबरोबर चर्चा करू, ग्रामस्थांची याबाबत असलेली नाराजीची भूमिका योग्य असून यावर तोडगा काढण्याचे आश्‍वासन राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. शेगाव संस्थानच्या धर्तीवर सेवक नेमल्यामुळे स्थानिक संघर्षात आणखी भर पडणार असल्याचे त्यांनी सांगीतले.

शिर्डी येथील नगरपंचायतीच्या सभागृहात नगर पंचायत पदाधिकारी आणि प्रशासन, साई संस्थानचे प्रशासन, शिर्डी ग्रामस्थ यांची संयुक्त बैठक पार पडली. बैठकीत शिर्डी येथील मुख्यमंत्र्यांच्या संभाव्य दौर्‍याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी ना. विखे पाटील बोलत होते. ना. विखे म्हणाले, समाधी शताब्दी सोहळ्यासाठी एकूण 3023 कोटी रुपयांचा आर्थिक आराखडा तयार करण्यात आला आहे.

यातील 1 हजार 800 कोटी रुपये साई संस्थानने निधी देण्याचा प्रस्ताव आहे. तर उर्वरित 1 हजार 200 कोटी रुपये राज्य सरकारने देण्याची कबुली दिली आहे. मात्र, राज्य सरकारने या निधीबाबत तरतूद केली नसून त्याबाबत कोणतीही ठोस पावले उचलली दिसत नाही. विकासकामांना अद्याप गती नाही.

मागील सुचनेवर कोणतीही अंमलबजावणी केलेली नाही. त्यांच्या कामकाजात स्वातंत्र्य मिळावे, म्हणून मी त्यावर कोणताही हस्तक्षेप केलेला नाही. ग्रामस्थांची साई संस्थानच्या विश्‍वस्तांबाबत असलेली नाराजी योग्य असून मी ग्रामस्थांच्या भुमिकेशी सहमत आहे. ग्रामस्थांची विकासकामांच्या बाबतीत असलेली भूमिका रास्त असून त्यांच्या भावना मुख्यमंत्र्यांच्या व साई संस्थानच्या अध्यक्षांना समक्ष भेटून सांगणार असल्याचे आश्‍वासन त्यांनी दिले.

ना. विखे म्हणाले, स्थानिक विकासकामांना निधी मिळाला पाहिजे, विकासकामांना गती मिळाली पाहिजे, याबाबत मी पाठपुरावा करणार आहे. साई समाधी शताब्दी सोहळा हा प्रत्येक साईभक्तांच्या व ग्रामस्थांच्या आयुष्यातील ऐतिहासिक सोहळा ठरणार असून हा सोहळा अविस्मरणीय ठरावा, अशी अपेक्षा ना. विखे यांनी व्यक्त केली.

स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून साई शताब्दी सोहळ्याचे काम गतीमान करण्याची जबाबदारी घेताना राज्य सरकारने निधी वेळेत उपलब्ध करावा, यासाठी पाठपुरावा करण्याचे अभिवचन ना. विखे यांनी या बैठकीत दिले. यावेळी स्थानिक ग्रामस्थांनी साई संस्थानच्या मनमानी कारभारावर नाराजी व्यक्त करून बैठकीत आगपाखड केली.

संस्थानचे माजी विश्‍वस्त डॉ. एकनाथ गोंदकर म्हणाले, ग्रामस्थांच्या दृष्टीने हा शताब्दी सोहळा अतिशय महत्वाचा आहे. मात्र, संस्थानच्या निर्णयाबाबत व तयारीबाबत काहीही माहिती मिळत नाही. विकासकामे सुरू नाहीत. ठेकेदारांनी कामे सोडून दिलेे असून अद्याप नवीन ठेके देण्यात आलेले नाही.

संस्थानचे अध्यक्ष कार्यबाहुल्यामुळे अत्यंत ‘बिझी’ असल्याने त्यांना लक्ष द्यायला वेळ मिळत नसून जिल्ह्यातील स्थानिक विश्‍वस्तही याबाबत अत्यंत उदासिन असल्याने नाराजी वाढलेली आहे. संस्थानकडून अनेक अपेक्षा आहेत. मात्र, गेल्या अनेक वर्षापासून ग्रामस्थ व संस्थानमध्ये असलेली संघर्षाची दरी अद्यापही कायम आहे. यावर ना. विखे यांनी मध्यस्थी करून तोडगा काढावा, अशी मागणी डॉ. गोंदकर यांनी केली.

शिर्डीचे प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष कैलास कोते म्हणाले, विकासाच्या बाबतीत संस्थानचा निष्काळजीपणा उघड झाला आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्याचा निर्णय झाला आहे. झोपेचे सोंग घेतलेल्या संस्थानच्या विश्‍वस्तांना जागे करण्याचा आमचा प्रयत्न असल्याची टीका कोते यांनी केली.

साईनिर्माणचे विजय कोते म्हणाले, विकास आराखड्याबाबत कोणतीही माहिती स्थानिक ग्रामस्थांना नाही. संस्थानचे प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी आमचे ऐकत नसल्याचे तुणतुणे संस्थानच्या पदाधिकार्‍यांकडून वाजविले जाते, हे आश्‍चर्यजनक बाब आहे.

शहरातील अनेक कामांना खीळ बसली असून अवैध धंदे वाढल्याने लोकप्रतिनिधींची बदनामी होत असल्याची खंत कोते यांनी व्यक्त केली. यावेळी नगरसेवक अभय शेळके, नितीन कोते आदींनी या बैठकीत मनोगत व्यक्त करून नाराजीचा सूृर आळविला. यावेळी प्रांताधिकारी रवींद्र ठाकरे, तहसीलदार माणिक आहेर, नगराध्यक्षा योगिता शेळके, मुख्याधिकारी यशवंत डांगे, पोलीस उपअधिक्षक सागर पाटील, उपनगराध्यक्ष जगन्नाथ गोंदकर, साईसंस्थानचे प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

*